Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २ हजार ९१६ बस असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टचे एसी प्रवासाचे पाच किमीपर्यंतचे तिकीट सहा रुपये आणि विनावातानुकुलित बसचे पाच रुपये आहे. तरीही अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करण्याचे धाडस करतात. मात्र तिकीट तपासणीच्या जाळ्यात हे प्रवासी अडकतात. अशा विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. १ जानेवारीला ९६८, तर २ जानेवारीला ९४५ विनातिकीट प्रवाशांची धरपकड केली होती. ४ जानेवारीला सर्वाधिक १ हजार ३१ विनातिकीट प्रवासी तिकीट तपासनीसांच्या जाळ्यात अडकले होते. १४ जानेवारीपर्यंत एकूण १२ हजार १०४ विनातिकीट प्रवाशांना पकडल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. यासाठी तिकीट तपासनीसांनी ४ हजार ७३४ तपासण्या केल्या. बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेल्या प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रक्कमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येतो. दंड भरण्यास नकार दिल्यास मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून १२ हजार १०४ रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली.
तिकीट निरीक्षकांची नेमणूक
विशेष तिकीट मोहीम राबवताना बेस्ट उपक्रमाने अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची मुंबईच्या विविध भागातील गर्दीच्या ठिकाणातील बसस्थानकांवर नेमणूक केली आहे. याअंतर्गत उपक्रमाने विशेष पथके तयार केली असून यामध्ये ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणीसाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक केली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्याचे काम सोपे होत आहे.
वाहक नसल्याने अडचण
बेस्ट उपक्रमाकडून सध्या ५७ पेक्षा अधिक मार्गांवर विनावाहक बससेवा सुरू आहेत. या सेवेचाही काही प्रवासी गैरफायदा घेतात. तर विनावाहक सेवा देताना बेस्ट उपक्रमाचे नियोजनही फसत आहे. यात बसमध्ये वाहक नसल्याने बस थांब्यावरच उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मधल्या थांब्यावर गर्दीच्या वेळी काही प्रवासी वाहकाची नजर चुकवून बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात. तर काही वेळा बस थांब्यावर तिकीट देण्यासाठी वाहक उपलब्ध नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही.