Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘हर घर जल’ योजनेंतर्गत इथे पाण्याचे नळ तर बसले आहेत; पण त्यात पाणी नाही. वीज गेली, की केव्हा येईल याचा पत्ता नाही. कधी कधी तर तीन-चार दिवस इथे वीज नसते. तीच गोष्ट शिक्षणाची. आठवीपर्यंत शाळा आहे. तीपण मोजक्याच शिक्षकांसह चालणारी. ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत इथे रस्ते प्रशस्त आणि रुंद झाले आहेत, हीच काय ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब. मात्र, इतर गोष्टींसाठी गावकऱ्यांना झगडावे लागते, असे येथील स्थानिकांशी बोलल्यावर जाणवते.
काय आहे ऐतिहासिक महत्त्व?
भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट गाव प्रसिद्ध आहे, ते तनोट माता मंदिरासाठी. जैसलमेरपासून हे अंतर १२१ किलोमीटर. सीमेवर शत्रूच्या हल्ल्यापासून ही देवी सर्वांचे रक्षण करते, अशी इथल्या नागरिकांची श्रद्धा आहे. ‘युद्ध की देवी’ असे या देवीला म्हटले जाते. सन १९६५मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात या पाकिस्तानने डागलेले बॉम्ब या मंदिराच्या परिसरात निकामी झाले होते. आजही बॉम्बचे अवशेष मंदिरात पाहायला मिळतात. सोबत १९६५च्या युद्धातील वीरांच्या शौर्याचे दर्शनही छोटेखानी संग्रहालयात घडते. ऐन युद्धातही मंदिराला कोणताही धक्का लागला नाही, या तिथल्या नोंदी वाचल्यावर जे. पी. दत्तांचा ‘बॉर्डर’ आठवतोच. इतकेच नव्हे, तर या सिनेमात सुनील शेट्टी याची व्यक्तिरेखा ज्यांच्यावर आधारित होती, त्या भैरवसिंह राठोड यांचे छायाचित्रही इथे आहे. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन सीमा सुरक्षा दलाकडे आहे. अगदी मंदिरातील पूजाही जवानच करतात. व्यवस्थापनासाठी असलेले कॉन्स्टेबल राजकुमार सरकार पश्चिम बंगालवरून इथे ‘पोस्टिंग’साठी आले आहेत. ‘मंदिराचे व्यवस्थापन जवानांकडे असणारे हे कदाचित पहिलेच मंदिर असावे,’ असे इथे भेटलेले ७१ वर्षीय रामसिंह म्हणतात. मात्र, हा झाला इतिहास. सध्याची स्थिती कशी आहे?
काय म्हणतात नागरिक?
छगनलाल नावाच्या एका व्यावसायिकाचे मंदिराच्या बाहेर छोटेखानी दुकान आहे. त्यांनी तनोटची कहाणी सांगितली. ‘बाडमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या गावात प्रचारासाठी अपक्ष रवींद्रसिंह भाटी, काँग्रेसचे उम्मेदाराम बेनिवाल येऊन गेले. मात्र, निवडणूक आल्यानंतर आमची आठवण होते. नंतर पाच वर्षे इथे कोणीही येत नाही. आमच्यासाठी सरकारी योजना खूप आहेत. मात्र, त्या इथपर्यंत पोहोचतच नाहीत,’ असे छगनलाल म्हणाले. वासुदेव नावाचे स्थानिक श्रमिकही हीच गोष्ट अधोरेखित करतात. ‘इथे राहायला फार कोणी तयार होत नाही. पर्यटनासह इतर छोटेमोठे व्यवसाय करून आम्ही आमचे पोट भरतो. सगळीकडे सीमा सुरक्षा दलाचे जवान दिसतात. मात्र, आमच्या विकासासाठी काहीही झालेले नाही,’ असे ते म्हणाले.
वीज, पाणी, शिक्षण मिळण्याचा अधिकार इतरांप्रमाणे सीमेवरील गावांत राहणाऱ्या नागरिकांचाही आहे. विविध पक्षाचे लोक इथे येऊन आश्वासने देतात. मात्र, विकासापासून आम्ही अद्याप दूरच आहोत.- छगनलाल, स्थानिक व्यावसायिक, तनोट