Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २८ : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५७२ नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.
मेळाव्यात ४३ कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील ९ हजार १६१ रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण ३०४ उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.
५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
०००