Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयकर विभागाच्या कर्मचाऱ्याने सिनियरचं लॉग इन वापरून सरकारला लावला २६३ कोटींचा चुना

6

मुंबई: अलीकडच्या काळात एखादा राजकारणी, उद्योगपती किंवा व्यावसायिकांवर आयकर विभाग किंवा ईडीची धाड पडण्याच्या घटना या काही नवीन बाब राहिलेली नाही. एकदा का या यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला की आयकर विभाग आणि ईडी संबंधित व्यक्तीच्या संपत्तीची पाळेमुळे खणून काढतात. या सगळ्या चौकशीतून कोणत्या उद्योगपतीने किंवा व्यापाऱ्याने कशाप्रकारे करचोरी केली आहे, याच्या रंजक कथाही समोर येतात. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणात आयकर विभागाच्याच एका कर्मचाऱ्याने सरकारला थोडाथोडका नव्हे २६३ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तानाजी मंडल अधिकारी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तानाजी अधिकारी हे आयकर खात्यात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग इन वापरुन टॅक्स रिफंडच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आयकर विभागाच्या या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांशी गोड बोलून त्यांचा विश्वास जिंकला. अगदी आयकर खात्यातील आयुक्त स्तरावरील अधिकारीही तानाजी अधिकारी यांच्याशी गोडीगुलाबीने वागत. याच विश्वासाचा गैरफायदा घेत तानाजी अधिकारी यांनी आयकर खात्यातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालयातील लॉग इन्स आणि पासवर्ड मिळवले. याच लॉग इनचा वापर करुन तानाजी अधिकारी खोटे कर परतावे अर्थात टॅक्स रिफंड करत असे. तानाजी अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना खोटे टॅक्स रिफंड क्लेम दाखल करायला सांगत असे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉग इनवरुन ते मंजूर करुन टाकत असे. या माध्यमातून तानाजी अधिकारी यांनी थोडथोडके नव्हे तब्बल २६३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

याप्रकरणी सक्तवसुली संचलनलायाने शनिवारी मुंबई आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. ईडीने जवळपास ३० मालमत्तांवर छापे टाकले. याशिवाय, ईडीकडून तानाजी अधिकारी यांनी खोट्या कर परताव्याच्या (Tax Refund) माध्यमातून जमवलेल्या पैशातून खरेदी केलेले ३२ प्लॉटसही जप्त केले आहेत. तानाजी अधिकारी यांनी या पैशातून लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे, उडपी याठिकाणी अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. याशिवाय, मुंबई आणि पनवेलमध्ये त्याच्या मालकीचे काही फ्लॅटस होते. तसेच तानाजी अधिकारी यांच्याकडे BMW X7, Mercedes GLS400d, Audi Q7 या अलिशान गाड्या होत्या. तानाजी अधिकारी यांनी या सर्व मालमत्ता त्याचे सहकारी असलेल्या भुषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, किर्ती वर्मा आणि अन्य काही लोकांच्या नावाने विकत घेतल्या होत्या. ईडीने याप्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकूण १६६ कोटींची मालमत्ता गोठवली आहे.

तानाजी अधिकारी घोटाळा नेमका कसा करायचा?

तानाजी अधिकारी या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन केला होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन तानाजीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची लॉग इन आणि पासवर्ड मिळवले. तो आपल्या सहकाऱ्यांना आयकर विभागाकडे खोटे टीडीएस रिफंड क्लेम दाखल करायला सांगायचा. सहकाऱ्यांनी खोटे रिफंड क्लेम सादर केल्यानंतर तानाजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग वापरुन ते क्लिअर करत असे. ही कर परताव्याची रक्कम एस.बी. एन्टरप्रायझेस या बनावट कंपनीच्या बँक खात्यात जमा केली जात असे. हे बँक खाते तानाजीचा सहकारी भूषण पाटील हाताळत होता, अशी माहिती ईडीने दिली.

तानाजी अधिकारी याने नोव्हेंबर २०१९ पासून वर्षभरात १२ खोटे टॅक्स रिफंड क्लेम मंजूर केले. या सर्व टॅक्स रिफंडच्या माध्यमातून जवळपास २६३ कोटी रुपये तानाजीने एस.बी. एन्टरप्रायझेसच्या बँक खात्यात वळते केले. २००७-०८ आणि २००८-०९ या आर्थिक वर्षातील टॅक्स रिफंड बाकी असल्याचे दाखवून तानाजी अधिकारी याने २६३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.