Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Career In Research: बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी संशोधनात करिअरच्या संधी

6

Career In Research: दरवर्षी लाखो विद्यार्थी शास्त्र शाखा निवडतात; पण त्यातील बोटावर मोजता येईल, एवढ्याच विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे असतो; कारण विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही या क्षेत्रात पैसा; प्रतिष्ठा मिळत नाही, असे वाटत असते. ‘करोना’ने जगभर घातलेल्या धूमाकुळानंतर त्यावर उपाय शोधण्याची जगभर जी धडपड सुरू आहे, त्यामुळे आता भारतातही मूलभूत संशोधनाकडे वळण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, अशी अपेक्षा आहे.

१. आयसर संस्था

१२वीनंतर संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने देशभरात बेहरामपूर, भोपाळ, कोलकाता, मोहाली; पुणे, थिरूवनंतपूरम आणि तिरुपती या ७ ठिकाणी आयसर या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांत बारावीनंतर ४ वर्षांचा पदवी कोर्स, तर पाच वर्षांचा मास्टर्स कोर्स उपलब्ध आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, गणित; जीओलॉजी, डाटा सायन्स, पर्यावरणशास्त्र या विषयांत मास्टर्स कोर्स, तर इंजीनीरिंग सायन्स आणि इकॉनॉमिक सायन्स या विषयांत भोपाळ येथे पदवी कोर्स उपलब्ध आहे. मास्टर्स कोर्ससाठी देशभरातील या सर्व संस्थांत मिळून १६६२ जागा उपलब्ध आहेत, तर पदवी कोर्ससाठी भोपाळ येथे ११५ जागा उपलब्ध आहेत.

या संस्थांत तीन मार्गांनी प्रवेश मिळू शकतो. २५ टक्के जागा या जेईई (अॅडव्हान्स) या परीक्षेतील मेरीटवर; २५ टक्के जागा या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या परीक्षेतील मेरीटवर उपलब्ध आहेत, तर उर्वरित ५० टक्के जागा आयसर देशपातळीवर घेणार असलेल्या प्रवेश परीक्षेतून उपलब्ध आहेत. ही प्रवेशपरीक्षा पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नागपूर, अमरावती या केंद्रांवर ३१ मे २०२० रोजी घेतली जाणार आहे. (करोना साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे जाऊ शकते.) परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने ३० एप्रिल २०२० पर्यंत www.iiseradmission.in या संकेतस्थळावरून भरता येईल. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

या प्रवेश परीक्षेसाठी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स व गणित या चारही विषयांचा अभ्यासक्रम असेल आणि परीक्षेत सर्व विषयांना समान न्याय असेल. या तीन तासांच्या परीक्षेत प्रत्येक विषयावर १५ प्रश्न असतील. बरोबर उत्तरास ३ गुण मिळतील, तर चुकीच्या उत्तरांचा प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल. ११वी व १२वीच्या ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी कोणत्याही बोर्डासाठी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बसता येईल. मात्र, १२वी बोर्डाच्या वेळी असणाऱ्या गुणांच्या आधारे प्रवेशासाठी पात्रता असेल. १२वी बोर्डाचा निकाल घोषित झाल्यावर प्रत्येक बोर्डाचा स्वतंत्र ‘कट ऑफ’ जाहीर करण्यात येईल. यात विद्यार्थ्यांचे ५०० पैकी गुण धरले जातील. यात केमिस्ट्री, फिजिक्स; बायोलॉजी किंवा गणित; इंग्लिश आणि जास्तीत जास्त गुण असणारा पाचवा विषय अशा ५०० गुणांमधून बोर्डप्रमाणे गुणवत्ता यादी करून, त्यातील पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आयसर परीक्षेतून प्रवेशासाठी पात्र समजले जाईल. आयसर परीक्षेतील गुणांवर बोर्ड परीक्षेतून पात्र विद्यार्थ्यांची ‘मेरीट लिस्ट’ करण्यात येईल आणि मग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे या ७ संस्थांचा पसंतीक्रम देता येईल.

विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम आणि आयसर परीक्षेतील गुणांवर आधारित मेरीट याच्यावर संस्थेत प्रवेश निश्चित होईल. या संस्थेतील प्रवेशासाठी सरकारच्या नियमाप्रमाणे आरक्षण असेल. या संस्थांत शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. या संस्थांना सरकारची भरीव मदत मिळत असल्याने अत्यंत दर्जेदार शिक्षणव्यवस्था येथे उपलब्ध आहे.

२. नायसर संस्था

१२वीनंतर संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने मुंबई आणि भुवनेश्वर या दोन ठिकाणी ‘नायसर’ या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांत बारावीनंतर पाच वर्षांचा मास्टर्स कोर्स उपलब्ध आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स व गणित या विषयांमध्ये मास्टर्स कोर्स करण्याची संधी या दोन ठिकाणी उपलब्ध आहे. ‘मास्टर्स कोर्स’साठी या दोन संस्थांत मिळून २५७ जागा उपलब्ध आहेत. या संस्थांमधील प्रवेशासाठी नायसर देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेणार आहे. ही प्रवेश परीक्षा पुणे, मुंबई आणि नागपूर या केंद्रांवर शनिवार ६ जून २०२० रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने १९ एप्रिल २०२० पर्यंत www.nestexam.in या संकेतस्थळावरून भरता येईल. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स; तसेच आधीच्या वर्षांचे पेपर्स संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स व गणित या चारही विषयांचा अभ्यासक्रम असेल आणि परीक्षेत सर्व विषयांना समान न्याय असेल.

या साडे तीन तासांच्या परीक्षेत पाच विभाग असतील. पहिला विभाग ३० गुणांचा जनरल पेपर असेल, तर बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स व गणित या प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ५० गुणांचा एक विभाग असेल. अंतिम गुणवत्ता यादी करताना जनरल पेपरचे गुण आणि उरलेल्या ४ पैकी सर्वोत्तम ३ विभागांचे गुण धरले जातील. मात्र, प्रत्येक विभागात किमान गुण मिळवणे आवश्यक असेल. परीक्षेचा निकाल १६ जून २०२० रोजी घोषित होईल. ११ वी व १२ वीच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी कोणत्याही बोर्डासाठी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बसता येईल. मात्र, १२ वी बोर्डाला किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. या संस्थांतील प्रवेशासाठी सरकारच्या नियमाप्रमाणे आरक्षण असेल. या संस्थांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते; तसेच २० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळतो. या संस्थांना सरकारची भरीव मदत मिळत असल्याने अत्यंत दर्जेदार शिक्षणव्यवस्था येथे उपलब्ध आहे.

सरकारच्या प्रयत्नांना हवी साथ

– जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे.

– समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संशोधन करून उत्तरे शोधावीत.

– यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना विद्यार्थी आणि पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे.

– या दर्जेदार संस्थांतून संशोधन क्षेत्रात पदार्पण केल्यास भविष्यात भारताचा अनेक वर्षांचा शास्त्र विभागातील नोबेल पारितोषिकाचा दुष्काळ संपू शकेल.

-विवेक वेलणकर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.