Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रत्नागिरीतील कातळशिल्पांचे ‘नाणे’ खणखणीत; शिल्पकार मुकेश पुरो यांचा फाइन मास्टर आर्टिस्ट पुरस्काराने गौरव
गिरगावातील मुंबई कला विद्यालयाचे प्राचार्य असलेल्या पुरो यांनी अनेक वर्षे त्यांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. मात्र रत्नागिरीमध्ये एका प्रदर्शनाला भेट दिली असता, त्यांना कातळशिल्पांबद्दल माहिती मिळाली. डॉ. सुधीर रिसबूड या कातळशिल्प अभ्यासकांच्या मदतीने त्यांनी याबद्दल अधिक अभ्यास केला आणि कातळशिल्पांची माहिती जगभरात पोहोचावी या इच्छेने यंदा स्वतः या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सहा महिन्यांच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर डिसेंबरमध्ये स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. पुरो यांना ‘फाइन मास्टर आर्टिस्ट’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
जमिनीलगतच्या फोटोंवरून कातळशिल्पे पूर्वी प्रकाशझोतात येत नव्हती. मात्र, ड्रोनच्या साह्याने आकाशातून जेव्हा या निर्मितीचे फोटो काढले जाऊ लागले तेव्हा त्यांचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले. ही कातळशिल्पे घडवण्यासाठी वेगवेगळी तंत्रे, पद्धती वापरल्या जातात. त्याची माहिती घेऊन या स्पर्धेमध्ये पुरो यांनी प्रबंधही सादर केला. त्यामुळे या नाण्याला अधिक उठाव मिळाला, असे त्यांनी सांगितले.
‘जपानी टांकसाळ’ आयोजित या स्पर्धेमध्ये स्वतःच्याच देशातील संकल्पनेचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक असते. या निमित्ताने कातळशिल्पांची महती जागतिक स्तरावर पोहोचून जगभरात असे प्रयोग कुठे झाले आहेत का याबद्दलची माहिती समोर येईल. तसेच, या नाण्यांवरील कातळशिल्पे जगभरात पोहोचली तर त्या माध्यमातून परदेशी पर्यटकही कोकणापर्यंत पोहोचतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा या सन्मानाच्या निमित्ताने पुरो यांनी व्यक्त केली.
अशी असते स्पर्धाप्रक्रिया…
नाणेनिर्मितीच्या या स्पर्धेची प्रक्रिया साधारण सहा महिने चालते. विविध देशांमधून शिल्पकार नाण्यांसाठी रेखाचित्रे सादर करतात. त्यातून सप्टेंबरमध्ये काही रेखाचित्रांची निवड करून दुसरा टप्पा सुरू होतो. संस्थेने दिलेल्या साहित्याच्या माध्यमातूनच हे नाणे कोरावे लागते. याचा व्यास १० सेंटीमीटर असून, उंची एक मिलीमीटर असते. यामध्ये निवडलेला आकार, चित्र कोरावे लागते. दरवर्षी या स्पर्धेतून पाच अंतिम विजेते निवडले जातात व जपानी सरकार त्यांची नाणी वस्तुसंग्रहालय, नाणीसंग्राहक यांच्यासाठी निर्माण करते. ही नाणी जगभरातील विविध वस्तुसंग्रहालयांमधून विकली जातात.