Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या गस्तीला ‘अश्वबळ’; ३० तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी करणार, कोटींचा निधी मंजूर

12

मुंबई : मुंबई पोलिस आता ठिकठिकाणी घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी राज्य सरकारने पोलिसांना ३६ कोटी रुपयांच्या निधीचे बळ दिले आहे. पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त असा तबेला उभारण्यात येत असून, पोलिसांना घोडेस्वारीच्या प्रशिक्षणाबरोबरच घोड्यांचा आहार, निगा राखण्याचे धडे दिले जात आहेत. सरकारने निधीचे बळ दिल्याने मुंबई पोलिस दलात लवकरच ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (अश्व दल) नव्याने सुरू होणार आहे.

ब्रिटिश राजवटीत मुंबईत पोलिसांचे अश्व दल कार्यरत होते. ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सन २०१८-२०१९मध्ये झाला. जानेवारी, २०२०मध्ये प्रत्यक्षात दलाची उभारणी होऊन १३ घोड्यांची खरेदी करण्यात आली. कमी निधीमुळे रेसकोर्समधून निवृत्त झालेले, जास्त वयाचे घोडे खरेदी करण्यात आले. मात्र, घोड्यांची खरेदी, तबेल्यासाठीच्या जागेचा प्रश्न, आहाराकडे दुर्लक्ष आणि पुरेशा निधीची वानवा यामुळे समस्या निर्माण झाली. या काळात सहा घोड्यांचा मृत्यू झाला; तर पाच घोडे नाशिक प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. सध्या दोन घोडे पोलिसांकडे असले, तरी गस्तीसाठी त्याचा वापर होत नाही. गुजरात, कोलकाता, केरळ, कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई पोलिसांकडेही स्वतःचे अश्व दल आहे. देशाच्या बहुतांश राज्यांतील पोलिसांकडे घोडे असून, केवळ मुंबई पोलिस त्यास अपवाद असल्याने सरकारी पातळीवर याची दखल घेण्यात आली. यामुळे आता लवकरच मुंबईतील समुद्र किनारे; तसेच गरज पडल्यास गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील.

मुंबई पोलिस दलामध्ये घोडे असावेत, अशी राजकीय इच्छाशक्ती होती; मात्र निधीअभावी अश्व दल पुन्हा सुरू करण्यात पोलिसांनी फारसा रस दाखवला नाही. हे अश्व दल चांगल्या प्रकारे आणि कायम सुरू राहावे यासाठी सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवला. सरकारने ३६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
Harbour Local Trains: हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंतच, रेल्वेच्या हालचाली, भायखळा स्टेशनचा फास्ट थांबाही रद्द
ब्रिटिश काळापासून…


मुंबई पोलिसांच्या अश्व दलाला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास आहे. वाहनांची संख्या फार कमी असल्याने पोलिस हे घोड्यांचाच अधिक वापर करीत. ओघाने पोलिस दलातील वाहनांची संख्या वाढली. हेच कारण पुढे करीत १९३२मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त सर पॅट्रिक केली यांनी अश्व दलाची गरज नसल्याचे सांगत हळूहळू हे युनिटच बंद केले.

मरोळ येथे प्रशिक्षण

मरोळ येथे सोय़ीसुविधांनी युक्त असा तबेला येथे बांधला जात असून, घोड्यांचा आहार, निगा तसेच घोड्यांवरून गस्त घालण्याचे प्रशिक्षण जवळपास ५० पोलिसांना दिले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. घोड्यांचा आहार, आरोग्याची काळजी, देखभाल या गोष्टींचा प्रशिक्षणात समावेश आहे. पूर्वी ४० ते ५० हजार रुपये घोडे खरेदीसाठी मिळायचे. आता निधी मंजूर झाल्याने प्रत्येक घोड्यासाठी एक ते दोन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे तरुण, तंदुरुस्त घोडे खरेदी करता येणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.