Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नीतिमत्ता आणि मानवी आंतरसंबंध
नीतिमत्ता किंवा नैतिकतेची व्याख्या, तिचे आधारभूत घटक, तिची विविध परिमाणे, नैतिकतेचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम, मानवी मूल्य म्हणजे काय, त्यांची वैयक्तिक तसेच सामाजिक उपयोगिता, याबरोबरच थोर नेते, विचारवंत, समाजसुधारक, लोकप्रशासक यांच्या चरित्रांतून मानवी मूल्यांचे दर्शन कशा प्रकारे होते, तसेच मूल्यशिक्षणासाठी कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था यांची उपयोगिता या घटकांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे.
दृष्टिकोन
या संकल्पनेचा समावेश हा दुसऱ्या प्रकरणात आहे. दृष्टिकोन म्हणजे काय? त्याचे प्रकार, त्याची उपयोगिता, मानवी वर्तनावर दृष्टिकोनाचा होणारा परिणाम याबरोबर नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात आलेला आहे. नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन हे सामाजिक पर्यावरणाच्या आधारे समजावून घेणे इत्यादी घटकांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे.
सनदी सेवा
सनदी सेवेमध्ये आवश्यक असणारी मूलभूत मूल्ये आणि सनदी सेवकांमध्ये आवश्यक असणारे गुण यांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे. सचोटी, प्रामाणिकपणा, तटस्थता, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, समाजातील दुर्बल घटकांप्रती सेवाभावी वृती, करुणा, सहानुभूती, संयम, सेवेप्रती असलेली निष्ठा या संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.
भावनांक
भावनांकाची संकल्पना, उपयोगिता आणि त्याचे उपयोजन या घटकांचा समावेश या प्रकरणात आहे. बुद्ध्यांक ही संकल्पना आपल्या परिचयाची आहे. पण वास्तव जीवनात बुद्धीला भावनेची जोड असेल, तर कार्याला एक नवे परिमाण प्राप्त होते. प्रत्यक्ष प्रशासकीय आणि शासन व्यवहारात भावनांक या संकल्पनेचा जनकल्याणासाठी कसा वापर करता येईल, यावर या प्रकरणात अधिक भर दिलेला आहे.
नैतिकता आणि तत्वज्ञ
या प्रकरणामध्ये नैतिकता या संकल्पनेविषयी ज्या तत्त्वज्ञांनी आपले विचार मांडले आहेत, त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने या तत्त्वज्ञांची यादी दिलेली नाही. त्यांनी फक्त जागतिक आणि भारतीय विचारवंत असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे उमेदवारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रमुख तत्त्वज्ञांच्या लिखाणाचा नैतिकतेच्या संकल्पनेच्या संदर्भात अभ्यास करावा लागेल.
या पुढील प्रकरणामध्ये लोकप्रशासनातील सनदी सेवकांमधील नीतिमत्तेचा स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे. नैतिकतापूर्ण शासनव्यवहार कसा असावा, त्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल, लोकप्रशासनातील कायदे, अधिनियम हे नैतिकतेचे मुख्य स्रोत कसे बनतील, या घटकांचा विचार करावयाचा आहे. व्यापारउदीम, आंतरराष्ट्रीय संबंध,आंतरराष्ट्रीय निधी यामधील नैतिकतेचे पेच आणि त्यावरची उपाययोजना या घटकांचादेखील समावेश या प्रकरणामध्ये आहे. थोडक्यात सनदी सेवांमध्ये नैतिकता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना बळकटी कशी देता येईल, याची चर्चा विशेषत्वाने या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे.
सरकार व्यवहारातील सचोटी
या प्रकरणात सनदी सेवा म्हणजे काय, सनदी सेवकांचे नागरिकांशी नाते कशा प्रकराचे असावे, या घटकाचा समावेश प्रामुख्याने केलेला आढळतो. माहितीचा अधिकार, माहितीची देवाणघेवाण आणि शासकीय कामकाजातील पारदर्शकता, सनदी सेवकांकरीता असलेली आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सरकारी सेवांचे वितरण आणि त्यांची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचे उपयोजन, भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराची कारणे आणि त्यावरील उपाययोजना या विषयांचादेखील समावेश या प्रकरणामध्ये आहे.
प्रकरण अभ्यास
अभ्यासक्रमाच्या शेवटच्या भागात असा उल्लेख आहे की, वरीलपैकी कोणत्याही मुद्द्यांवर प्रकरण अभ्यास (case study) विचारला जाऊ शकेल. म्हणजेच, वरील अभ्यासघटकांपैकी काही घटकांवर आधारित प्रकरण तयार केले जाईल आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे, हे उमेदवारांकडून अपेक्षित आहे. या भागावर आधारित कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवताना उमेदवारांचा दृष्टिकोन कसा असावा, याची चर्चा आपण एका स्वतंत्र लेखात करूया.
या पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण आता पाहिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाला या पेपरच्या माध्यमातून काय अपेक्षित आहे, त्याचीही थोडक्यात चर्चा आपण या लेखाच्या सुरुवातीस केलेली आहे. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि तिचा आराखडा याची चर्चा पुढील लेखामध्ये करूया.
– प्रा. केतन भोसले (लेखक राज्यशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)