Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रमाण : संपूर्ण देशभरातील विश्लेषण’ या अहवालामध्ये अनेक महत्त्वाची निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. भारताच्या लोकसंख्येत जैन समाजाचे प्रमाण सन १९५०मध्ये ०.४५ टक्के होते, ते २०१५ मध्ये ०.३६ टक्क्यांवर आले आहे. आर्थिक सल्लागार परिषदेतील शामिका रवी यांच्या अध्यक्षतेखालील गटाने याबाबतचे निष्कर्ष मांडले आहेत.
काय आहे अहवालात?
– सन १९५० ते २०१५ या काळात हिंदू लोकसंख्येचा वाटा ७.८२ टक्क्यांनी घटला. (८४.६८ टक्क्यांवरून ७८.०६ टक्के)
– सन १९५० मध्ये मुस्लिम लोकसंख्येचा वाटा ९.८४ टक्के होता. तो २०१५ मध्ये वाढून १४.०९ टक्के झाला.
– ख्रिस्ती लोकसंख्येचा वाटा २.२४ वरून २.३६ टक्क्यांपर्यंत वाढला.
– शीख लोकसंख्येचा वाटा १९५० मध्ये १.२४ टक्क्यांवरून २०१५ मध्ये १.८५ टक्क्यांपर्यंत वाढला.
– भारतातील पारशी लोकसंख्येचा १९५०मध्ये ०.०३ टक्के होता, तो २०१५ मध्ये ०.००४ टक्क्यांवर आला.
अहवालातील महत्त्वाची निरीक्षणे
– समाजात वैविध्य निर्माण करण्यासाठी देशात पोषक वातावरण आहे.
– तळागाळातील नागरिकांसाठी पोषक व्यवस्था आणि सामाजिक पाठबळ दिल्याशिवाय वंचित घटकांसाठी सकारात्मक वातावरण शक्य नाही.
– देशातील बहुसंख्यांचे लोकसंख्येतील प्रमाण कमी झाले असून, अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढले आहे.
– धोरणात्मक कृती, राजकीय बदल, सामाजिक प्रक्रिया या साऱ्यांचाच हा परिणाम आहे.
– जगभरात बहुसंख्याक नागरिकांच्या लोकसंख्येमध्ये घट दिसून येत आहे. भारतातही तोच कल असून, बहुसंख्याकांच्या (हिंदू) लोकसंख्येत ७.८२ टक्क्यांची घट झाली आहे.
जगभरातील स्थिती
‘बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तान यांसारख्या देशांमध्ये बहुसंख्य समाजाचे प्रमाण वाढले आहे आणि अल्पसंख्याकांची लोकसंख्या चिंताजनकरित्या कमी झाली आहे. हे दक्षिण आशियाई शेजारच्या व्यापक संदर्भाच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे,’ असेही अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार मुस्लिमेतर देशांमध्ये म्यानमार, भारत आणि नेपाळमध्ये बहुसंख्य समाजाचे धार्मिक वर्चस्व घटले आहे. मात्र, त्यामुळे शेजारील देशांमधील अल्पसंख्याकांनी भारतामध्ये आश्रय घेतला आहे.
या मुद्द्यांवर चर्चा
भारतातील लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनातील महत्त्वाचे बदल आणि बाहेरील देशांतील लोकसंख्येची आकडेवारी याबाबत या अहवालात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लोकसंख्याशास्त्राच्या बदलाची आव्हाने आणि संधी या दोन्हींबाबत अहवालात चर्चा करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
भारतीय उपखंडातील स्थिती
बांगलादेशात बहुसंख्य धार्मिक गटाच्या प्रमाणात १८ टक्के वाढ झाली असून, लोकसंख्यावाढीचा हा दर भारतीय उपखंडात सर्वाधिक आहे. सन १९७१मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही पाकिस्तानात बहुसंख्य धार्मिक गटाचे (हनाफी मुस्लिम) प्रमाण ३.७५ टक्के वाढले असून, एकूण मुस्लिम लोकसंख्येमध्ये १० टक्के वाढ झाली आहे.