Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
PM Narendra Modi :भारतातील १६०० वर्षे जुन्या ज्ञानकेंद्राचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन,१७४९ कोटींच्या या विद्यापीठाचा हा आहे गौरवशाली वारसा
प्रधानमंत्री मोदींनी बुधवारी बिहारमधील राजगीर येथील स्थित या विद्यापीठाचे उद्घाटन केले. ८०० वर्षांपूर्वी परकीय आक्रमणात हे विद्यापीठ जवळपास नष्ट करण्यात आले होते. त्याठिकाणी आता एका नवीन विद्यापीठाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या पुरातत्वीय स्थळाला देखील भेट दिली.
यासंबंधी पंतप्रधान मोदींनी X या माध्यमावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “नालंदा विद्यापीठाच्या पुरातत्वीय अवशेषांना दिलेली भेट उत्तम होती. प्राचिन जगातील सर्वोत्तम ज्ञानाच्या आसनांच्या ठिकाणी उभा असण्याची ही एक संधी होती. एकेकाळी ज्ञानाची भरभराट झालेल्या भूतकाळाची हे ठिकाण एक झलक देते. नालंदाने निर्माण केलेली बौद्धिक चेतना आपल्या देशात अशीच विकसित होत राहील.”
काय आहे नालंदा विद्यापीठाचा इतिहास ?
भारताचा प्राचिन वारसा जपणाऱ्या या विद्यापीठाला ८०० वर्षांपूर्वी विदेशी आक्रमणकांकडून नष्ट करण्यात आले होते. हे त्याकाळचे प्राचीन ज्ञानाचे बौद्ध केंद्र होते. बौद्द चिनी प्रवासी ह्युएन त्सांग इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतात आला असताना तो या ठिकाणी वास्तवास होता. त्याने लिहील्याप्रमाणे हे विद्यापीठ त्याकाळी एक आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र होते. त्याने यासंबंधी लिहून ठेवलेल्या विद्यापीठांसंबंधीच्या नोंदींआधारे १९१५ ते १९१९ या दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात या ऐतिहासिक विद्यापीठाचे अवशेष सापडले होते.
कसे आहे नवे विद्यापीठ ?
आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून पुरातत्वीय स्थळापासून काहीच अंतरावर हे नवे केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी दोन विद्यासंकुल बनविण्यात आले असून जवळपास १९०० विद्यार्थी क्षमतेच्या ४० वर्गखोल्या समाविष्ट आहेत. या नवीन शैक्षणिक परिसरामध्ये प्रत्येकी ३०० आसनक्षमतेची दोन सभागृहे तसेच ५५० विद्यार्थी क्षमतेचे विद्यार्थी वसतिगृह बनविण्यात आले आहे.
या परिसरात एक विशाल ग्रंथालय उभारण्यात आले असून येथे पदव्युत्तर शिक्षण,पीएचडी सह, अल्पकालीन सर्टिफिकेट कोर्स सह इतर अनेक ज्ञानशाखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एके काळी आंतरराष्ट्रीय ज्ञानाचे केंद्र असलेल्या या नव्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी १३७ शिष्यवृत्तींची तरतुद करण्यात आली आहे. या नव्या विद्यापीठाची संकल्पना २००७ मध्ये भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी बिहार मधील विधानसभेतील एका विधेयकाद्वारे मांडली होती.