Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गोड ईद आणि बकरी ईदमधील फरक
मुस्लिम समाजात वर्षातून दोन वेळा ईद साजरी केली जाते. एका ईदला ईद-उल-फित्र म्हटले जाते, याच ईदला गोड ईद किंवा मिठी ईद असाही शब्द आहे. तर दुसऱ्या ईदला ईद-उल-अजहा म्हटले जाते, याच ईदचे नाव बकरी ईद असेही आहे. गोड ईदनंतर ७० दिवसांनी बकरी ईद येते. मुस्लिम समाजात हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जातात. सर्वसामान्य भाषेत दोन्ही सणांना ईद असेच नाव आहे. आज आम्ही तुम्हाला ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अजहा यातील फरक सांगणार आहोत.
ईद-उल-फित्र
वर्षांत सर्वांत आधी येते ती ईद-उल-फित्र. या दिवशी शेव्यांची खीर केली जाते, त्यामुळे या ईदला गोड ईद असे म्हटले जाते. हिंदीत मिठी ईद, सेवाईयों वाली ईद अशाही नावाने ही ईद ओळखली जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर उत्सवाच्या स्वरूपात ही ईद साजरी केली जाते. पहिली ईद मोहंमद पैंगबर यांनी ६२४ साली ‘जंग ए बदर’ नंतर साजरी केली होती. मोहंमद पैगंबर यांनी बदरच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर ही ईद साजरी केली होती. ज्या लोकांनी महिनाभर उपवास ठेवाला होता, त्यांच्यासाठी म्हणून ही ईद साजरी केली गेली होती.
अल्लाहचे मानले जातात आभार
ईद-उल-फित्रमध्ये मुस्लिम समुदाय अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, कारण अल्लाहने महिनाभर दररोज उपवास ठेवण्याची शक्ती दिलेली असते. या ईद दिवशी काही खास रक्कम गरीब आणि गरजूंना दिली जाते. या दानधर्मासाठी जकात-उल-फित्र असे नाव आहे. या ईद दिवशी नमाजनंतर कुटुंबातील सर्व लोकांचा फित्रा दिला जातो. यामध्ये दररोजच्या खाण्यातील २ किलो गोष्टी दान केल्या जातात. यामध्ये गहू, पीठ, तांदूळ यांचा समावेश असतो. या ईदला मिठी ईद असेही म्हटले जाते, याचे कारण म्हणजे रोजानंतर ईदला पहिल्यांदा गोड खाल्ले जाते. मिठाई वाटप, शेवया आणि शीरखुर्मा यामुळेही या ईदला गोड ईद म्हटले जाते.
ईद-उल-अजहा
ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद ही ईद उल फित्रच्या ७० दिवसांनी साजरी केली जाते. ईद उल-अजहाला ईद – ए – कुर्बानी असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या दिवशी सर्व नियमांचे पालन करत ‘हलाल’ प्राण्यांची कुर्बानी दिली जाते. याला कुर्बनीची ईद किंवा सुन्नत-ए-इब्राहिम असेही म्हटले जाते. याच कारण म्हणजे या ईदची सुरुवात हजरत इब्राहिम यांनी केली होती. ईस्लामिक कॅलेंडरनुसार बकरी ईद वर्षांच्या अखेरच्या महिन्यात जु अल-हज्ज किंवा जुल हिज्जावर साजरी केली जाते. अल्लाहची कृपादृष्टी मिळवण्याचे एक माध्यम कुर्बानी असते.
ईद-उल-अजहाची सुरुवात कशी झाली?
ईद-उल-अजहा किंवा बकरी ईदची मान्यता अशी आहे की एक दिवस अल्लाहने स्वप्नात येत हजरत इब्राहिम अलैय सलाम यांना त्यांचे लाडके पुत्र इस्माईल यांची कुर्बानी मागितली. इब्राहिम अलै सलाम यांच्यासाठी ही परीक्षा होती, एकीकडे मुलाबद्दलचे प्रेम होते, तर दुसरीकडे अल्लाहचा आदेश होता. अल्लाहचा आदेश मान्य करत हजरत इब्राहिम अलैय सलाम मुलाची कुर्बानी देण्यास तयार झाले. त्यांनी मुलाचा बळी देण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. जेव्हा त्यांनी डोळ्यावरची पट्टी उघडली तर त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा जिवंत होता आणि त्याच्या जागी मेंढ्याचा बळी गेला होता. तेव्हापासून कुर्बानीची प्रथा सुरू आहे.
ईद दिवशी काय करतात?
ईद-उल-अजहा आणि ईद-उल-फित्र दोन वेगवेगळ्या आहेत. पण त्यांचे सामाजिक स्वरूप एकच आहे. दोन्ही ईदवर ६ वेळा नमाज पठण केले जाते, जकात दिली जाते, आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. नातेवाईक, मित्रपरिवार घरी येतात. नवीन कपडे घेतलेले असतात. लहान मुलांना ईदी दिली जाते. गरजूंना भोजन दिले जाते. कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू दान केल्या जातात.