Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने राहुल गांधी बुद्धिबळ खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये कास्पारोव्ह आपला सर्वांत आवडता खेळाडू असल्याचे राहुल सांगत होते. राहुल यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्वतःला ‘नॉन लायनर थिंकर’ (वेगळा विचार करणारे) असे म्हटले होते. ‘एकदा बुद्धिबळात प्रावीण्य मिळाल्यावर प्रतिस्पर्ध्यांचे मोहरेही आपल्याच अपेक्षेनुसार चाली करतात,’ असे त्यांनी नमूद केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी, ‘राहुल गांधी हे राजकारण तसेच बुद्धिबळातील कसलेले खेळाडू आहेत’, अशी शेरेबाजी केली होती. त्यानंतर या पोस्टवर शाब्दिक चाली रंगत गेल्या. राहुल यांच्या व्हिडिओवर एका युजरने कास्पारोव्ह व विश्वनाथन आनंद यांना टॅग करून खोचक प्रतिक्रिया दिली होती. ‘नशीब, कास्पारोव्ह, आनंद काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले… त्यांच्यावर या सर्वोत्तम बुद्धिबळपटूचा सामना करण्याची वेळ आली नाही,’ असे तो म्हणाला. त्यास कास्पारोव्ह यांनी उत्तर दिले. ‘प्रथम रायबरेलीतून जिंकून दाखवा आणि नंतर सर्वोत्तमना आव्हान द्या, असेच आपली परंपरा सांगते,’ असे कास्पारोव यांनी सुनावले.
‘ही टीका मानली जाऊ नये’
रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांना थेट आव्हान देणारे व त्यासाठी देश सोडावा लागणारे गॅरी कास्पारोव्ह यांनी भारतातील नेते व निवडणूक घडामोडींची बित्तंबातमी ठेवणे अनेकांसाठी आश्चर्यजनक ठरले. कास्पारोव्ह यांच्या या संदेशाची सर्वत्र चर्चा होताच, त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मी केलेला साधासा विनोद ही माझी भारतीय राजकारणावरील टीका समजली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. माझ्या आवडत्या खेळात राजकीय व्यक्तींनी ढवळाढवळ करणे मला नक्कीच आवडत नाही,’ असे सांगून कास्पारोव्ह यांनी आपली चाल मागे घेतली.