Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dhanteras 2024 : ॐ धन्वंतराय नम: ! आरोग्य देव धन्वंतरीची आराधना कशी करावी? जाणून घ्या

8

Dhanvantari Legend: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Dhanteras 2024 Importance : ॐ धन्वंतराय नम: ! आरोग्य देव धन्वंतरीची आराधना कशी करावी? जाणून घ्या

Dhanvantari Information Marathi: वसुबारसनंतर येणारा दिवाळीमधील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते.‘आरोग्य देवता धन्वंतरी हे समुद्र मंथनावेळी अमृत कलश घेऊन आले, निळसर कांती, चतुर्भुज, पीळदार शरीरयष्टी आणि चारही हातांत वैद्यकाची चार प्रतिके असे वर्णन पुराणात सापडते.

आयुर्वेदाची देवता धन्वंतरी

आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी होय. धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचे अंशावतार मानले जातात. धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्रमंथनाच्या वेळेस झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथांमध्ये सांगितला जातो. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता. धन्वंतरी हे चारभुजाधारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ, एका हातामध्ये औषधी कलश, एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता. या सार्‍या गोष्टींचा वापर करून मनुष्यजातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असा त्याचा अर्थ आहे.

धन्वंतरीच्या कथा

समुद्रमंथनासह अजून एक कथा सांगितली जाते. काशीचे राजवंशज धन्व नामक राजा अज्ज देवांचे उपासक होते. अज्ज देवांना प्रसन्न करून घेतले. वरदान स्वरुपात धन्वंतरी नामक पुत्राची त्यांना प्राप्ती झाली, असे म्हणतात. या कथेचा उल्लेख ब्रह्म पुराणात आहे. समुद्र मंथनातून प्रकट झालेले धन्वंतरी तो त्यांचा दुसरा जन्म होता, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.धन्वंतरीच्या जन्माबाबत अनेक कथा पुराण, प्राचीन ग्रंथात आढळून येतात. एका पौराणिक कथेनुसार, गालव नावाचे ऋषी तहानेने व्याकूळ होऊन घनदाट जंगलात भटकत होते. वीरभद्रा नामक एका कन्येने गालव ऋषींची तहान भागवली. ऋषी प्रसन्न झाले आणि पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. मात्र, वीरभद्रेने तिची हकीकत ऋषींसमोर कथन केली. गालव ऋषी तिला आश्रमात घेऊन गेले. तेथे दर्भाची एक प्रतिकृती तयार केली आणि ती वेदांनी अभिमंत्रित केली. तोच मुलगा पुढे धन्वंतरी म्हणून ओळखला गेला, असेही म्हणतात.

नि:स्वार्थ वृत्तीने केलेली वैद्यकसेवा

भारतामध्ये वेदांची निर्मिती झाली असून आयुर्वेद हा त्यामधील पाचवा महत्त्वाचा वेद आहे. दिवाळीच्या निमित्ताने धनतेरसला धन्वंतरीची पूजा करून आयुर्वेदाचे अभ्यासक हा दिवस साजरा करतात. धन्वंतरीचे मंदिर तसे अभावानेच आढळते पण तामिळनाडूमध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिरात धन्वंतरींचे देऊळ असून, तेथे नित्य पूजा होते. या धन्वंतरींच्या मंदिरासमोर १२व्या शतकातील कोरलेले दगड असून, त्यावर त्या काळातील प्रसिद्ध वैद्य गरुड वाहन भत्तर यांची माहिती आहे. या मंदिरात धन्वंतरीचा प्रसाद म्हणून विविध वनस्पतींचे उकळलेले मिश्रण तीर्थ म्हणून भक्तांना देतात. धन्वंतरींचा उत्सव असे फारसे ऐकायला मिळत नाही कारण आरोग्यदेवतेला षोडशोपचार पूजा अभिप्रेत नाही. त्याला हवी आहे नि:स्वार्थ वृत्तीने केलेली सामाजिक सेवा. ही फक्त सेवा नाही तर वैद्यकसेवा असं त्याला म्हणायला हवं.

