Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाळा-कॉलेज अन् नोकरी, प्रेमात पाठशिवणीचा खेळ, मास्तर दाम्पत्याची भावणारी लव्हस्टोरी

12

अकोला : ही लव्हस्टोरी चित्रपटाच्या कथेप्रमाणे नाहीये परंतु स्नॅपचॅटच्या काळातही आपल्या प्रेमाचं ‘स्टेटस’ सांभाळून असलेली ही एक हळवी प्रेमकथा नक्कीच म्हणता येईल. ही प्रेमाची गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातल्या किशोर अन् दिपाली यांची. ग्रामीण भागातला असलेला किशोर… त्याच्या मनात दुनियाभराचा संकोच अन् कमालीचा न्यूनगंड…. आपण म्हणजे अगदीच साधे आहोत, अशी त्याच्या मनात ठाम समजूत होती. सन १९९९ मध्ये किशोर बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकळा.. बारावीपर्यंत प्रत्येक मुलीला ‘ताई’ म्हणणारा किशोर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एका मुलीच्या पाहता क्षणी प्रेमात पडला. तेव्हा ‘ती’ त्याच्यासाठी अनोळखी… पहिल्यांदाच पाहिलेली ‘ती’ मुलगी अगदी साधी-सरळ, अतिशय विनम्र आणि सालस वाटली.. आता अशी जीवनसाथी म्हणून आयुष्यात मिळाली तर नक्कीच आयुष्याला बहार येईल, असा विचार किशोरच्या मनात दरळवत होता. परंतु ते शक्य नाहीये हेही कळत होतं. त्याच भावना ‘किशोर’ आपल्या चारोळ्यांमधून व्यक्त करायला लागला. ‘तू सुगंधी नावाची, तू फुलांच्या गावाची, तुला काय कल्पना या हृदयातल्या घावाची..! अशा शब्दात किशोर आपल्या वेदनेचं गाणं गाऊ लागला. पण किशोरच्या नशिबात तिचं भेटणं होतंच….

योगायोगाने पुन्हा ‘तिची’ भेट अन् मैत्रीची सुरुवात

अकोला जिल्ह्यातील कुंभारी गावातला किशोर बळी याला लहानपणापासूनच शिक्षक व्हायचं स्वप्न होतं. बारावीनंतर त्याने अकोल्यात डी.एडला ऍडमिशन घेतलं. योगायोगाने अमरावतीत गुणवत्ता सत्कार समारंभात पहिल्या नजरेत प्रेम झालेल्या ‘त्या’ मुलीनेही त्याच कॉलेजमध्ये डी.एडला प्रवेश घेतला. बारावीच्या गुणवत्ता यादीत अन् आता एकाच सेक्शनमध्ये आणि एकामागोमागच दोघेही आले होते. किशोरला तिच्याबद्दलची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली. परंतु माझ्यासारखा साधारण दिसणारा मुलगा तिला आवडेल का? आपल्याला जे वाटतं तेच प्रेम असावं का? अन् तिला ते मान्य असेल का? असे अनेक प्रश्न किशोरला सतावू लागले.

किशोरने म्हटलेल्या ‘गोऱ्या-गोमट्या तुझ्या रुपाला, जरीही मी पारखा आहे.. तीळ तुझ्या गालावरचा निदान माझ्यासारखा आहे… या चारोळ्यांना त्यावेळी युवावर्गातून मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु तिच्याकडून काही प्रतिसाद येईल की नाही, याबाबत किशोर साशंक होता. हळूहळू दोघांचा संवाद वाढत गेला. अशाप्रकारे दिपाली आणि किशोरची घट्ट मैत्री झाली.

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!
किशोरने असा केला प्रेमाचा इजहार

सन २००० मध्ये दोघांकडे मोबाईल नव्हते. त्यात मोकळेपणाने बोलण्याचं धाडस नव्हतं. कुठं भेटणं वगैरे तर खूपच दूरची गोष्ट. हे प्रेम अगदी संथ नदीसारखं नितळपणे आपल्या मनाच्याच पात्रातून प्रवास करीत होतं. ‘चार लोकांना कळणारच, दोन लोक जळणारच, प्रेम करायचं म्हटल्यावर एवढं तर घडणारच… हे कवितेतलं धाडस प्रत्यक्षात येत नव्हतं.

एक दिवस दिपालीला प्रेम पत्रातून त्याने आपल्या मनातील भावना सांगितल्या. किशोरला उत्तर द्यायला दिपालीने काही दिवसांचा वेळ घेतला. प्रचंड विचारानंतर अखेर दिपालीने किशोरला होकार दिला. परंतु या प्रेमाचे लग्नात रुपांतर होण्याची तीळमात्रा शक्यता नाही, असं दिपालीला वाटून गेलं. किशोरच्याही मनात त्याच भावना होत्या. परंतु ‘आपलं हे लग्न झालं तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेल’ हे ही दिपाली वारंवार म्हणायती… तिची हीच भावना किशोरच्या प्रेमाला बळ द्यायची…!

