Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ø जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा
Ø मान्सून पूर्वतयारी आढावा
अमरावती, दि. १४ : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत तात्काळ मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात.
त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने जाणीवपूर्वक कार्यवाही करावी. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या व नदीकाठावरील गावे, पूराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तविणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधींचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बांधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबींसंदर्भात डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी खरिप हंगामाबाबत व मान्सूनपूर्व तयारी संबंधी कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा बैठकीत घेतला.
नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
* राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक(NDRF), पुणे – 02114-231509
* आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई – 22-22025274/022-22837259
* नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई – 022-22027990/022-22026712
* राज्य राखीव पोलीस दल, नागपूर – 0712-2564973-2560543
* नियंत्रण कक्ष पोलीस विभाग – 100
* विभागीय आपत्ती व्यवस्थापन, अमरावती – 0721-2661364/मो. न.9860011324
* जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – 0721-2662025
* आपत्कालीन टोल फ्री क्रमांक – 1077
* अग्निशामक विभाग (मनपा) – 101, 0721-2576423
०००