Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nanded Rain : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वच शेतकऱ्यांची अशी अवस्था असून सरकारने योग्य ती मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.
उभी पिकं भूईसपाट झाली….
व्यंकटी कोकाटे हे अल्पभूधारक शेतकरी असून सांगवी येथील रहिवासी आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. दोन एकर वर ९० हजार रुपयाचं कर्ज घेऊन त्यांनी शेतात सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकाची लागवड केली होती. सोयाबीनला शेंगा लागल्या होत्या, मूग आणि उडीदच पिक बहरून आलं होतं. यंदा चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. शेतीवर घेतलेलं कर्ज फिटेल, दोन मुलींचं शिक्षण होईल अशी आशा होती. मात्र त्यांच्या या आशेवर आसमानी संकटामुळे पाणी फिरलं आहे. कर्ज कसं फेडावं अशी चिंता या युवा शेतकऱ्याला लागली आहे.
अशीचं अवस्था जिल्हातील इतर शेतकऱ्यांची आहे. तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. जिल्हातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार, भोकर, हिमायतनगर, हदगांव, किनवट, माहूर, धर्माबाद, नायगाव, मुखेड, देगलूर, उमरी, बिलोली या तालुक्यात शेती पिकांचं मोठे नुकसान झालं आहे. सोयाबीन, उडीद, मूग, कापूस यासह इतर खरीप पिकं खरडून गेली आहेत, तर अद्याप ही शेतात पावसाचं पाणी साचलं आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास ३ लाख हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी जगला तर देश जगला.. जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, गॅस योजना काढण्यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी हाक शेतकरी सरकारला देत आहेत.
नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. विशेषत: दांडेगाव नदी प्रवाहामुळे आणि आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे नदी किनाऱ्यावरील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या क्षेत्रातील पिकांचं आणि जनावरांचं मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. पेरणीलायक असलेल्या २६ हजार ४४० हेक्टर आर क्षेत्रापैकी प्राथमिक अहवालानुसार २२ हजार ६५० हेक्टर आर. क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बाधित क्षेत्राची छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाहणी केली.