Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Speaker Election :लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी सत्ताधारी दक्ष,उपाध्यक्ष पदावर विरोधकांचे लक्ष,२४ जूनपासून लोकसभेचे विशेष सत्र
यावेळीची लोकसभा निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली. दोन लोकसभांमध्ये विरोधी पक्षांवर भारी पडलेल्या सत्ताधारी भाजपने यावेळी ४०० पार चा नारा देवून विरोधकांच्या मनात धडकी भरवली होती. परंतु लोकांचा जनादेश वेगळाच ठरला. ४०० पार म्हणणाऱ्या भाजपला बहुमतापार जाण्यासाठी मित्रपक्षांवर निर्भर होवून युतीचे सरकार स्थापन करावे लागले. यामूळे विरोधकांच्या इंडिया आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी हस्तक्षेप करण्याचे ठरवले आहे.
उपाध्यक्षपदावर विरोधकांचे लक्ष
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यावेळी मिळालेल्या जागा पाहता त्यांना विरोधीपक्षनेते पद मिळू शकते. मागील दोनही निवडणुकांमध्ये संसदेमध्ये विरोधीपक्षनेते पद नव्हते. विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या खासदारांची संख्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे नसल्याने १६ व्या व १७ व्या लोकसभेत विरोधीपक्षनेतेपद कोणत्याच पक्षाकडे नव्हते. १८ व्या लोकसभेत परिणामकारक विजय मिळवल्यानंतर विरोधकांना यावेळी विरोधीपक्षनेतेपद मिळणार आहे. त्याचबरोबर मागील लोकसभेत उपाध्यक्षांचे पदही रिक्त होते. उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला देण्याची प्रथा आहे. त्यामूळे यावेळी नवसंजीवनी मिळालेला विरोधी पक्ष विरोधीपक्षनेते पद आणि उपाध्यक्ष पद मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तसेच उपाध्यक्ष पदावर विरोधकांची नियुक्ती न झाल्यास लोकसभा अध्यक्षपदीही विरोधक आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीडीपी-जदयु देणार भाजप उमेदवारांना समर्थन
निकालांनंतर सरकारस्थापनेसाठी भाजपकडून मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु असतानाच युतीतील तेलुगू देसम पार्टी आणि नितिश कुमारांच्या जनता दलाने लोकसभा अध्यक्षपदावर आपला दावा सांगितला होता. त्यामूळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. परंतु मोदींच्या शपथविधीनंतर दोन्ही पक्ष आपल्या मागणीवर मवाळ झाल्याचे दिसते आहे. काहीच दिवसांपूर्वीच टीडीपी-आणि जनता दलाचे के.सी त्यागी यांनी भाजप जो उमेदवार देईल त्याला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचे सांगितले आहे.
विरोधकांची ऑफर..जदयु-टीडीपीची ठोकर
दरम्यान लोकसभा अध्यक्षपदावरुन एनडीएमध्ये चाललेली धुसपुस पाहून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडूही करण्यात आला. आम आदमी पक्षाने सोमवारी एक पत्रकारपरीषद घेवून टीडीपी आणि जदयु ला लोकसभा अध्यक्षपदी दोन्ही पक्षांपैकी एक उमेदवार उभा केल्यास विरोधीपक्ष त्यांना समर्थन करतील अशी ऑफर दिली. तसेच भाजपपेक्षा टीडीपी किंवा जदयु चा उमेदवार अध्यक्षपदी विराजमान झाल्यास ते लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी हीताचे असल्याचे सांगितले.परंतू दोन्ही पक्षांनी भाजपला पाठिंबा देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
१८ व्या लोकसभेचे सत्र २४ जून पासून सुरु होवून ३ जुलै पर्यंत चालणार असल्याचे केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषित केले आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच विरोधीपक्षनेत्यांची निवड केली जाणार आहे. तसेच नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी यावेळी संपन्न होईल.मागील दोन लोकसभांच्या तुलनेत यावेळी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकवटलेल्या विरोधकांकडे यावेळी मजबूत सदस्यसंख्या असल्याने इथून पुढचे प्रत्येक लोकसभेचे सत्र हे वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.