Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाढ कशामुळे?
मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांत गेले काही दिवस अतिशय सकारात्मक वातावरण आहे. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात समभागखरेदी झाल्यास निर्देशांकांना त्याचा चांगला लाभ होतो असे मानले जाते. गेल्या काही सत्रांमध्ये हेच घडताना दिसले. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था व आंतरराष्ट्रीय बाजारातून फारसे अनुकूल संकेत मिळत नसूनही सेन्सेक्स व निफ्टी देशांतर्गत संकेतांच्या बळावर उसळत आहेत ही बाब विशेष महत्त्वाची ठरते. यामुळेच गेल्या काही सत्रांमध्ये सेन्सेक्स व निफ्टी स्वत:चेच उच्चांक मोडून नवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत. सेन्सेक्सने खरे तर मंगळवारच्याच सत्रात ७५ हजारांचा टप्पा पार केला होता. मंगळवारच्या सत्राचा बाजार उघडलाच तोच मुळी ७५०६०वर. परंतु सत्रांतर्गत व्यवहारात त्यात घसरण नोंदवली गेली व दिवसअखेरीस तो ७४६८३वर बंद झाला होता. त्यामुळे बुधवारच्या सत्राकडे सर्वांचे लक्ष होते. गुंतवणूकदारांनी बुधवारी समभागखरेदीवरच भर दिल्याने सेन्सेक्सने ७५ हजारांचा स्तर अखेर पार केला. निफ्टीनेही १११ अंकांची वृद्धी साधत २२७५३चा टप्पा गाठला.
१० वर्षांतील वाटचाल कशी?
सेन्सेक्सने गेल्या १० वर्षांत अतिशय वेगवान मार्गक्रमण केल्याचे दिसते. केंद्रात सत्तांतर झाले त्यावेळी म्हणजे, १६ मे २०१४ रोजी सेन्सेक्सने २५ हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतरच्या दहा वर्षांत या निर्देशांकाने ७५ हजारांच्या स्तरास गवसणी घातली आहे. सन २०१४नंतर ३५ हजारांचा स्तर गाठण्यासाठी सेन्सेक्सला चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु मोदी सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर २३ मे २०१९ रोजी सेन्सेक्सने ४० हजारांची उंची गाठली. ४५ ते ५० हजारदरम्यानचा प्रवास तर सेन्सेक्सने केवळ ३५ सत्रांत पार केला. २१ जानेवारी २०२१ रोजी सेन्सेक्सने ५० हजारांचा स्तर गाठला. त्याच वर्षी सप्टेंबरपर्यंत सेन्सेक्समध्ये १० हजार अंकांची भर पडली. गेल्या वर्षअखेरीस म्हणजे, डिसेंबर २०२३मध्ये सेन्सेक्स ७० हजारांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे, त्यानंतर केवळ तीन-साडेतीन महिन्यांत सेन्सेक्सने ७५ हजारांवर उडी घेतली आहे. गेल्या १० वर्षांत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या एकूण बाजार भांडवलात पाचपटीने वाढ झाल्याचे दिसते.
करोनाकाळात पडझड किती?
करोनाकाळात अर्थव्यवस्थेच्या रथाची चाके रुतली होती. यास सेन्सेक्सचाही अपवाद नव्हता. देशपातळीवरील पहिली टाळेबंदी घोषित करण्यात आली तेव्हा सेन्सेक्समध्ये अभूतपूर्व पडझड झाली होती. त्यावेळी हा निर्देशांक २७,५९१पर्यंत घसरला होता. मात्र करोनापश्चात केवळ १० महिन्यांत सेन्सेक्सने ९१ टक्के वृद्धी साधली. आजवरच्या काळाची तुलना केली तर ही वाढ तब्बल २७१ टक्के नोंदवली गेली आहे. करोनाकाळात ज्यांनी चांगल्या समभागांमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना किती टक्के परतावा मिळाला असेल, याची कल्पना यावरून करता येते. करोनाकाळात शेअर बाजाराकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले गेले. एक एप्रिल २०२२नंतर देशात ९.८४ कोटी नवी डीमॅट खाती सुरू झाली. भारतात सध्या एकूण १५ कोटी डीमॅट खाती आहेत.
पुढील लक्ष्य काय?
सेन्सेक्सचे पुढील लक्ष्य अर्थातच, एक लाखाचे आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सेन्सेक्सला आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल, असं काही बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर, काहींच्या मते त्याच्या कितीतरी आधीच सेन्सेक्स लाखमोलाचा होईल. आयसीआयसीआय डायरेक्टने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार डिसेंबर २०२४पर्यंत सेन्सेक्स ८३२५०पर्यंत झेप घेण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. निर्यातीत वाढ, सरकारी बँकांची उत्तम कामगिरी, देशांतर्गत मागणीत वाढ आदी अनुकूल घटकांनी शेअर बाजारास हात दिला आहे. अमेरिका, युरोपीय देश, चीन यांच्या जीडीपीची आकडेवारी निराशाजनक असताना भारताचा जीडीपी मात्र सातत्याने वृद्धी नोंदवत आहे. येत्या काही वर्षांत हा आलेख असाच चढता राहिल्यास सेन्सेक्सही सहा आकडी मजल मारू शकेल.