Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chhatrapati Shivaji Maharaj: विशाळगडाचे नाव पोहोचले जगभर; गडावर सापडलेल्या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला देण्यात आले छत्रपती शिवरायांचे नाव
कोल्हापूरच्या या संशोधकांनी कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली असून त्या वनस्पतीला ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या संशोधनाचा शोधनिबंध न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला असून ही वनस्पती देखील विशाळगडावरच दिसून आली आहे.
कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. निलेश पवार तसेच चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. एस. आर. यादव या संशोधकांनी गेल्या 6 वर्षांपासून संशोधन सुरू केले होते. यातील अक्षय जंगम या संशोधक विद्यार्थ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील गडकोटावरील वनस्पती या विषयात संशोधन करताना त्यांना जैवविविधतेचा ठेवा असलेल्या पश्चिम घाटातील विशाळगड या ऐतिहासिक गडकोटावर कंदील पुष्प वर्गातील नवीन प्रजातीचा शोध लावण्यात या संशोधकांना यश आले. छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक शिवकाळात या ठिकाणी दस्तूरखुद्द शिवरायांनी दुर्मिळ वनस्पती जतन केल्या पाहिजेत. असा दस्तऐवज ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो त्यानुसारच शिव काळापासून या वनस्पती या ठिकाणी आढळतात, असा उल्लेख असल्याचे संशोधक विद्यार्थी अक्षय जंगम यांनी सांगितले.
नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. या नवीन प्रजातील महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणले आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच राखीव केली. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी “गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न दयावी” असे आवाहन केले. यावरून छत्रपती शिवराय जैवविविधता संवर्धनाच्याबाबत आग्रही असल्याचा दूरदृष्टीकोन दिसून येत असल्याचं डॉ. निलेश पवार यांनी सांगितले.