Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मागील दोन वर्षांपूर्वी वातावरण निर्मिती करताना ‘ए फॉर अमेठी’ व ‘बी फॉर ‘बारामती अशी स्लोगन वापरली. अर्थातच सत्ताधारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामुळे कमालीचे अस्वस्थ बनले होते. अर्थात त्यामध्ये अजित पवारांचा त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये समावेश होता. भारतीय जनता पक्षाने कितीही आदळापट केली तरी फरक पडणार नाही. हा एक कार्यकर्त्यांचा वर्ग एकीकडे असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची या मतदारसंघासाठी निवड केली होती. त्यामुळे तर हा मतदारसंघ ‘हाय व्होल्टेज’ अशाच स्वरूपाचा ठरला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. मात्र त्याची वातावरण निर्मिती नंतरच्या काळात टिकली नाही. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाणं पसंत केलं.
अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीची ताकद दुभागली गेलेली आहे. दुसरीकडे लोकसभा मतदारसंघातील खडकवासला, दौंड हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद असली तरी देखील इंदापूर, बारामती वगळता त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचा आमदार नाही आणि आता तर बारामतीतून स्वत: अजित पवार तर इंदापूरमधून दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाच्या समर्थनात आहेत. केवळ पुरंदर आणि भोरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, जे सुप्रिया सुळे यांना आघाडीत लढल्यास मदत करू शकतात. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक खडतर मानली जात आहे. मात्र जर निवडणुकीपर्यंत समीकरणे बदलली आणि सहानभूतीचा डाव राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला तर बारामतीत पुन्हा सुळे गुलाल उधळू शकतात.
आता दुसरा मुद्दा- अजित पवार यांनी बारामतीची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी उमेदवाराची अद्यापही घोषणा केली नाही. जर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, अथवा पार्थ पवार उमेदवार असतील तर पवार कुटुंबातच ही लढाई होईल.
मात्र सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघात गेली काही वर्षांपासून सातत्याने संपर्क ठेवलेला आहे. त्यात सुळे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असेल तर त्यांना पराभूत करणं अजित पवार गटासाठी तेवढं सोपं नसेल, असंही राजकीय जाणकार सांगतात.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात काय होऊ शकतं?
बारामतीत अजित पवार यांची मोठी पॉवर आहे. जर अजित पवार यांच्या गटाने सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार दिला तर मात्र तगडी टक्कर होऊ शकते. पण जर भाजपचा उमेदवार असेल तर मात्र राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपचं कितपत काम करू शकतो, याबद्दल सध्या तरी शंका आहे. इकडे खडकवासल्यात भीमराव तापकीर यांच्या रुपाने भाजप मजबूत पाय रोवून उभी आहे. भाजपचा उमेदवार असेल तर खडवासल्यात कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून काम करतील आणि अजित पवार यांचा उमेदवार असेल तरीही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना ‘वरील आदेशानुसार’ काम करावंच लागेल.
इंदापूरमध्ये जेव्हा जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा आघाडीचा धर्म म्हणून हर्षवर्धन पाटलांनी तो पाळला. हर्षवर्धन पाटील हे आघाडीच्या तत्कालीन व्यासपीठावर गेले खरे मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचे काम केलेच नाही, असा आरोप सातत्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी इंदापुरात ना हर्षवर्धन पाटील बरोबर आहेत ना दत्तात्रय भरणे… अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे किती मताधिक्य मिळवतात याची उत्सुकता आहे.
इकडे दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल आणि अजितदादांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात हे दोघेही महायुतीने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार आहेत. आतापर्यंत प्रतिस्पर्धी राहिलेले थोरात-कुल दोघेही महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार असल्याने शरद पवार गटासमोर पर्यायाने सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. दौंड तालुक्याचे चित्र पाहायला गेल्यास या ठिकाणी आता तरी राहुल कुल यांचा बराच वरचष्मा दिसतो. परंतु या ठिकाणी गटातटाचे राजकारण प्रचंड विखुरलेले आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातच दोन उमेदवार असतील तर निवडायचे कोणाला यावरून देखील या दोन गटातच आणखी संभ्रम होऊ शकतो, अशी सध्यातरी चर्चा आहे. एकंदरीत जुने जाणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सहानुभूतीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडे येतील अशा स्वरूपाची चर्चा सध्या या परिसरात दिसते तर दुसरीकडे दोघांमधील वादाचा फायदा सुप्रिया सुळे किती उचलतात यावरच त्यांची या मतदारसंघातील स्थिती राहणार आहे.
पुरंदरमध्ये मात्र संजय जगताप याही वेळी सुप्रिया सुळेंच्या मदतीला जाऊ शकतात. कारण महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटक सध्या तुलनेने बऱ्यापैकी एकत्र असल्याचे दिसते.अशा परिस्थितीत पुरंदर मध्ये राष्ट्रवादीची उरलेली पदाधिकाऱ्यांची फळी आणि संजय जगताप यांची काँग्रेस याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो.
भोरमध्ये पवार आणि थोपटे कुटुंबामध्ये तितकसं जमत नाही. परंतु आघाडी धर्म म्हणून थोपटे सुळेंना मदत करत आलेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वीच हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी भोरच्या दौऱ्यात आमदार पिता पुत्रांची भेट घेऊन या ठिकाणी हे डॅमेज कंट्रोल करत महाविकास आघाडीचा धर्म येथे पाळला जाईल अशा स्वरूपाची व्ह्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मागोवा
सन २०१९
उमेदवार | पक्ष | मिळालेली मतं |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी | ६,८३,७०५ |
कांचन कुल | भाजप | ५,२८,७११ |
सन २०१४
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी | ५,२१,५६२ |
महादेव जानकर | महायुती | ४,५१,८४३ |
सन २००९
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी | ४८७८२७ |
कांता नलावडे | भाजप | १५०९९६ |
सन २००४
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
शरद पवार | राष्ट्रवादी | ६३४५५५ |
पृथ्वीराज जाचक | भाजपा | २११५८० |