Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र आणि कामगार दिन, मोहिनी एकादशी

१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ, आंदोलन करण्यात आले. आचार्य अत्र्यांसह अनेक दिग्गज मंडळींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कामगार दिवसही साजरा केला जातो. तसेच वैशाख शुद्ध एकादशीला मोहिनी एकादशी साजरी केली जाते. सोमवार १ मे २०२३ रोजीच मोहिनी एकादशीचे व्रतही केले जाईल.
श्रीनृसिंह जयंती

गुरुवार, ४ मे २०२३ रोजी वैशाख शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी श्रीविष्णूंनी भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार धारण केला होता. म्हणूनच ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी करण्यात येते. राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू याचा वध करण्यासाठी विष्णू नृसिंह अवतारात प्रकट झाले. भक्त प्रल्हाद श्रीविष्णूंचा मोठा भक्त असतो. भक्त प्रल्हादासाठी विष्णू नृसिंह रुपात प्रकट होतात, असे सांगितले जाते. नृसिंह जयंतीला केलेल्या व्रतामुळे सारी दुःखे दूर होतात, अशी मान्यता आहे.
बुद्ध पौर्णिमा

शुक्रवार, ५ मे २०२३ रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. म्हणूनच ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने साजरी केली जाते. बौद्ध धर्मीय ही तिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर कोट्यवधी नागरिकांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कूर्म जयंती साजरी केली जाणार आहे. याच दिवशी वैशाख स्नान समाप्ती होईल.
संकष्ट चतुर्थी

सोमवार, ८ मे रोजी वैशाख वद्य चतुर्थी आहे. या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत करतात. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो.
अपरा एकादशी

सोमवार १५ मे २०२३ रोजी वैशाख वद्य एकादशी आहे. ही तिथी अपरा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे वर्षभर योग्य मार्गदर्शन मिळते, पुण्य मिळते, असे सांगितले जाते.
शनैच्छर जयंती

शुक्रवार, १९ मे रोजी शनैच्छर जयंती आहे. वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी करतात. पौराणिक कथांनुसार वैशाख अमावास्येला शनीचा जन्म झाला होता. या दिवशी विधीपूर्वक शनिदेवाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि शनिदेवाची कृपाही प्राप्त होते.
विनायक चतुर्थी

मंगळवार, २३ मे २०२३ रोजी ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या मंगळवारी पडणाऱ्या चतुर्थीला अंगारकी योग आहे.
निर्जला एकादशी

ज्येष्ठ मासातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी निर्जला एकादशी या नावाने साजरी केली जाते. बुधवार, ३१ मे २०२३ रोजी निर्जला एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्रीविष्णूंची उपासना केली जाते. पुराणात निर्जला एकादशीचे महत्त्व विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती देखील साजरी केली जाईल.
विवाह मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यात काही शुभ मुहूर्त आहेत, ज्या दिवशी लग्न करणे खूप शुभ मानले जाते. या मे महिन्यात २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३० या विवाहाच्या तारखा आहेत.