प्रेमाला बहार आला…

सन २००१ मध्ये दोघांचेही डी.एड संपलं.. तसा संवादही संपला.. गाठी-भेटी संपल्या. मग उरली केवळ अस्वस्थता. पुन्हा भेट होईल की नाही, याचीही जिथे शाश्वती नव्हती, तिथे लग्नाचं स्वप्न पाहणं तर खूपच दुरापास्त वाटणारी गोष्ट… काही महिन्यानंतर किशोर यवतमाळ जिल्ह्यातील एका पारधी तांड्यावर शिक्षक म्हणून रुजू झाला. दोन वर्षे उलटून गेली. दिपालीनेही अनेक ठिकाणी शिक्षण-सेवक पदासाठी अर्ज केले. तिचीही यवतमाळ जिल्ह्यातच नियुक्ती झाली. त्यात पुन्हा दिपाली आयुष्यात येण्याची कुठलीही शक्यता किशोरला नव्हती. परंतु शाहरुख खानच्या एका चित्रपटातील संवादाप्रमाणे ‘किसीको अगर सच्चे दिलसे चाहो, तो पूरी कायनात तुम्हे उसे मिलाने में जुट जाती है…’ हे मात्र किशोर अन् दिपालीच्या आयुष्यात तंतोतंत खरं ठरलं. तिही त्याच तालुक्यात शिक्षिका म्हणून रुजू झाली. आठ-दहा मित्रमैत्रिणींचा त्यांचा ग्रुप बनला. त्यात तीही सामील झाली. पुन्हा किशोर-दिपालीचं प्रेम हळूहळू फुलायला लागलं.

मेहंदीच्या कार्यक्रमात भेट, पाहताक्षणी प्रेमात, हिंदू-मुस्लिम धर्म विसरले, माणुसकी धर्माने रबाना-अमोलला एकत्र आणलं!
घरच्यांचा तीव्र विरोध

दोघांनीही आपापल्या घरी मोठ्या धाडसाने लग्नाचा विषय काढला. किशोरच्या घरी तर सगळ्यांना अगदी धक्काच बसला. तिच्याबद्दल सगळ्यांना आपुलकी होती, परंतु लग्नाच्या दृष्टीने त्याच्या मैत्रीकडे पाहणे अशक्यच होतं. अतिशय पारंपारिक वळणाची दोन्ही कुटुंब. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वेगवेगळ्या. किशोर माळी समाजाचा तर दिपाली कुणबी समाजाची. त्यामुळे विरोधही तेवढाच तीव्र.

दिपालीच्या वडिलांनी किशोरला काही कळवलं नाही. त्यामुळे त्याच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. मात्र एक दिवस तिच्या वडिलांनी किशोरला भेटायला बोलावलं. किशोर आणि संजू नावाचा त्याचा एक मित्र त्यांना भेटायला गेले. लग्न करायचं असेल तर तुमच्या घरातल्यांची संमती आवश्यक आहे, असं दिपालीच्या वडिलांनी किशोरला सांगितलं. हळूहळू लग्नाला होणारा सगळा विरोध मावळत गेला. जाती-पातीचा विचार बाजूला ठेवून किशोर-दिपालीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं. २००५ मध्ये किशोर आणि दिपाली दोघेही विवाह बंधनात अडकले. दिपाली सराफची ती दिपाली ‘बळी’ झाली.

सुखासमाधानाने संसार सुरु

लग्नानंतर दोन्हीकडील नातेवाईकांचं प्रेम मिळत गेलं आणि ते उत्तरोत्तर वाढतच गेलं. आता कधीही जात आडवी आली नाहीये, तसेच कुठलीही तथाकथित प्रतिष्ठा कमी झाली नाहीये. आज किशोर-दिपालीचा संसार अगदी सुखासमाधानाने सुरु आहे.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडल्या, बंधने तोडली, रसिका आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे

समाजातील जात, धर्म, पंथ, पक्ष, प्रदेश, भाषा या सर्व संकुचित निष्ठांच्या पलिकडे मानवतेचं एक निरामय जग आहे. त्या दिशेने समाजातील, देशातील सर्वांचाच प्रवास होत जावो. अन् तुमच्या-माझ्या मनातील प्रेमभाव हा ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, असा साने गुरुजींच्या प्रार्थनेसारखा वैश्विक होत जावो, अशा भावना दिपाली-किशोरने मटा ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केल्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.