Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘ग्वाल्हेर घराण्या’चा राजकीय स्वर टिपेला; भाजप विरुद्ध कॉंग्रेस लढतीत बसपच्या हाती काय?

9

मनोज मोहिते, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला ‘ख्याल’ देणाऱ्या ‘ग्वाल्हेर घराण्या’च्या या शहरात राजकीय स्वर टिपेला पोहोचला आहे. भाजप की काँग्रेस असे काही महिन्यांपूर्वीचे चित्र असताना काँग्रेसच्या बंडखोराने बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर स्वार होऊन त्रिकोणी तिढा निर्माण केला. मात्र, बसपचा फार प्रभाव जाणवणार नाही. लढत भाजप विरुद्ध काँग्रेसच आहे आणि कोण जिंकणार ‘ये कहना मुश्किल है,’ असा आताचा इथला सूर आहे.

भाजपने या वेळी विद्यमान खासदार विवेक शेजवळकर यांच्याऐवजी भारतसिंह कुशवाह यांना संधी दिली आहे. मागील निवडणुकीत शेजवळकर यांनी काँग्रेसच्या अशोक सिंह यांना १ लाख ४६ हजारांवर मतांनी पराभूत केले होते. काँग्रेसनेही उमेदवार बदलला आहे. प्रवीण पाठक लढत आहेत. कुशवाह आणि पाठक हे दोघेही माजी आमदार आहेत. ‘माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली नाही,’ अशी खंत व्यक्त करून काँग्रेसचे तीन दशकांपासूनचे ‘कार्यकर्ते’ कल्याणसिंह कंसाना हे बसपकडून लढत आहेत. ‘या बंडखोरीची झळ फार बसणार नाही. जिंकणारा जास्त फरकाने जिंकणार नाही,’ असा ‘चावडी’वरच्या गप्पांचा सूर आहे. येत्या ७ मे रोजी येथे मतदान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चारसौ पार’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते झटत आहेत. घासमंडी, गुजरी महल भागात घरोघरी पक्षाचे झेंडे लागले आहेत. लश्कर, बाडा, गांधी मार्केट, फालका बाजार, हजिरा, पडाव भागात दैनंदिन जीवन सुरू आहेच, जोडीला राजकीय गप्पा आहेत. ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजा मानसिंह तोमर उद्यानात सोमवारी सकाळी जोरदार चर्चा झडली होती. ‘ज्याला संधी मिळाली, त्याने चीत करावे’, हा या चर्चेचा मध्यवर्ती निष्कर्ष. आजचा भाजप पक्ष वाजपेयींचा पक्ष राहिलेला नाही, अशी एकाची खंत होती. प्रत्युत्तरात वाजपेयींच्या सरकारला तेरा दिवसांत पाडल्याचा रोष होता.

‘अब की बार’ राहुल गांधींना संधी मिळायला हवी, ही काळजी एकाकडून व्यक्त झाली. कारण काय तर, राहुल हे गरिबी दूर करतील! ‘राहुल गांधींना संधी मिळायची असती तर ती दहा वर्षांपूर्वीच मिळाली असती. आता कठीण आहे,’ असे भाकीत वर्तविले गेले. भाजपच्या सर्वसामान्य समर्थकांना चारशेहून अधिक जागा मिळण्याबाबत साशंकता आहे. यावर ‘लावता का शर्यत,’ असा एक उत्साही म्हणाला. हा साधारण पन्नाशीतला. त्यावर साठी पार केलेल्या व्यक्तीने विनाविलंब उत्तर दिले, ‘जिथे संभ्रम असतो, तिथे शर्यत लावली जात नाही.’ चर्चेत ‘मंगळसूत्र’ आणि ‘मोठ्या संख्येने मुले जन्माला घालणे’ आणि ‘संपत्तीचे वाटप’ हे ताजे विषयही होते. कुणी एकच समुदाय मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत नाही. ‘आपल्या’कडेही संख्या कमी नाही, असा समंजस सूर व्यक्त झाला. काँग्रेसची रिक्षा मत मागत फिरते आहे.

