Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजप-मनसे युती खरंच होईल?

8

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट राज्यातील राजकारण नव्या वळणावर असल्याचे संकेत देणारी आहे. मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाकरे-पाटील भेटीनंतर भाजपमध्येही हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार दिल्लीत पोहोचले आहेत. या भेटीगाठींमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकांची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करायचंच असा चंग भाजपनं बांधला आहे. त्यात भाजपला मनसेची साथ मिळते का हा कळीचा प्रश्न आहे.

​भूमिकांचा खेळ

मनसे व भाजपच्या युतीचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सांगितलं. मात्र, आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचंही सांगितलं. एकमेकांच्या भूमिका समजून घेतल्या, असं ते म्हणाले. युतीचा प्रस्ताव नाही, मग एकमेकांच्या भूमिका जाणून घेण्याची गरजच काय? असा प्रश्न सहजच उपस्थित होतो. त्यामुळं पाटील यांचं म्हणणं पटण्यासारखं नाही. मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका अडसर युतीत अडसर असल्याचं बोललं जातंय.

​अशक्य काहीच नाही!

राजकारणात काहीही अशक्य नसतं, असं म्हणतात. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप-पीडीपी युती, लालूप्रसाद यादव-नितीशकुमार युती, मायावती-मुलायम युती ही सगळी उदाहरणं हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. यापैकी कोणाच्याही राजकीय भूमिका एकमेकांशी मेळ खाणाऱ्या नाहीत. तरीही हे सगळे एकत्र आले. त्यामुळं भूमिकांचा अडसर हा मुद्दा केवळ वातावरण निर्मितीपुरता असू शकतो. ‘किमान समान कार्यक्रम’ हा शब्द वापरला की सगळ्या भूमिका आपोआप गैरलागू ठरतात, हे आता नवीन राहिलेलं नाही.

​मराठी… हिंदुत्व आणि युती

मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे मनसेचं कार्यक्षेत्र आहे. मनसेच्या सुरुवातीचा काही काळ वगळला तर पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी मराठी माणसाची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. मराठी माणसावर अन्यायाचा मुद्दा पुढं करून मनसेनं परप्रांतीयांविरोधात राडेही केले आहेत. त्यामुळं मनसेची प्रतिमा परप्रांतीयविरोधी अशी झाली आहे. भाजपसाठी तो चिंतेचा मुद्दा आहे. मात्र, २५ वर्षांपूर्वी भाजपनं शिवसेनेशी युती केली, तेव्हाही शिवसेनेची प्रतिमा नेमकी अशीच होती. तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करून त्यावर तोडगा काढण्यात आला. यावेळीही तोच फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रझा अकादमीच्या राड्याविरोधात मनसेनं आझाद मैदानात काढलेला मोर्चा, झेंड्यात केलेला बदल, राज ठाकरे यांचं हिंदी भाषण हे सगळे मुद्दे त्यासाठी पुढं केले जाऊ शकतात.

​मनसे साशंक का?

भारतीय जनता पक्ष हा देशातील सध्याचा सर्वात बलाढ्य पक्ष आहे. शून्यातून हा पक्ष इथवर आला आहे. त्यासाठी भाजपनं प्रत्येक राज्यात छोट्या पक्षांशी युत्या, आघाड्या केल्या. मात्र, भाजपनं ज्या-ज्या पक्षांशी युती केली, ते पक्ष एकतर राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले. भाजप हा स्वत:च्या विस्तारासाठी इतर पक्षांचा वापर करतो, अशी एक धारणा भाजपबद्दल बनली आहे. शिवसेना-भाजपमधील दुराव्यामुळं हा समज अधिक दृढ झाला आहे. भाजपशी युती केल्यास भविष्यात मनसेच्या वाढीवर मर्यादा येतील, अशी एक भीती राज ठाकरे यांना असावी.

‘​राज’कीय अपरिहार्यता

राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळं काही वर्षांपूर्वी मनसेला अनेक महापालिकांमध्ये चांगले यश मिळाले होते. मनसेचे १३ आमदारही निवडून आले होते. नाशिकसारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या शहरात मनसेची सत्ताही आली होती. मात्र, केवळ करिष्म्यावर पुन्हा पुन्हा यश मिळणे शक्य नसते, हे नंतरच्या काळात दिसून आले. मनसेनं आतापर्यंत ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतली आहे. अर्थात, राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मनसेला त्यात बदल करण्याची गरज लागणार आहे. पक्ष आणि कार्यकर्ते टिकवून ठेवायचे असतील तर स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. सध्या राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मनसेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळं भाजपशी युती करून मनसेला गमावण्यासारखे काही नाही.

​भाजपला मनसेची गरज किती?

सत्तावाटपाच्या वादातून शिवसेनेनं युती तोडल्यापासून भाजप-शिवसेनेत प्रचंड दुरावा आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून शिवसेनेनं भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुंबई महापालिकेतून शिवसेनेची सत्ता घालवून ह्याचा राजकीय बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अर्थात, शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या सत्तेतून घालवणं सहजसोपी गोष्ट नाही. मागच्या निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढून शिवसेनेला चांगली टक्कर दिली होती. पण, महापौर शिवसेनेचाच झाला. शिवाय, तेव्हाच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे. तेव्हा राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होता. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेनं इतर पक्षातील नगरसेवक गळाला लावून आपली बाजू आणखी भक्कम केली आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदाही भाजपला झाला. आता तो फायदा मिळेल असं कुणी सांगू शकत नाही. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पुण्यात शिवसेना, राष्ट्रवादीला मदत करेल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला मनसेची गरज लागणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.