Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्यंकय्या गारू आणि माझा अनेक दशकांपासूनचा परिचय आहे. आम्ही एकत्र काम केले आहे आणि मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट नेहमीच कायम राहिली असेल, तर ती म्हणजे लोकांविषयीचे प्रेम.
‘राष्ट्र प्रथम’ हा दृष्टिकोन
आंध्र प्रदेशातील विद्यार्थी राजकारणातील एक विद्यार्थी नेते म्हणून सक्रिय झाल्यावर विविध प्रश्नांवर सजग राहण्याची त्यांची वाटचाल सुरू झाली आणि राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यांची प्रतिभा, वक्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये लक्षात घेता, कोणत्याही राजकीय पक्षात त्यांचे स्वागतच झाले असते; परंतु ते ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनातून प्रेरित असल्यामुळे त्यांनी संघ परिवारासोबत काम करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी रा. स्व. संघ, अभाविप या संघटनांसोबत काम केले आणि त्यानंतर त्यांनी जनसंघ आणि भाजपला बळकट केले.
सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा युवा व्यंकय्या गारू यांनी आणीबाणीविरोधी चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांना तुरुंगवास झाला होता आणि तोदेखील का तर त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आंध्र प्रदेशात आमंत्रित केले म्हणून. लोकशाहीप्रति असलेली ही बांधिलकी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वारंवार दिसून आली. १९८०च्या दशकाच्या मध्यावर, जेव्हा एनटीआर यांचे सरकार काँग्रेसने कोणताही विधिनिषेध न बाळगता बरखास्त केले, तेव्हा लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते. सन १९७८मध्ये आंध्र प्रदेशने काँग्रेसला मतदान केले; परंतु त्यांनी हा कल बदलून टाकला आणि ते तरुण आमदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांनंतर, जेव्हा आंध्रात एनटीआर यांची त्सुनामी आली, तेव्हादेखील ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. ज्यामुळे राज्यभर भाजपच्या वाढीचा मार्ग मोकळा झाला.
शब्दप्रभू आणि कार्यप्रभूही
ज्यांनी व्यंकय्या गारू यांना बोलताना ऐकले असेल त्यांना त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा प्रभाव जाणवला असेल. ते नक्कीच एक शब्दप्रभू आहेत, पण तितकेच ते कार्यप्रभूही आहेत. एनटीआर यांच्यासारख्या दिग्गजानेही त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि अगदी त्यांनासुद्धा व्यंकय्या त्यांच्या पक्षात यावेत असे वाटत होते, मात्र व्यंकय्या गारू यांनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून विचलित होण्यास नकार दिला. आंध्र प्रदेशात भाजपला बळकट करण्यात आणि या पक्षाला गावोगावी पोहोचवण्यात आणि सर्व स्तरातील लोकांना यामध्ये सामावून घेण्यात व्यंकय्या नायडू यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी विधानसभेच्या सदनात पक्षाचे नेतृत्व केले आणि आंध्र प्रदेश भाजपचे ते अध्यक्षही बनले.
सन १९९०मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यंकय्या गारूंच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि १९९३मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीसपदावर त्यांची नेमणूक केली. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. एक सरचिटणीस म्हणून आपल्या पक्षाला सत्तेवर कसे आणता येईल आणि देशाला भाजपचा पहिला पंतप्रधान मिळेल यावर त्यांचा भर होता. दिल्लीमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी आगेकूच केली.
सन २०००मध्ये जेव्हा अटलजी व्यंकय्या नायडू यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी आग्रही होते त्यावेळी व्यंकय्या गारू यांनी तातडीने ग्रामीण विकास मंत्रालयाला त्यांची पसंती असल्याचे त्यांना कळवले. व्यंकय्या गारू यांचे विचार स्पष्ट होते. ते किसानपुत्र होते आणि त्यांनी आपले सुरुवातीचे दिवस खेड्यात व्यतीत केले होते. त्यामुळे त्यांची ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती ते ग्रामीण विकास क्षेत्र होते. मंत्री या नात्याने ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना’ ही संकल्पना आणि त्याच्या कार्यान्वयनाशी ते जवळून जोडले गेले होते. अनेक वर्षांनंतर, २०१४मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी नगर विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
राज्यसभेचे उत्कृष्ट सभापती
व्यंकय्या गारू हे एक प्रभावी संसदीय कामकाजमंत्री होते. आमच्या आघाडीने २०१७मध्ये त्यांना आमचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले. व्यंकय्या गारू यांचे सरकारमधील महत्त्वाचे स्थान भरून काढणे कसे अशक्य आहे याचा विचार करताना आम्हाला पेचप्रसंगाचा सामना करावा लागला. मात्र, त्याच वेळी उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणी नाही हेदेखील आम्हाला ज्ञात होते. उपराष्ट्रपतिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध पावले उचलली, ज्यामुळे कार्यालयाची प्रतिष्ठाही वृद्धिंगत झाली. युवा खासदार, महिला खासदार आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना बोलण्याची संधी मिळावी याची दक्षता घेणारे असे ते राज्यसभेचे उत्कृष्ट सभापती होते.
व्यंकय्या गारू हे उत्तम वाचक आणि लेखकही आहेत. वैभवशाली तेलुगू संस्कृती दिल्लीतील लोकांसाठी शहरात आणणारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. व्यंकय्या गारू यांना आपण नेहमीच खाद्यपदार्थांची आवड जोपासणारे आणि लोकांचे यजमानपद करणारे म्हणून ओळखतो. परंतु काहीशा उशिराने, त्यांचे स्वनियंत्रणही सर्वांच्या निदर्शनास आले आहे. ते अजूनही बॅडमिंटन कसे खेळतात आणि वेगाने चालण्याच्या आनंदात कसे रममाण होतात यावरून शरीर स्वास्थ्याबाबत त्यांची बांधिलकी दिसून येते.
उपराष्ट्रपतिपदाची धुरा सांभाळल्यानंतरही व्यंकय्या गारू हे सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेत आहेत. अगदी अलीकडे आमचे सरकार तिसऱ्यांदा पदावर आल्यावर मी त्यांना भेटलो. ते आनंदित झाले होते… त्यांनी मला आणि आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या एकूणच मैलाचा दगड ठरलेल्या कारकिर्दीसाठी मी त्यांना पुनश्च एकवार शुभेच्छा देतो. मला आशा आहे की युवा कार्यकर्ते, निवडून आलेले प्रतिनिधी आणि सेवा करण्याची आवड असलेले सर्वजण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ती मूल्ये आत्मसात करतील. त्यांच्यासारखे लोकच आपल्या देशाला अधिक चांगले आणि चैतन्यशील बनवतात.