Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजपकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर उमेदवार असतील, असा दावा केला जात आहे तर काँग्रेसकडून कोण याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मात्र अशोक चव्हाण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. पण अंतिमत: काँग्रेस पक्षश्रेष्ठी अशोक चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्हा हा सुरूवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहिलेलं आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची हवा असताना देखील महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन जागा निवडणून आल्या. त्यातील एक नांदेड आणि दुसरी हिंगोली… काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डी. बी. पाटील यांचा पराभव केला होता.
दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावत लोकसभेची जागा जिंकली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना ४० हजाराहून अधिक मताने पराभूत केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत वंचितच्या मतांचा काँग्रेसला मोठा फटका बसला होता. कारण वंचित आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजाराहून अधिक मतं घेतली होती. दलित समाजाची मतं प्रा. भिंगे यांना पडल्याने अशोक चव्हाण यांना चांगलाच फटका बसला होता. तर भिंगे यांना मिळालेलं मतदान हे प्रताप पाटील चिखलीकर यांना पुरक ठरलं होतं. या निवडणुकीत चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ एवढी मतं पडली. तर अशोक चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते पडली होती. त्यामुळे २०२४ ला मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काँग्रेस घेईलका ? प्रताप पाटील चिखलीकर विजयी घोडदौड सुरु ठेवतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळीसुधा भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच खरी चुरस असणार आहे.
काँग्रेसने मिळविलेले यश
आतापर्यंतच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ११ वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळेस विरोधक विजयी झाले आहेत. १९६२, १९६७ १९७१, १९८०, १९८४, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००९,२०१४ या निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व राखलं होतं.
सध्याचे बलाबल
जिल्ह्यात ९ विधानसभा क्षेत्र आहेत, त्यातील ७ विधानसभा क्षेत्र हे लोकसभा क्षेत्रात येतात. या सात विधानसभेमध्ये ४ काँग्रेस, २ भाजपा, शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची पकड आहे. याचा फायदा लोकसभेत काँग्रेसला होणार का हे पहावं लागणार आहे.
वंचित-बीआरएस भूमिकेकडे लक्ष
महाराष्ट्रात एमआयएमचा विस्तार झाला नांदेडपासून… नांदेडमधील मुस्लीम मते काँग्रेससाठी निर्णायक असतात. एमआयएम किती मतांचे विभाजन करते हे महत्त्वाचे आहे. गेल्या वेळी वंचित- एमआयएम आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक मतांमुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. आता बीआरएसचा विस्तारालाही नांदेडमधून सुरूवात झाली आहे. बीआरएसमुळे सीमावर्ती तालुका असलेल्या धर्माबाद, देगलूर, बिलोली, हिमायतनगर, भोकर या तालुक्यात याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. यामुळेच यंदा किती मतांचे विभाजन होते यावरही निकाल अवलंबून असेल. तर लोकसभा निवडणुकीत वंचित मैदानात उतरल्यास काँग्रेसला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.