Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांनी भेट दिलेले सोमवार पेठेतील श्रीनागेश्वराचे मंदिर पाहताना त्याच्या शेजारील काळाराम मंदिर आपले लक्ष वेधून घेते. तटबंदीवजा बांधकाम, नगारखान्याची जागा पाहता आपण या मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा लाकडी कोरीव सभामंडप आणि तेथील हंड्या-झुंबरे आपल्याला इतिहासात घेऊन जातात. या मंदिराच्या बांधकामाचा नेमका कालावधी ज्ञात नसला, तरी ते सुमारे दोनशे वर्षे जुने असावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. मंदिरातील काळ्या संगमरवरी मूर्ती जितक्या सुबक, तितक्याच देखण्या आणि लक्षवेधी आहेत. काळ्या संगमरवरी मूर्तीमुळेच या मंदिराला ‘काळाराम मंदिर’ नाव दिले असावे.
सभामंडपातून आपण दगडी गाभाऱ्यासमोर जातो, तेव्हा आतील लाकडी महिरपीची नक्षी लक्ष वेधून घेते. प्रभू श्रीराम, सीतामाता आणि भ्राता लक्ष्मण यांच्या मूर्तींचे भाव निरखताना जणू आपण रामायणात हरवून जातो. मंदिरातील नित्यपूजाअर्चा आणि प्रसन्न वातावरण आपल्याला मोहवून टाकते. उत्तर-दक्षिण बांधलेल्या या मंदिराबाहेर व्हरांडा आहे. येथे पार्वती, बालगणराय आणि वटपत्रशायी कृष्ण अर्थात, वटवृक्षाच्या पानावर निजलेली कृष्णाची छबी ही आकर्षक रंगसंगतीतली चित्रेही आपल्याला दिसतात, हे आणखी एक वैशिष्ट्य. ही चित्रे आणि आतील हंड्या-झुंबरांमुळे इतिहासकालीन किंवा पेशवाईतील मंदिरे कशी असतील, याचा अंदाज येतो. गाभाऱ्यातील मूर्तींइतकीच देखणी मूर्ती येथे पाहायला मिळते. मुख्य मूर्तींसमोरच मारुतीरायाचे मंदिर आहे.
मंदिराचा निश्चित कालखंड माहिती नसला, तरी हे खासगी देवस्थान श्रॉफ कुटुंबाचे आहे. गुजरातमधील वडनगर येथून ते पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्याची निर्मिती झाली. त्यांच्याकडेच मंदिराचे व्यवस्थापन आहे. इतिहासात रमण्याची संधी देणारी जी काही ठिकाणे शहरात आहेत, त्यात सोमवारातील या काळाराम मंदिराचाही निश्चितच उल्लेख करावा लागेल.
काळाराम मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे; कारण पुण्यातील प्राचीन नागेश्वर आणि त्यानंतरच्या कालखंडातील त्रिशुंड गणपतीचे देवस्थानही याच परिसरात आहे. मूळ पुण्याचा दाखला देणारी ही ठिकाणे आहेत. त्याच्या खाणाखुणा या परिसरात दिसतात. या मंदिरातील दुर्मीळ असे वटपत्रशायी चित्र आणखी फक्त खुन्या मुरलीधर येथेच आहे. हा परिसर तत्त्कालीन सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. अशा परिसरात या मंदिराची निर्मिती झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या राम मंदिरांपैकी हे स्थान आहे.
– प्रा. डॉ. मंजिरी भालेराव, पुरातत्त्वज्ञ