Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विमानतळाकडून येणाऱ्या वाहनांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील विलेपार्ले चौकातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तेथे ७९० मीटर लांबीचा पूल सुरू केला आहे. मात्र त्यानंतरही वाकोला ते सांताक्रूझ दरम्यान वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आगळा असा वळणदार पूल उभा करत असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हा पूल वास्तवात सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याचा (एससीएलआर) विस्तार आहे. ‘एससीएलआर’पासून १.२५ किमी लांबीचा हा डबल डेकर पूल आहे. त्यापैकी २१५ मीटर लांबीचा केबलआधारित वळणदार भाग आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला ते पानबाई आंतरराष्ट्रीय शाळेदरम्यान हा पूल आहे. या दरम्यान तो दोन वेळा वळण घेतो. पुलाचा वळणदार भाग पूल पूर्णपणे वाहिनीआधारित (केबल) आहे. अशाप्रकारे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहिनीआधारित असलेला हा देशातील पहिलाच पूल आहे.
पानबाई आंतरराष्ट्रीय शाळा ही विमानतळाच्या दक्षिणेकडे आहे. यामुळे वाहनचालकांना टर्मिनल १मधून बाहेर पडून तसेच सहार उन्नत मार्गिकेवरुन येऊन थेट या पुलावर चढता येईल. यामुळे दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहनचालकांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील सुमारे अडीच किमी लांबीच्या वाहतूक कोंडीपासून सुटका शक्य होणार आहे. तसेच सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील उड्डाणपुलावरून वाकोला जंक्शन येथील कोंडी टाळून वाकोला नाल्यावरून पश्चिम द्रुतगती मार्गावरील सांताक्रूझच्या दिशेने उतरेल. त्यामुळे अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडीपासून मुक्तता होणार आहे.
पोलादी गर्डरच्या सहाय्याने उभारणी
– हा पूल जिथे उभारला जात आहे तो भाग दाटीवाटीचा आहे. त्यामुळेच त्यातील २१५ मीटर लांबीवर कमीत कमी खांबांसह केबलआधारित दोन वळणदार पोलादी गर्डर तेथे उभे करण्यात आले आहेत.
– हे पोलादी गर्डर एकूण ५८ तुकडे एकत्र करून उभे करण्यात आले आहेत.
– या गर्डरांचे वजन सुमारे १,७५० टन असून जमिनीपासून तो २२ मीटर उंचीवर आहे.
– डिसेंबरपर्यंत हा पूल सुरू होण्याची शक्यता आहे.