Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवकाशातील खगोल घटना अतिशय सुंदर, परंतु दरवर्षी वेगवेगळ्या असतात. २०२४ या पुढील वर्षात येणाऱ्या घटनासुद्धा अशाच मनमोहक राहणार आहेत. नवीन वर्षात गूढ असणारे धुमकेतू आणि उल्का वर्षाव, सुंदर ग्रह दर्शन आणि युती-प्रतियुती, पिधान, पौर्णिमा, ब्लू मून, सुपरमून आणि सूर्य आणि चंद्रग्रहणे पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
नव्या वर्षात १० पैकी ५ धुमकेतू बघण्याची संधी राहणार आहे. २०२४ मध्ये जवळ जवळ १० धुमकेतू सूर्याच्या जवळ येत असले तरी ५ धुमकेतू पृथ्वीच्या थोड्या जवळ येतील. तेव्हा साध्या दुर्बिणीने किंवा द्विनेत्रीने बघण्याची संधी आहे. यातील २ धुमकेतू साध्या डोळ्यानेदेखील दिसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी भारतातून केवळ एक खंडग्रास ग्रहण दिसेल आणि तेही केवळ पश्चिम भारतातूनच दिसेल. १७-१८ सप्टेंबर २०२४चे खंडग्रास चंद्रग्रहण हे केवळ पश्चिम भारतातून दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणानी खगोलप्रेमींची निराशा केली आहे असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
उल्का वर्षाव अवकाशातील गूढ आणि कुतूहलाच्या खगोलीय घटना असतात. हा दरवर्षी घडणारा उल्का वर्षाव कमी अधिक प्रमाणात दिसणार आहे. निरभ्र रात्री चंद्र आणि ग्रहांची युती या नियमित दिसणाऱ्या घटना आहेत. मात्र, अगदी जवळून घडणाऱ्या युती मात्र दुर्लभ असतात. बहुतेक युती या चंद्रासोबत दिसतात. प्रतियुती मात्र बाह्य ग्रहांच्या बाबतीत घडतात. त्यात तेजस्वी दिसणाऱ्या गुरु आणि शनी ग्रहाचीच युती मनोहारी असणार आहे.
पृथ्वीच्या सूर्याभोवती, स्वत:भोवती फिरण्यामुळे तसेच ग्रहांच्या फिरण्यामुळे ग्रहांच्या वेळा वर्षभर प्रत्येक महिन्यात बदलत असतात. त्यासाठी निरीक्षकांचे सातत्याने निरीक्षण असेल तर सहज ग्रहांच्या वेळा कळतात. पौर्णिमा दर महिन्याला घडणाऱ्या घटना असल्या तरी प्रत्येक पौर्णिमा ही सारखी नसते. कधी चंद्र लहान तर कधी तो खूप मोठा दिसतो. ब्लू मूनला चंद्र निळा दिसत नसून एकाच महिन्यांतील दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. सुपरमून हा पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या आणि मोठा चंद्र दिसणाऱ्या पौर्णिमेला म्हणतात. या सर्व घटना वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि मनोहारी असतात. २५ जानेवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २४ फेब्रुवारीला लघु चंद्र पौर्णिमा, २५ मार्चला लघु चंद्र पौर्णिमा, २३ एप्रिलला पौर्णिमा, १९ ऑगस्टला सुपरब्लू मून, १७ ऑक्टोबर सुपर मून दिसणार आहे.
इस्रोच्या मोहिमा
भारताची जगप्रसिद्ध खगोल संस्था इस्रो ही तिच्या विविध उपग्रहीय आणि ग्रहीय यशस्वी मोहिमेमुळे गाजत आहे. २०२४ मध्ये आदित्य एल १, इनसँट ३ डीएस, गगनयान १ चाचणी, निसार उपग्रह प्रक्षेपण, स्पाडेक्स उपग्रह, मंगळयान, शुक्रयान, एक्सपोसँट अवकाश वेधशाळा या मोहिमा होणार आहेत.
संपात दिवस, अयनदिन व इतर घटना
संपात दिवस म्हणजे ज्या दिवशी सूर्य २० मार्च आणि २२ सप्टेंबरला विषुववृत्तावर येतो तो दिवस या दिवशी थोड्या फार फरकाने दिवस-रात्र समान असते. अयनदिन २१ जून आणि २२ डिसेंबर या दिवशी येतात. उत्तरायण संपते तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र लहान तर दक्षिणायन संपते तेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी असते. ३ जानेवारीला पृथ्वी सूर्याजवळ, २० मार्चला संपात दिन, ९ मे ला बुध क्षितिजावर सर्वाधिक वर, २१ जूनला अयन दिन, २२ सप्टेबरला संपात दिन, २१ डिसेंबरला अयन दिन असेल, असे स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.