मॅनहॅटनच्या १२ ज्युरींनी एकमताने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. ट्रम्प अमेरिकेचे माजी अध्यक्ष असून, आगामी निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षाकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. या निकालामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंधन येणार नसून, त्यांना निकालाला आव्हान देण्याचा अधिकार आहे. सुमारे सहा आठवडे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यामध्ये २२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल यांचाही जबाब नोंदवण्यात आला. हा निकाल सुनावण्यात येत असताना, ट्रम्प हजर होते आणि पूर्ण वेळ ते शांत होते. निकालानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘हा अतिशय चुकीचा निकाल असून, खरा निकाल नोव्हेंबरमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून येईल.’ अध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने विरोधकांविरोधात हा निकाल दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रकरण नेमके काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल यांना काही रक्कम दिली होती. ही रक्कम वैध दाखविण्यासाठी खोटे व्यावसायिक व्यवहार दाखविले गेले.
‘हश मनी’ किती गंभीर?
अमेरिकेमध्ये आर्थिक नोंदींची प्रकरणे गंभीर मानली जातात. विशेषत: कंपनीच्या नोंदींमध्ये फेरफार करून, हा पैसा अन्य मार्गाने वळविण्यात आला, विशेषत: एखाद्या व्यक्तीला मौन बाळगण्यासाठी ही लाच देण्यात येत असेल, तर त्याविषयी गांभीर्याने चर्चा करण्यात येते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकरणामध्ये, आर्थिक व्यवहार ३४ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दाखविण्यात आले आहेत. या सर्व टप्प्यांमध्ये ट्रम्प यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
स्टॉर्मी डॅनियल्स पॉर्न स्टार असून, सन २००६मध्ये ट्रम्प यांनी तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते; तसेच या संबंधांची वाच्यता करू नये यासाठी ट्रम्प यांनी पैसे दिल्याचा जाहीर आरोप स्टॉर्मीने केला आहे. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल यांच्यासोबतचे संबंध दडवण्यासाठी एक लाख ३० हजार डॉलरचा ‘हश मनी’ दिले. यासाठी त्यांनी त्यांच्या व्यवसायांमधील नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.
चार वर्षांपर्यंत शिक्षा
व्यावसायिक नोंदींमध्ये फेरफार करण्याचा आरोप सिद्ध झाला, तर अमेरिकेत चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ट्रम्प यांचा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे, त्यांना तुलनेने कमी कारावासाची शिक्षा होऊ शकते. कदाचित पाच हजार डॉलरपर्यंतच्या दंडाची शिक्षा त्यांना होऊ शकते.
अपिलाची तयारी
न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी ठरवले असले, तरीही त्यांच्याकडून या निकालाला आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे. या निकालाला अपिलीय न्यायालय किंवा राज्याच्या सर्वांत वरिष्ठ सत्र न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अन्य नेते या प्रकरणातील ज्युरींचे अशील आहेत. त्यामुळे, हा निकाल तटस्थपणे देण्यात आलेला नाही, असा युक्तिवाद ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाकडून टीका
वॉशिंग्टन : माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी ठरल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने त्यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हा निकाल डेमोक्रॅटिक पक्षावर उलटेल,’ असे भारतीय-अमेरिकी नेते विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे. तर, या प्रकरणात आधी निकाल ठरला आणि त्यानंतर सुनावणी झाली, असे बॉबी जिंदाल यांनी नमूद केले आहे. हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात लांछनास्पद आहे, अशी टीका माइक जॉन्सन यांनी केली आहे.