Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बोर्नव्हिटा आणि नेस्लेची चौकशी का?
साखर अधिक असल्याने व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने भारतात ई कॉमर्सच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून बोर्नव्हिटाचा ‘हेल्थ ड्रिंक’ हा उल्लेख काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. यासाठी राष्ट्रीय बालसंरक्षण आयोगाचा दाखला देण्यात आला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निर्देशांचे बोर्नव्हिटा उल्लंघन करत असून मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे बाल संरक्षण आयोगाचे म्हणणे आहे; तर स्वित्झर्लंडमधील ‘पब्लिक आय’ ही संस्था आणि ‘इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क’ यांनी नेस्ले सेरेलॅकच्या विविध देशांत विकल्या जाणाऱ्या उत्पादनातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण तपासले. त्यांच्या निष्कर्षांनुसार नेस्लेने मुलांच्या आहाराबाबत गंभीर स्वरूपाचा भेदभाव केला आहे. गरीब आणि मध्यम उत्पन्न गटांतील देशांतील नेस्ले उत्पादनांमध्ये ठरवून दिल्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात साखर आढळली; याउलट युरोपीय देशांमध्ये ही उत्पादने साखरमुक्त असल्याचे आढळले. अधिक साखर असलेल्या देशांत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या खंडातील देश होते. भारतात नेस्लेच्या लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व १५ उत्पादनांमध्ये अधिक साखर आढळली. एकावेळी घेतल्या जाणाऱ्या भुकटीत ती सुमारे तीन ग्रॅम होती. हा अहवाल जाहीर होताच योग्य ती चौकशी करण्याचे आदेश ग्राहक मंत्रालयाने ‘एफएसएसआय’ला दिले आहेत.
वाढीव साखर वाईट का?
वादग्रस्त हेल्थ ड्रिंक आणि पूरक आहारामध्ये आढळलेले अतिरिक्त साखरेचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना गुंडाळून ठेवणारे आहे. वाढीव साखर मुलांमधील स्थूलत्व वाढवते, पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. अपचन होते, पोटदुखी जडू शकते. लहान वयात मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार जडण्याची शक्यता वाढते. साखरेमुळे ‘आनंदी’ संप्रेरके तयार होऊन मुले गोड खाऊसाठी हट्ट करू लागतात. दात किडतात. वर्तनामध्ये बदल होतात. मुले हट्टी आणि चिडचिडी होतात, एवढेच नव्हे तर, मुलांमध्ये एकाग्रता कमी होऊन त्यांच्या झोपेचे चक्रही बिघडते.
पूरक आहाराची बाजारपेठ…
गेल्या वर्षी भारतात मुलांच्या पूरक आहाराची बाजारपेठ सुमारे ६.५ अब्ज डॉलरची होती. २०२४ ते २०३० या काळात ती दरवर्षी १४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. वाढते शहरीकरण, वैद्यकीय कारणे आणि बदलती जीवनशैली यामुळे ही बाजारपेठ वाढते आहे. आकर्षक, आक्रमक आणि फसव्या जाहिराती हेही पूरक आहार लोकप्रिय होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. युनिसेफने डिसेंबर २०२३ मध्ये केलेल्या एका अभ्यास पाहणीत दक्षिण आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या लहान मुलांसाठीच्या १६०० उत्पादनांपैकी जवळपास निम्म्या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आढळली होती. बाजारपेठ विश्लेषणातील अग्रेसर संस्था युरो मॉनिटरच्या म्हणण्यानुसार २०२२ मध्ये २५ कोटी डॉलर किमतीचे सेरेलॅक भारतीयांनी आपल्या मुलांना खाऊ घातले.
अतिरिक्त साखर हे कुपोषणच…
भारतात बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण गंभीर आहे. गरिबीमुळे योग्य आहार न मिळाल्याने योग्य पोषणमूल्ये मुलांच्या शरीरात जात नाहीत आणि त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. कुपोषणामुळे मृत्यूही ओढवतात. दुसरीकडे महागड्या पूरक आहारामुळे होणाऱ्या कुपोषणाबाबत मात्र जागरूकता नाही. बक्कळ पैसे मोजून मुलांच्या आरोग्याला अपायकारक असणारे अन्न खाऊ घालणारे बहुतांश पालक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात, हे दुर्दैव. भारतात वर्षानुवर्षे मुलांसाठीची ही धोकादायक उत्पन्ने सुखनैव विकली जात आहेत. त्यांचा धोका अन्य देशातील एखादी संस्था ध्यानात आणून देते आणि त्यानंतर सरकार ‘एफएसएसआय’ला लक्ष घालण्यास सांगते. देशातील कोट्यवधी मुलांनी हे महागडे कदान्न आजवर खाल्ले आहे. किमान यापुढे तरी या संदर्भात कठोर आणि स्पष्ट नियम करून त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे; तरच देशाचे भविष्य असलेल्या मुलांच्या आरोग्यासंदर्भातील आजवरच्या अक्षम्य दुर्लक्षाचे पापक्षालन होऊ शकेल.