Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण संशोधन

24

Mumbai University News : मुंबई विद्यापीठातील अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. या विभागातील डॉ. सुहास जेजुरीकर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी (संदीप हिंगे, वैभव कदम, ताहीर राजगोली, अक्षय परब) यांनी नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या अभ्यासावर आधारित नवीन संकल्पना मांडून व अथक परिश्रम घेऊन नावीन्यपूर्ण असे एक उपकरण तयार केले आहे. या चमूने सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक (नायट्राईड सेमीकंडक्टर) पदार्थ निर्माण करण्याचे उपकरण विकसित केले आहे. अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक महत्वाचा घटक असून अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीचा आधार आहे. सद्यस्थितीत सेमीकंडक्टरवर आधारित तंत्रज्ञान हे अनेक उपकरण निर्मितीमध्ये केंद्रस्थानी आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या अनेक उपकरणांची (जसे की संगणक, मायक्रोप्रोसेसर, मोबाइल फोन, दुचाकी व चारचाकी साठी लागणारी स्मार्ट उपकरणे ते अनेक वैद्यकीय उपकरणे, नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणाली आणि जगाला परस्पर जोडणारे संवादजाल) निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

विशिष्ट चिप निर्मितीत नायट्राईड सेमीकंडक्टर हा अतिशय महत्वाचा घटक असून त्याचा वापर हा पॉवर इलेक्ट्रॉनिक, प्रकाश उत्सर्जन, दूरसंवाद, संदेशवहन, वाहन उद्योग, अंतराळ, आण्विक आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आज नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण हे उच्च तापमानावर अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पार पाडून बनवण्यात येते. त्यासाठी विशिष्ट, गुंतागुंतीची आणि महागडी उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे वापरण्यासाठी कुशल तज्ञांची आवश्यकता लागते. ह्यामुळे नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण ही अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने विकसित केलेल्या या नाविन्यपूर्ण उपकरणाद्वारे सामान्य तापमानाला नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्माण करून ह्या उपकरणाचा अगदी सहज वापर हा सिद्ध केला आहे.

या उपकरणामुळे सामान्य तापमानाला नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मिती सहज शक्य होत असल्यामुळे, आता त्यांच्या वापर हा भविष्यातील लवचिक आणि परिधान करता येण्याजोग्या तंत्रज्ञानात (flexible and wearable technologies) नक्कीच करता येऊ शकेल असा आशावाद या चमूने व्यक्त केला. त्यांचे संशोधन हे सध्या भारतीय बौद्धिक स्वामित्व हक्कासाठी विचाराधीन असून, सदर संशोधनासाठी डॉ. सुहास जेजुरीकर ह्यांना भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (डी.एस.टी.) विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या अतिशय प्रतिष्ठित अशा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन अवॉर्ड (टेट्रा) पारितोषिकाने २०२० रोजी गौरवण्यात करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे डॉ. सुहास जेजुरीकर आणि त्यांच्या विद्यार्थी समूहाने उपकरणाची सुधारित आणि व्यावसायिक आवृत्ती बनवली आहे.

सद्यस्थितीत त्यांचे संशोधक विद्यार्थी ह्या उपकरणाद्वारे बहुस्तरीय नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मिती तसेच विविध प्रकारच्या नायट्राईड सेमीकंडक्टरच्या उत्पादनक्षमतेच्या चाचण्या करत आहेत. हे उपकरण येणाऱ्या भविष्यकाळात नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मिती क्षेत्रात मोलाचा बदल घडवून आणू शकेल असा त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विश्वास आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.