Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दरम्यान, अकोला जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट आहेत. मात्र, डॉ. रणजीत पाटलांच्या विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर त्यांचा गट दुबळा झालाय. जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर संजय धोत्रे गटाची घट्ट पकड आहे. धोत्रे गटाचं प्रत्येक गावात असणारं कार्यकर्त्यांचं जाळं ही त्यांची जमेची बाजू आहे. तर डॉ. पाटील हे याबाबतीत मागं पडत असल्यानं धोत्रे गटाचं पारडं उमेदवारीसाठी जड समजलं जातंय.
भाजपकडून कुणाला तिकीट दिलं जाऊ शकतं?
सद्यस्थित भाजपच्या उमेदवारीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेले संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकार आणि माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा समावेश आहे.
संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे :
संभाव्य उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव म्हणजे अनुप धोत्रे. अनुप हे संजय धोत्रे यांचे थोरले चिरंजीव. गेल्या २५ वर्षांपासून संजय धोत्रे यांचा अकोला जिल्ह्याच्या राजकारणावर एकछत्री अंमल आहे. पाच वर्ष मुर्तिजापूरचे आमदार आणि २० वर्ष खासदार म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चा दबदबा निर्माण केलाय. सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्त्यांशी धोत्रे यांचा थेट संपर्क आहे. यासोबतच संजय धोत्रे २४ तास जनता आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध असलेला जमिनीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा जिल्ह्यात आहे. हाच वारसा घेऊन त्यांचा मुलगा अनुप यांनी राजकारणात पदार्पण केलं आहे. धोत्रे यांच्या आजारपणानंतर अनुप धोत्रे राजकारणात चांगलेच सक्रीय झालेत. दोन वर्षांपासून ते पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम आणि आंदोलनात सक्रिय आहेत. वर्षभरापूर्वी त्यांची पक्षाने अकोला लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. संजय धोत्रे यांच्यासारखाच सहज उपलब्ध असणे आणि लोकांमध्ये मिसळणे हा गुण अनुप यांच्यात आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी कार्यकर्त्यांशीसुद्धा चांगले संबंध स्थापित केलेत.
मात्र, प्रकाश आंबेडकरांसारख्या मुरब्बी नेत्यासमोर अनुप हे अतिशय नवखे ठरतात. त्याचबरोबर घराणेशाहीच्या विरोधात रणशिंग फुंकू पाहणारा भाजप अकोल्यात धोत्रेंची घराणेशाही स्वीकारणार का? याबरोबरच संजय धोत्रेंनी जिल्ह्याचा खासदार म्हणून कोणतंच मोठं काम आणि प्रकल्प मतदारसंघात न आणल्यानं त्याबद्दल मतदारांमध्येही मोठी नाराजी आहे. या सर्व समीकरणांचा विचार करूनच भाजप अनुप धोत्रेंना उमेदवारी देण्याचा विचार करण्याची शक्यता आहे.
माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील :
धोत्रे गटाव्यतिरिक्त अकोल्यात उमेदवारीवर मोठा दावा आहे, तो डॉ. रणजीत पाटील यांचा. डॉ. रणजीत पाटील हे फडणवीसांच्या सरकारमध्ये गृह विभागासह डझनभर खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांना फडणवीस मुख्यमंत्री असतांना ‘शॅडो सीएम’ म्हटलं जायचं. फडणवीसांचे विश्वासू, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ओघवती वक्तृत्वशैली यामुळे ते पक्षवर्तुळात चांगलेच लोकप्रिय होते. अकोल्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट. या दोन गटातील वाद पक्षासाठी अनेकदा डोकेदुखी ठरलीये. त्यातच डॉ. पाटलांचा अमरावती पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांचा गट भूमीगत झालाय. जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये न मिसळणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. जिल्ह्याच्या पक्षसंघटनेत त्यांचं नेतृत्व मानणारा वर्ग जवळपास नसल्यानं त्यांनी निवडणुक लढणे सोपे नाहीये. सोबतच त्यांच्या उमोदवारीला जिल्ह्यातील धोत्रे गट ताकदीने विरोध करण्याची शक्यता आहे. म्हणून डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी देतांना पक्षासमोर मोठी आव्हाने असणार आहे.
