Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मार्क्सवाद्यांची मदार तरुण नेतृत्वावर, डाव्या आघाडीला नवोदयाची आस

5

विजय महाले, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या डाव्या आघाडीला लोकसभा निवडणुकीत नवोदयाची आस आहे. यासाठी आघाडीने अनुभवी नेत्यांसह आपल्या तरुण नेतृत्त्वाला लोकसभा उमेदवारीत संधी दिली आहे. त्यांना जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर या आघाडीचे भवितव्य निश्चित होणार आहे.

राज्यातील डाव्या आघाडीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) हा मोठा भाऊ आहे. लोकसभेच्या ४२ पैकी ३० जागा डावी आघाडी लढवित आहेत. यातील सर्वाधिक २३ जागांवर ‘माकप’ने आपले उमेदवार दिले आहेत. उर्वरित सात जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युश्नरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी) या पक्षांकडे आहेत. डाव्यांसोबत आघाडीत असलेल्या काँग्रेसला राज्यातील डझनभर जागा सोडण्यात आलेल्या आहेत.
कोलकाता शहराची ट्विन सिटी ‘हावडा’ला विकासाची आस! सलग चौथ्या विजयी गोलसाठी तृणमूल उत्सुक

‘माकप’ने अनुभवी नेत्यांमध्ये फक्त तीन जागांवर माजी खासदारांना तिकीट दिले आहे. यात ‘माकप’चे राज्य सचिव मोहम्मद सलिम (मुर्शिदाबाद), डॉ. सुजन चक्रवर्ती (डमडम) आणि अलोकेश दास (राणाघाट) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पक्षाने सर्व जागांवर सर्वसामान्य कुटुंबातील, चळवळीतून पुढे आलेले आणि नवीन चेहरे दिले आहेत. या सर्व उमेदवारांनी राज्यातील तरुणांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास आणि सुशासन यावर भर दिल्याचे दिसते. सध्या ‘माकप’च काय, तर डाव्या आघाडीचा एकही आमदार किंवा खासदार नाही. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ‘माकप’च्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने रणनीती आखली आहे. यात माजी खासदारांसह विद्यार्थी चळवळीतील नेत्यांना दिलेल्या जागांवर ‘माकप’ला अपेक्षा आहेत.
वायनाडमध्ये आयेगा तो राहुल ही! डाव्यांच्याच निरीक्षणातील निष्कर्ष

विद्यार्थी नेत्यांना संधी

‘माकप’ने त्यांच्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेतील तीन जणांना उमेदवारी दिली आहे. यात सृजन भट्टाचार्य (जादवपूर), दिप्सिता धर (श्रीरामपूर) आणि प्रतिकूर रेहमान (डायमंड हार्बर) यांचा समावेश आहे. कोलकाता शहर मतदारसंघातून उच्च शिक्षित सायरा शाह हलीम यांना उमेदवारी दिली आहे. सायरा ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांची पुतणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या काळातही तरुण नेतृत्वाला पुढे आणले गेले होते. सुभाष चक्रवर्ती, अनिल विश्वास, श्यामल चक्रवर्ती अशी काही उदाहरणे आहेत. या नव्या नेत्यांना जनता आपलेसे करणार का, हे आगामी काळात समजू शकेल.
West Bengal: मुस्लिम मतदार कोणत्या पक्षास अनुकूल? मत खेचण्यासाठी भाजपसह ‘तृणमूल’कडून प्रयत्न सुरु

रोजगाराच्या मुद्यावर बोट

राज्यात सिंगूर प्रकल्पाला विरोध करीत २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने डाव्या आघाडीला सत्तेबाहेर फेकले. या मुद्यावर हुगळी येथील ‘माकप’ची कार्यकर्ती शमिता सांगते, की सिंगूर प्रकल्प राज्याचे भविष्य बदलणारा होता. त्यास विरोध करून ममता यांनी सरकार बनविले. मात्र, त्यानंतर आतापर्यंत राज्यात किती नवीन उद्योग आणले? याच मुद्यावरून आम्ही तरुणांना रोजगाराबाबतच्या आमच्या भविष्यकालीन संकल्पना समजावून सांगत आहोत, असा दावाही ती करते.

मताधिक्य वाढीसाठी जोर

यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘माकप’सह डाव्या आघाडीला केवळ साडेसात टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या तुलनेत ही सुमारे १७ टक्क्यांची घट होती. डाव्यांची मते आपल्याकडे खेचल्याने भाजपला तब्बल ४० टक्के मते मिळाली होती. हा मतटक्क्यांमधील फरक सुमारे २२ टक्के इतका होता. २०१९ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या ‘तृणमल’ला ४३ टक्के मते मिळाली होती. आता रोजगार, महागाई, केंद्रासह राज्यातील भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था, गुंडगिरी या मुद्यांवरून डाव्यांनी भाजपसोबत ‘तृणमूल’लाही लक्ष्य केले आहे. ‘डाव्यांचे मुद्दे लोकांना पटले तर त्यांचे मताधिक्य वाढू शकते’, असे बर्धमान येथील शिक्षक पोखराज गुहा यांना वाटते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.