Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘जमशेदजी टाटा आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते’; मुंबई विद्यापीठ आणि विज्ञान भारती यांच्या कार्यक्रमात राज्यपालांचे प्रतिपादन

10

देश पारतंत्र्यात असताना अनेक अडचणींवर मात करीत देशात उद्योग साम्राज्य उभे करणारे, तसेच बंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे उद्योगपती जमशेदजी टाटा हे आत्मनिर्भर भारताचे आद्य पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबई विद्यापीठ तसेच विज्ञान भारती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा’ या विषयावरील एका परिसंवादाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत सोमवार, ७ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

परिसंवादाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, सीएसआयआरचे माजी संचालक तसेच विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शेखर मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरु प्रा. अजय भामरे तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

कृत्रिम प्रज्ञा व यंत्र शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अटळ आहे. लिखाण, वाचन व अंकगणित ही कौशल्ये मागे पडतील. एका अहवालानुसार जगभरात ४० ते ८० कोटी नोकऱ्या बाधित होतील तरअनेक लोकांना इतर क्षेत्रात काम करावे लागेल, असे नमूद करून सद्य युगात टिकण्यासाठी प्रत्येकाला एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी लागतील तसेच सातत्याने नवनव्या गोष्टी शिकत राहावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने शिक्षणात अनुरूप बदल करावे लागतील तसेच कौशल्य शिक्षण व कौशल्य अद्ययावतीकरण करण्यासाठी योजना आखावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

(वाचा : SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार नववी ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम; जाणून घ्या कसे)

शिक्षण संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे असे सांगून देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी उत्पादन, सेवा व कृषी क्षेत्रात संशोधन, नवीनता व उद्यमशीलतेला चालना द्यावी लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

जमशेदजी टाटा यांनी व्यापारापेक्षा उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले : डॉ अनिल काकोडकर उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी निव्वळ व्यापारी मानसिकता न ठेवता उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले , त्यामुळे नीतिमत्ता व मूल्यांवर आधारित एका प्रगत समाजाची निर्मिती झाली, असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले.

देश स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना देशाने जमशेदजी टाटा यांचा उद्यमशीलतेचा व सामाजिक दायित्वाचा वारसा स्मरणात ठेवावा व आर्थिक असमानता तसेच शहरी – ग्रामीण दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. इतरांची नक्कल केली तर आपण क्रमांक दोन वर राहू असे सांगून आपण पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी प्रयत्न करुन देशाला पुढे नेले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात वैज्ञानिकांची भूमिका महत्वाची होती. त्यांचे कार्य व चरित्र समाजापुढे आणण्याचे कार्य विज्ञान भारती करीत आहे असे विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शेखर मांडे यांनी यावेळी सांगितले. स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा यांनी विज्ञानाला प्रोत्साहन दिले असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ मांडे यांनी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ परीक्षा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले

(वाचा : Success Story : आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय काम; देशसेवेसाठी या अभिनेत्रीने सोडले मनोरंजनविश्व)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.