नारायणराव गव्हाणकर :
बाळापुरचे दोनदा आमदार राहिलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर हे पक्षाचे आणखी एक प्रमुख दावेदार आहेत. ते जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या कुणबी समाजाचे नेते आहेत. याआधी अकोल्यात कुणबी समाजाचे नेते असलेले पांडुरंग फुंडकर यांनी सलग तीनदा लोकसभेत अकोल्याचं नेतृत्व केले. त्यामुळेच भाजपला मराठा व्यतिरिक्त कुणबी कार्ड खेळायचं असल्यास गव्हाणकर सक्षम पर्याय होऊ शकतात. परंतू, गव्हाणकरांना उमेदवारी देतांना अनेक आव्हानेही त्यांच्यापुढे आहेत. सर्वातआधी ते सध्या डॉ. रणजीत पाटील यांच्या गटात असल्याने धोत्रे गट त्यांच्या नावाला विरोध करू शकतो. त्यासोबतच त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी २०१४ मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सध्या त्यांनी आपल्या मुलाला वंचितकडून जिल्हा परिषदेवर निवडून आणल्यानं त्यांचे पक्षांतर्गत विरोधक याचं भांडवल करीत त्यांच्या उमोदवारीला विरोध करण्याची शक्यता असणार आहे.
विजय मालोकार :
भाजपकडून चौथं सर्वात चर्चेत असलेलं नाव आहे ते पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकारांचं. मालोकार हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि युतीच्या काळात एसटी महामंडळाचे संचालक राहिले आहेत. फक्त २०१४ चा अपवाद वगळता त्यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून ३० ते ४० हजारांवर मतं घेतलीत. २००४ मध्ये त्यांनी या मतदारसंघात अपक्ष म्हणून तब्बल ४० हजारांवर मतं घेतली होती. या निवडणुकीत त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची पक्षाने प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लावली. भाजपच्या वर्तुळात त्यांची ओळख आमदार रणधीर सावरकरांचे कट्टर समर्थक अशी आहे.
जिल्ह्यात मराठा समाजात तिरळे आणि घाटोळे कुणबी असा वाद आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या संजय धोत्रे यांच्या तिरळे कुणबी समाजाचं मालोकार प्रतिनिधित्व करतात. त्यातच त्यांचे धोत्रे परिवाराशी नातेसंबंध असल्याने त्यांना धोत्रेंचा पर्याय म्हणून पक्ष पसंती देऊ शकतो. यासोबतच मालोकार यांचे मराठा समाजातील सर्वच जातींसह ओबीसी, आदिवासी, दलित आणि लहान जातींमध्येही जवळचे संबंध आहेत. त्यामुळे हा पर्याय भाजपसाठी सक्षम ठरू शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
पक्षाने ऐनवेळी डॉ. रणजीत पाटलांचं नाव समोर केलं तर धोत्रे गटाकडून त्यांना पर्याय म्हणून विजय मालोकार यांच्या नावाला पसंती मिळू शकण्याची चर्चा आहे. त्यामुळे धक्कातंत्र वापरण्यासाठी प्रसिद्ध असलेली मोदी-शहांची जोडी अकोल्यात विजय मालोकार यांच्यारुपानं पक्षातील प्रस्थापित फळीला धक्का देऊ शकतात.
प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात मोठी ताकद
दरम्यान अकोल्यात सध्या प्रकाश आंबेडकर हे लोकसभेचे एक उमेदवार असतील हे स्पष्ट झालंय. ते फक्त वंचितचे उमेदवार असतील की महाविकास आघाडी-वंचित युतीचे याचं उत्तर काही दिवसात समजणार आहे. वंचितची ताकद अकोल्यात मोठी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती ताकद अधोरेखित झालीये. यावेळी जर वंचित मविआसोबत लढली तर प्रकाश आंबेडकर यांना आघाडीची देखील मोठी ताकद मिळेल. खासदार धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे नवखा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मातब्बर असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे टिकणं कदाचित भाजपला जड जाऊ शकतं, असा अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे.
मात्र, भाजपचा उमेदवार हा सर्व राजकीय पंडितांचे अंदाज चुकवणारा असेल अशी शक्यता वर्तविली जातेय. घोडामैदान जवळच असल्याने पुढच्या महिनाभरात या ‘सस्पेंस’चे उत्तर मिळणार आहे.
२०१९ अकोला लोकसभेचा निकाल-
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :
संजय धोत्रे : भाजप : ५,५४,४४४
प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी : २,७८,८४८
हिदायत पटेल : काँग्रेस : २,५४,३७०