Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तटकरे विरुद्ध गीते लढत पुन्हा? रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीत काय होईल?

22

रायगड : रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ हा २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत. गेल्या वेळेला सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव केला होता. मात्र यावेळी ही लोकसभा निवडणूक तटकरे यांच्यासाठी सोपी असणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. सुनील तटकरे यांच्या सारखा मुरब्बी नेत्याचं काय होणार याची उत्सुकता आहे. यावेळीही ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अनंत गीते हेच उमेदवार असतील हेही आता स्पष्ट झालं आहे. गीते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून सभा बैठकांचं सत्र सुरू केलं आहे.

रायगड जिल्ह्यात शेकापचं वर्चस्व आहे. यापूर्वी रायगडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होतं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे या कुलाबा लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वी खासदार राहिले आहेत. २००८ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली. रायगड-रत्नागिरी असा नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून सलग दोन वेळा २०१९ पर्यंत अनंत गीते यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना भाजपा युतीकडून केले होते. यापूर्वी गीते हे जुन्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्म खासदार होते. २००९ मध्ये गीते यांनी ए. आर. अंतुले यांचा पराभव केला तर २०१४ मध्ये त्यांनी सुनील तटकरे यांचा निसटता पराभव केला होता.

वेध लोकसभा निवडणुकीचा: रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुन्हा राऊत की महायुती बाजी मारणार? वाचा संपूर्ण समीकरण
कोणते विधानसभा मतदारसंघ-आमदार कोण?

रत्नागिरी रायगड या लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात.

दोन विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात असून भाजपचे रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शेकापचे धैर्यशील पाटील यांचा पराभव केला होता. पण अलीकडेच झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून महेंद्र दळवी हे अलिबागचे आमदार आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्री खासदार सुनील तटकरे यांच्या सुकन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. लागूनच असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते पक्षप्रतोद भरत गोगावले हे महाडचे आमदार आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे योगेश कदम हे आमदार आहेत तर गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत. एकंदरीत या लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा व अजितदादांचे राष्ट्रवादी या महायुतीचे वर्चस्व असलं तरीही रायगड जिल्ह्यात शेकापची ताकद ही मोठी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना शेकापचे नेते आमदार जयंतभाई पाटील यांचे टॉनिक मिळाले होते तर महाडचे माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. माणिकराव जगताप यांचाही पाठिंबा सुनील तटकरे यांना मिळाला होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

काय असतील तटकरे यांच्या समोरील आव्हाने?

या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुनील गटकरे यांच्यासमोर शेकापचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच यावेळी त्यांना या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या महायुतीकडून पुन्हा उमेदवारी मिळेल किंवा कसे हेही पाहावे लागणार आहे. भाजपाकडून धैर्यशील पाटील यांचे नाव खुद्द भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कामाचा कौतुक करत जाहीरपणे चर्चेत आणलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना काँग्रेसचे माणिकराव जगताप यांचेही बळ मिळालं होतं. मात्र आता कै. माणिकराव जगताप यांच्या कन्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप या ठाकरे गटात सहभागी आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा सामनाही तटकरे यांना करावा लागेल.

वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
मात्र या वेळेला पुन्हा विद्यमान खासदार सुनील तटकरे हे स्वतः दिल्लीत जाण्यासाठी फार मोठे इच्छुक नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आयत्या वेळेला मंत्री आदिती तटकरे यांचेही नाव महायुतीच्या उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतं, असंही राजकीय निरीक्षकांना वाटतं.

या मतदारसंघात कुणबी फॅक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो आणि याच जोरावरती माजी खासदार अनंत गीते यांनी दोन टर्म यशस्वीरित्या जिंकल्या. मात्र तिसऱ्या वेळेला तटकरे यांच्याकडून त्यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. तसेच तटकरे यांच्या घरात ही उमेदवारी पुन्हा मिळाली नाही तरीही जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर असेल.

हा मतदारसंघ पूर्वी रायगड कुलाबा असा मतदारसंघ होता. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ हे नव्याने जोडण्यात आले आहेत. यापूर्वी या रायगड कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शेकापचे वर्चस्व राहिल आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : बारामतीत यंदा भाजप उमेदवार देणार की दादांचा उमेदवार सुप्रियाताईंना नडणार?
या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कुणी कुणी केलं?

पूर्वीच्या या कुलाबा मतदारसंघातून १९५२ साली देशाचे तत्कालीन अर्थमंत्री काँग्रेसचे सीडी देशमुख, १९५७ साली शेकापचे राजाराम बाळकृष्ण राऊत, १९६७ साली नानासाहेब कुंटे हे अपक्ष खासदार होते. १९७१ साली काँग्रेसचे शंकरराव सावंत, १९७७ साली शेकापचे दिनकर पाटील, १९८० शेकापचे ए.टी.पाटील, १९८४ साली शेकापचे दिनकर पाटील, १९८९, १९९१, १९९६ या तीन टर्म काँग्रेसचे बॅरिस्टर ए.आर. अंतुले हे खासदार म्हणून राहिले आहेत. १९९८, १९९९ या दोन टर्म शेकापचे रामशेठ ठाकूर, २००४ साली काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी पुन्हा एकदा या मतदार संघाचे तिसऱ्या वेळेला खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. या मतदारसंघातून सी.डी. देशमुख, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलं आहे. पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिरूर लोकसभेसाठी अनेक इच्छुक, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना आव्हान, उमेदवार कोण?
त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महायुतीमधील राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासाठी सोपी असणार नाही. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे व भाजपाकडून धैर्यशील पाटील अशी दोन नावं प्रामुख्याने या मतदारसंघात चर्चेत आहेत. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या तुलनेत धैर्यशील पाटील यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघात फार मोठा थेट संपर्क नसल्याने हे भाजपाला अडचणीचे ठरू शकते. मात्र या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल यावरच निकालाची गणितं ठरतील हेही नक्की आहे. त्यामुळे ही सगळी राजकीय परिस्थिती लक्षात घेता सुनील तटकरे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला उमेदवारी नाकारण्याची रिस्क महायुतीचे नेते घेणार का? हेही पाहावं लागणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.