Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. २००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतर बाहेरील उमेदवारांचा शिर्डी मतदार संघावर जास्त डोळा राहिलाय. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिर्डीचे सेनेचे खा. सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने सेनेच्या ठाकरे गटाकडून इच्छुकांची संख्या वाढली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि आरपीआय देखील मतदारसंघावर दावा करत आहे. गेल्या तीन टर्म युती आणि आघाडी म्हणून लढत होत असल्याने शिर्डी मतदारसंघ युतीकडून शिवसेनेला आणि आघाडीकडून काँग्रेसला सुटतो आहे. मात्र आता राजकीय समीकरण बदललेली असताना महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाल्याने शिर्डीच्या जागेचा तिढा सोडविण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षाच्या पक्षश्रेष्ठींसमोर उभे राहिले आहे.
पुन्हा २००९ ची लढत? मात्र युती आघाड्यांची समीकरणे बदलेली!
२००९ साली शिवसेना भाजप युतीकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि काँग्रेस आरपीआय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात थेट लढत होऊन भाऊसाहेब वाकचौरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ ला वाकचौरेंनी काँग्रेसचा हाथ धरला आणि शिवसेनेला आयत्यावेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली. मोदी लाटेत लोखंडे अवघ्या १७ दिवसात खासदार झाले. त्यानंतर २०१९ साली काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे उभे होते मात्र त्यांना धोबीपछाड देत पुन्हा लोखंडे खासदार झाले. मात्र यंदा २०२४ मध्ये हा मतदारसंघ मविआकडून ठाकरे गटाकडे आणि महायुतीकडून आरपीआयला मिळाला आणि वाकचौरेंना उमेदवारी मिळाली तर २००९ ची लढत अर्थात भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध रामदास आठवले लढत शिर्डीत पुन्हा पाहायला मिळू शकते. मात्र यंदा उमेदवारांच्या पक्षाची युती आघाडी बदलेली असेल.
महायुतीची ताकद वाढलेली मात्र ठाकरे-पवारांना सहानुभूती
२०१९ च्या विधानसभेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व बघायला मिळाले. शिर्डी मतदार संघ वगळता सर्वच ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख निवडून आले आणि महाविकास आघाडीत गडाखांनी शिवसेनेकडून मंत्रिपद भूषवलं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अकोल्याचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद सध्या वाढलेली दिसत आहे. तर संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर येथे काँग्रेसचे लहू कानडे आणि नेवासा येथे शंकराव गडाख महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिर्डी लोकसभेवर महायुतीची ताकद दिसत असली तरी मात्र पक्षफुटीमुळे तसेच शेतकरी प्रश्न ,बेरोजगारी महागाई अशा अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना देखील सहानुभूती असल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.
या दिग्गज नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
अकोले येथे भाजपचे मधुकरराव पिचड तर अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे, संगमनेर येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राहाता येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव येथे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे, नेवासा येथे ठाकरे गटाचे आमदार शंकराव गडाख आणि भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे दिग्गज नेते या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात आणि कोणत्या उमेदवाराला मदत करतात हे पाहणं महत्वाचं असेल.