Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Explainer: कसब्यात भाजपने टिळकांना डावलून हेमंत रासनेंना उमेदवारी का दिली?

8

पुणे: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले असून आज (ता.४ जानेवारी) भाजपने कसबा पेठ आणि चिंचवड मधील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी दिली. मात्र, कसब्यात टिळक कुटुंबीयांना डावलत भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ही पोटनिवडणूक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर होत असल्याने त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना तिकीट दिले जाणार,अशी दाट शक्यता होती. मात्र चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांना तिकीट मिळालं. मात्र, कसब्यात भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत माजी नगरसेवक हेमंत रासने यांची उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे कसब्यातून टिळक, बापट कुटुंबीयांना डावलून नेमकं रासने यांनाचं उमेदवारी का दिली गेली यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपकडून कुठलीही निवडणूक असो ती फार गांभीर्याने घेतली जाते, ते आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला वारंवार बघायला मिळाले. यामुळे या निवडणुकीतही भाजपकडून गाफील न राहता शहराबाहेरील 3 कंपन्यांकडून सर्वे करण्यात आले. त्या सर्वेमध्ये टिळक कुटुंबातील कुणाला जर उमेदवारी दिली तर धोका निर्माण होऊ शकतो, असे निकाल आल्याने टिळक कुटुंबाव्यतिरिक्त उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नेमकी हेमंत रासनेंनाच उमेदवारी का?

कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. कसब्यात पाच वेळा भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर मुक्ता टिळक यांनी २०१९ ची निवडणूक जिंकत भाजपचे वर्चस्व राखलं होतं. मात्र त्यांच्या पश्चात भाजपकडे या मतदारसंघाचा दीर्घकालीन प्रतिनिधित्व करेल, असा चेहरा तयार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते चारवेळेस नगरसेवक म्हणून काम केलेले आणि स्थायी समितीचे अनेकदा अध्यक्षपद भूषवलेले हेमंत रासने यांना पक्षाने संधी दिल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून धीरज घाटे, गणेश बिडकर, शैलेश टिळक हे उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र समोर महाविकास आघाडी आणि त्यातही रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार त्यामुळे लोकांत असणारा उमेदवार गरजेचे होते. रासने यांनी नगरसेवक म्हणून जनसम्पर्क तगडा केलेला आहे. पेठ भागात भाजप म्हणून जातीय समीकरण योग्य हाताळण्यात रासने यांचा हातखंडा आहे तर दुसरीकडे दांडेकर पूल आणि दत्तवाडी परिसरात देखील रासने यांच्या नावाला मान्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रासने यांच्या डोक्यावर ओंकारेश्वराचा हात म्हणजेच गिरीश बापट यांची संमती असणारे उमेदवार असणे रासने यांच्या पथ्यावर पडले आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित झाली तर टिळक कुटुंबियांचा टिकाव लागणे मुश्किल होते. कारण या आधी धंगेकर यांनी गिरीश बापट यांना २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीमध्ये घाम फोडला होता. त्यावेळी ते मनसेकडून निवडणूक लढले होते. मात्र, आता काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) एकत्र असल्याने धंगेकर हे टक्कर देणार हे भाजपला ठाऊक आहे. यामुळे या निवडणुकीत जर भाजपला पराभव स्वीकारावा लागला तर आगामी महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी हे भाजपच्या फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेत अनुभवी रासने यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

रासने यांचा पुण्यातील गणेश मंडळांची चांगलं संबंध असून ते ग्राउंड लेव्हलला काम करतात. शिवाय कुठल्या गटा-तटात ते नसल्याचेही त्यांच्या पथ्यावर पडल्याचे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान, भाजपने रासनेंच्या रूपाने कसब्यामध्ये पत्ता तर टाकलाय, मात्र निवडणूक निकाल काय येतात आणि रासने कसबा राखतात का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत हेमंत रासने ?

* सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक
* सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद
* अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड
* उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती स्ट
* सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

महत्त्वाची विकासकामे

* स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ
* पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास
* मंडईत भुयारी मेट्रो
* समान पाणीपुरवठा – २४ तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा
* भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय
* शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.
* मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती
* कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा
* नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती

महत्त्वाचे उपक्रम

* साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन
* कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
* कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण
* कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य
* कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.