रवी राणा यांनी आज सभागृहात बोलताना उमेश कोल्हे हत्याकांडाकडे लक्ष वेधलं. तत्कालीन एसपी आरती सिंग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. त्यांनी दरोड्याचे प्रकरण म्हणून तपास करत वेळकाढूपणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून दरोडा म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात आल्याचा आरोप राणा यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली. राणा यांच्या या मागणीला शंभूराज देसाई यांच्याकडूनही प्रतिसाद देण्यात आला.
‘अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची माहिती घेऊ. पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप आहेत. १५ दिवसांच्या आत राज्य गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल मागवला जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजपच्या नुपुर शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर अमरावतीमधील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर शर्मा यांचे समर्थन केल्याने ११ जणांनी कट रचून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे. याबाबत एनआयए या संस्थेकडून तसा दावाही करण्यात आला आहे. तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी उमेश कोल्हे यांची हत्या केल्याचं आमच्या तपासात समोर आलं आहे, असा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करत एनआयएनं ही माहिती दिली आहे. तबलिगी जमातच्या कट्टरपंथीयांना प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या केली. तबलिगी जमातच्या सदस्यांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कोल्हे यांची हत्या केली, असा दावा एनआयएनं आरोपत्रात केला आहे.