धन्वंतरीची पूजा कशी करावी?

धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरीची प्रतिमा एका चौरंग किंवा पाटावर ठेवावी. आपण पूर्वेकडे मूख असलेल्या अवस्थेत बसावे. हातात तीनदा पाणी घेऊन आचमन करून भगवान धन्वंतरीला आवाहन करावे. अक्षता, पुष्प, जल, दक्षिणा, वस्त्र, कलावा, धूप आणि दीप अर्पण करावे. यानंतर नैवेद्य दाखवावा. भगवान धन्वंतरीच्या मंत्राचा जप करावा. नंतर आरती करून दीपदान करावे. ॐ श्री धनवंतरै नम: यासह भगवान धन्वंतरीचे मंत्र म्हटले जातात. आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून धन्वंतरी देवतेकडे प्रार्थना केली जाते. धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून हळदीचे दूध, तुळशीपत्र देण्याची पद्धत आहे. काही आयुर्वेदीक संस्था यावेळी त्रिफळा चुर्ण देतात असं एका ठिकाणी वाचनात आलं होतं.

धन्वंतरींचे चिकित्साशास्त्र

धन्वंतरींनी आपल्याजवळील निरोगी राहण्याचे ज्ञान आयुर्वेदाच्या रुपाने आठ अंगामध्ये विभागून शिष्यांना दिलं. त्यातून निर्माण झाले आजचे चिकित्साशास्त्र. ज्याला आपण ‘मेडिसीन’ म्हणू या. भगवान धन्वंतरी प्रकट झाले ते वैद्यकीय शाखा आणि त्यांची शस्त्रे घेऊनच. धन्वंतरींनी मुळातच वैद्यक शास्त्राच्या आठ शाखा करून विविध वैद्य निर्माण केले. या शाखांच्या उपशाखा होऊन अनेक डॉक्टर पदव्या घेऊन समाजाचे आरोग्य रक्षण करीत आहेत. धन्वंतरींनी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले. सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात. सुश्रुताचार्य भूल देत अनेक शस्त्रक्रिया यशस्वी करीत असत असा उल्लेख आढळतो. आयुर्वेदाचे धन्वंतरींकडून मिळालेले ज्ञान चरकाचार्यांनी वृद्धिंगत केले. आयुर्वेद भगवान धन्वंतरींकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला, ही आयुर्वेदाची परंपरा आजही भारतात दिसून येते.

राष्ट्रीय आयुर्वेद दिन

सन २०१६ मध्ये भारत सरकार-आयुष मंत्रालयाने आयुर्वेद उपचार पद्धतीचे दैवत असलेल्या भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय आयुर्वेद दिन” म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम २८ ऑक्टोबर २०१६ रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेदाच्या क्षमतेवर आणि विविध उपचार पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे, आयुर्वेद शास्त्राचा जगभर प्रसार करणे हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. हा दिवस विविध आजारांवरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक तत्त्वांचा समावेश व्हावा यासाठी समर्पित आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती ही काळाची गरज असून या दिवसाच्या निमित्ताने या उपचार पद्धतीस प्रोत्साहन दिले जाते.

आरोग्याला जपा

आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-सन्मान हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येतात. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणं फार कठीण असतं. साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात पण वारंवार उद्धभवणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. धन्वंतरी पूजन करताना त्यांच्या आयुधांचा पुनश्च वेगळा विचार तुम्ही नक्की करा.धन्वंतरीच्या आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलेल्या व्यक्ती, प्रकृती, देश, चलानुसार जीवन शैलीचे आचरण करून ऋतूचर्या, दिनचर्येचे पालन करून निरनिराळ्या वनस्पतीचे रोग निवारणार्थ शरीर, मन समाज शुद्ध निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. धन्वंतरीच्या या आयुर्वेदाचा विचार पाश्चात्य देशातील लोक गेल्या तपापासून करीत आहेत. तेव्हा ही दीपावली सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीची, उच्च विचार आणि आरोग्य देणारी जावो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना !

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.