Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर मुंबई लोकलबाबत केली मोठी घोषणा
- नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा
- लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच मिळणार परवानगी
‘१५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होईल. लशीचे दोन्ही डोस घेऊन किमान १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा असेल. यासाठी आपण एक अॅप तयार करत असून या अॅपच्या आधारे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी पास घेता येईल. तसंच हा पास ऑफलाईन पद्धतीनेही उपलब्ध करण्यात येईल,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
‘सोमवारी आपण टास्क फोर्सकडून आढावा घेणार आहोत. त्यानंतर आणखी कोणते निर्बंध शिथिल करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. याला साधारण ८ ते १० दिवस लागतील. त्यासाठी आपल्या संयम ठेवावा लागेल. अनेकजण हे उघडा…ते उघडा अशा मागण्या करत उचापत्या करत होते, पण जनता त्यांना बळी पडली नाही,’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना करोनाचा धोका अधिक
‘पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अजूनही करोना संसर्ग कायम असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल,’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
– अजून गणपती आणि इतर सण यायचे आहेत. मागील वर्षी सणांनंतर आपण दोन लाटा अनुभवल्या. त्यामुळे या काळापासून आपण शिकलो आहे की करोनाबाबतचे नियम पाळावेच लागतील. आपला लसीकरणाचा वेग अजून वाढत जाणार आहे. जोपर्यंत ठराविक टक्क्यांपर्यंत लसीकरण होणार नाही, तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर्स या सुविधा आपण वाढवल्या आहेत.
– मागील वर्षी पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा हळूहळू रुग्णांची वाढ सुरू झाली.
– काही दिवसांपूर्वी आपण ठराविक जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा वाढवल्या आहेत. तसंच इतर निर्बंधही शिथिल केले आहेत. राज्यातील करोनाची स्थिती संमिश्र आहे. विशेष म्हणजे पूर येऊन गेलेल्या ६ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक असल्याचं दिसत आहेत.
– करोनामुक्तीसाठी आपण याआधीही करोनामुक्त गाव यासारख्या काही योजना राबवल्या होत्या. त्याला अनेक सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.