हायलाइट्स:
- प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं खळबळ
- शिवसेनेत्या गोटात अस्वस्थता?
- संजय राऊतांनी दिलं उत्तर
मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रामुळं राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. या पत्रामुळं शिवसेनेत संभ्रम व राग अशी भावना आहे, अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. तसंच शिवसेनेत दोन गट असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाष्य केलं आहे.
शिवसेनेत दोन गट आहेत या प्रश्वावर उत्तर देताना संजय राऊतांनी आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत, असं म्हटलं आहे. ‘शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आला नाहीये,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः ‘सरनाईकांना जेलमध्येच गुडघे टेकावे लागणार, माफी नाहीच’
‘प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते आहेत. ते आणि त्यांचं कुटुंब त्रासात, अडचणीत आहेत. अडचणीचं कारण त्यांनी पत्रात लिहलंय. भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. ते त्यांचं मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सर्वांशी बोलून घेतली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून विनाकारण होणाऱ्या त्रासाचा सामना कसा करावा यासाठी पक्ष त्यांच्या पाठिशी आहे,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
वाचाः ‘सगळेच स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का?’
‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या मजबुतीने उभे आहेत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष टिकणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाःराज्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात नगरपासून?