मतदान कमी होतेय, कारण…

यंदाच्या निवडणुकीत मतदान कमी होत आहे, हे सार्वत्रिक निरीक्षण आहे. यावर ग्वाल्हेरवासी बोलत आहेत. मतदारांमध्ये या निवडणुकीविषयी उदासीनता आहे, असे इथल्या रहिवाशांना वाटते. ग्वाल्हेर महापालिकेच्या परिसरात एक होमगार्ड भेटले. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले. ‘ही निवडणूक म्हणजे पैशांचा निव्वळ चुराडा आहे. सामान्य माणसाच्या हाती काहीच लागत नाही. आता सोन्याचेच दर पाहा ना, ७५ हजारावर गेले आहेत. महागाई वाढली आहे,’ अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

बल्लू फुल बरसाने गया था मगर…

शहरात उमेदवार प्रचार करीत आहेत. पक्ष उमेदवारासाठी सभा आणि रॅली घेत आहेत. परवा भाजपची एक सभा झाली. कार्यकर्ते उत्साहाने गेले. काँग्रेसविषयी आस्था असलेल्या मित्राने भाजपचा कार्यकर्ता असलेल्या या मित्राला, ‘गर्दीत जातोय, जरा मोबाइल सांभाळ,’ असे आवर्जून सांगितले. मित्र मोबाइल घेऊन गेला आणि सभेच्या गर्दीत नेमका तो हरवून बसला. ‘बल्लू फुल बरसाने गया था, मोबाइल खो के आ गया तीस हजार का,’ अशा शब्दांत काळजी घेण्याचा सल्ला देणाऱ्या मित्राने हळहळ व्यक्त केली.
सापुताऱ्यातलं गाव नसलेलं नवागाव, जमिनी गेल्या, घरे गेली; आदिवासींना ५० वर्षांनी मिळाले मालकी नसलेले घर!
चौकांत दररोज राष्ट्रगीत

शहरातील हनुमान चौकात सकाळी आठ वाजता आणि जीवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता दररोज राष्ट्रगीत होते. या वेळी सारा परिसर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ‘सावधान’ होतो. हे भारावलेले वातावरण असते. वाहने थांबलेली असतात. माणूस जागचा जागी उभा असतो. दुकानातला माणूस जागीच राष्ट्रगीत म्हणत असतो. इथल्या साऱ्यांच्या आणि इथून त्या वेळी ये-जा करणाऱ्यांच्या हे सवयीचे झाले आहे. ग्वाल्हेरची ही वेगळी ओळख ठरली आहे. हम फाउंडेशनचा हा पुढाकार आहे.

तानसेनांच्या समाधीस्थळी ‘हार्मनी’

तानसेननगर भागात सूफी संत आणि संगीतकार महंमद गौस यांचा दर्गा आहे. त्याच्याचमागे संगीत सम्राट तानसेन यांचे समाधीस्थळ आहे. हाही ‘मकबरा’. येथेच त्यांचे पुत्र बिलास खान तौडी यांचीही समाधी आहे. या दर्ग्याचे ‘मुजाबील’ सय्यद जाऊल हसन हे तानसेनच्या मकबरीवर चादर चढवत होते. त्यावेळी एक युवक पक्ष्यांच्या पाणीपात्रात प्लास्टिकच्या सुरईने पाणी टाकत होता. बाजूलाच एक व्यक्ती योगा करीत होती. अनुलोम-विलोम सुरू होता. ही ‘हार्मनी’ शहराचा नूर विशद करीत होती. ‘बहुत मुश्किल है बंजारा-मिज़ाजी, सलीक़ा चाहिए आवारगी में’ असे सांगणाऱ्या निदा फाजलींचे आणि ‘ज़रा सी बात जो फैली तो दास्तान बनी, वो बात ख़त्म हुई दास्तान बाक़ी है’ हे लिहिणाऱ्या जावेद अख्तरांचेही ग्वाल्हेर हे शहर.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.