Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
थंडीमुळे लहान मुलांमध्ये सर्दी, फ्लू, तीव्र स्वरूपाचा ब्रॉंकायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही मुलांमध्ये न्यूमोनिया झालेला दिसतो. हिवाळ्यामध्ये श्वसनविकाराच्या वाढत्या समस्याही अधिक बळावतात. हवामानातील सतत होणाऱ्या बदलांमुळे ज्या मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्या मुलांमध्ये दीर्घकालीन फुप्फुसाचे आजार असल्याचे दिसून येते. दमा, जन्मजात हृदयविकाराचा आजारांसह श्वसनाच्या विकारांमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यताही वाढते. काही मुलांमध्ये फुप्फुसांचे गंभीर स्वरूपाचे आजार बळावू शकतात. कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी लहान मुलांमध्ये योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
हिवाळ्यामध्ये मुलांना पोटाचा फ्लू होऊ नये याासठी त्यांच्या आरोग्याची योग्यपक्रारे काळजी घ्यायला हवी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अनेक रुग्णांमध्ये खोकला तसेच श्वसनविकाराच्या संदर्भातील समस्यांमध्ये वाढ होताना दिसते. मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला मुलांनी बळी पडू नये, यासाठी त्यांना पोषक आहारही द्यायला हवा. मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले किंवा त्यांना सतत उलट्या होत असतील तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने विषाणूच्या प्रसारासाठी हे वातावरण अनुकूल असते. लहान मुले या विषाणूच्या त्वरित संपर्कात येतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये पोटाचा फ्लू, गॅस्ट्रो एन्टेरिटिससंबंधी समस्या आणि श्वसनाचे विकार होण्याची अधिक शकता असते. श्वसनासंबंधी एक आजार म्हणजे ब्रॉन्किओलायटिसचा लहान मुलांना अधिक त्रास होतोस असे वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. छाया वजा यांनी सांगितले. त्या अवस्थेत फुप्फुसातील लहान वायूमार्गांची जळजळ होते त्याला ब्रॉन्किओल्स म्हणतात. काही मुलांमध्ये खोकण्याच्या किंवा शिंकण्याच्या माध्यमातून थेंबाद्वारे संसर्ग होतो. नाक वाहणे, ताप अशी लक्षणेही त्यांच्यात आढळतात.
‘ताप अंगावर काढू नका’
अंगदुखी, डोकेदुखी, अॅसिडीटी यांसारख्या लक्षणांसह काही मुलांमध्ये तीव्र स्वरूपाच्या तापाची लक्षणे दिसतात. या स्वरूपाचा ताप हा अंगावर काढू नये. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास करोना चाचणी करावी. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करावेत, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. रोहित पाटील यांनी सांगितले.
ही काळजी घ्यावी…
मुलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी आणि मोकळ्या जागेवर नेऊ नये, अस्वच्छ अन्न आणि गाळलेले पाणी खाणे टाळावे, आजारी मुलाला शाळेत पाठवू नये, जेवण्यापूर्वी हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत, मुलाला पौष्टिक आहार द्यावा, नियमित आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. न्यूमोनिया आणि फ्लू यांसारख्या हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी मुलांचे योग्य लसीकरण करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे एडेनोव्हायरस आणि एन्फ्लूएन्झासारख्या विषाणूंना कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय थंड हवामानामुळे मुलांमध्ये दम्याचा त्रास वाढू शकतो. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुलांमध्ये ताप, उलट्या, पोटात तीव्र वेदना, खोकला, थंडी वाजणे, भूक न लागणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसतात.