Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आषाढी वारी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्

10

पुणे दि.२५: पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा-२०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत. पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिका वाढवाव्यात. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात.

पुणे शहरात महानगरपालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप (पेंडॉल) टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्याच्या दरम्यान अशी व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

आळंदी, देहू, सासवड आदी ठिकाणी पालखीप्रस्थानापूर्वी मुक्कामास येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. पालखीच्या अनुषंगाने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावरील गावांना देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधूतून वा जिल्हा परिषदेने निधी देण्याच्या अनुषंगाने पर्याय तपासून कार्यवाही करावी, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच अन्य सर्व पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावेत, साईड पट्‌ट्या भराव्यात. रस्त्यांच्या डागडुजीचे प्रस्ताव तात्काळ सादर करून पालखी प्रस्थानापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन घ्या. हरीत वारी आणि निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग घ्यावा. १० हजार वृक्षलागवडीचे नियोजन करा, असेही पालकमंत्री म्हणाले.

जी-२० परिषदेअंतर्गत ‘डिजिटल इकॉनॉमी’ गटाची बैठक ११ ते १३ जूनदरम्यान पुणे येथे होत असून या कालवधीत पालख्या पुणे येथे मुक्कामी आहेत. यावेळी जी-२० बैठकीसाठी २५ देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. दोन्हींच्या अनुषंगाने पोलीसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून परदेशी पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

*माहिती संवादासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा-राधाकृष्ण विखे पाटील*
पालखीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख व संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका डिजिटल स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावी. भाविकांना कोणत्याही समस्येच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना अडचण येऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. राव यांनी वारी सोहळ्याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा टँकर, शौचालयांची संख्या वाढवली असून शौचालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

*पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात*
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. सासवड येथील कऱ्हा नदीवरील पूलाचे काम झाले असून पोहोच रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. ५ जूनपूर्वी हे काम पूर्ण होऊन यावर्षी पालखी पुलावरुन जाईल. जेजुरी पालखी तळाच्या विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी आणि संत सोपान महाराज पालखीसाठी मिळून दररोज २ हजार ७०० शौचालयांची पालखी मुक्कामी उभारणी करण्यात येणार आहे.

दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. ‘डायल १०८’ सेवेच्या एकूण ३० आणि १०२ सेवेच्या एकूण ११० रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या असून दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी ३९ आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण २४ पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, ३३ औषधोपचार उपकेंद्रे, २ फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी १४६ पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल नेटवर्क अडचणी येऊ नये यासाठी मोबाईल कंपन्यांना अतिरिक्त व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालख्यांसाठी संदेशवहनासाठी बिनतारी संदेशवहन यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

*आषाढी वारी ॲप*
पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

*सातारा जिल्ह्यातील नियोजन*
सातारचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी तळांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

*सोलापूर जिल्ह्यातील नियोजन*
दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ५१ ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. दर्शन रांगासाठी भाविकांसाठी पत्रा शेड तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री.पाटील आणि श्री. विखे पाटील यांनी दिले. बैठकीस तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
0000

Leave A Reply

Your email address will not be published.