Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणूक २०२४: विशेष लेख
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे.
राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय देण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ हजार २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे.
निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.तर संबधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करून मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते. प्रपत्र १२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे.तर १२ ‘ड’ हा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिला जातो.
निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची व सुरक्षेसाठी तैनात अधिकारी यांची संपूर्ण माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तयार करण्यात येते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची आगाऊरित्या माहिती भरलेले (pre- filled) प्रपत्र -१२ व १२-‘अ’ संबंधित निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात.
पोस्टाद्वारे मतदानाचा हक्क बजाऊ इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी प्रपत्र-१२ मध्ये आपला मतदान करण्यासाठी असलेला अर्ज संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे, मतदानाच्या तारखेच्या आधी किमान ०७ दिवसांपर्यंत सादर करावा असा नियम आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती भरुन सही केलेले प्रपत्र-१२ जमा करुन घेण्यात येते. कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रपत्र-१२ तसेच १२ ‘अ’ चे वितरण व संबंधित कर्मचाऱ्यांकडून भरण्यात आलेल्या प्रपत्रांची माहिती संकलित करण्यात येत असते.
कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रपत्र-१२ विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे करणे व स्वतंत्र पाकिटांमध्ये त्या त्या मतदारसंघाचे नाव व जिल्ह्याचे नाव लिहून त्यामध्ये ठेवणे, प्राप्त झालेले ‘प्रपत्र-१२’ स्कॅन करुन त्या सोबतच्या प्रपत्र-४ मधील यादीसह त्या – त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठविले जातात.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पुढील ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी पडताळणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्र व त्या सोबतचे आवश्यक प्रपत्र व लिफाफे तयार करणे व संबंधित कर्मचाऱ्यांबाबत मतदार यादीमध्ये (Marked copy) आवश्यक नोंद घेणे आवश्यक असेल.
जिल्हा समन्वय केंद्रास दिलेल्या पहिल्या भेटी वेळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिताच्या टपाली मतपत्रिका जिल्हा समन्वय अधिकाऱ्याकडे देण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.९ नोव्हेंबर २०२४ सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा समन्वय अधिकारी यांनी राज्य स्तरावरील समन्वयन केंद्रामधील (State Clearing Centre) एकत्र येऊन त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभानिहाय टपाली मतपत्रिका तसेच त्या सोबतच्या आवश्यक प्रपत्र व लिफाफ्यांची देवाणघेवाण अन्य जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांबरोबर केली जाते. पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रवाना केली जाईल.
निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी (दि. १० नोव्हेंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४या कालावधीत) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी हे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेण्यात येते. मतदान संपल्यानंतर सुविधा केंद्रामध्ये सर्व मतदारांनी (निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचारी) मतदान केल्यानंतर सुविधा केंद्राच्या प्रमुखाने राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांच्या उपस्थितीत मतपेट्यांमधील टपाली मतपत्रिका असलेले लिफाफे बाहेर काढून संबंधित विधानसभानिहाय त्याची विभागणी करून ते स्ट्रॉगरुमध्ये ठेवतील.
त्यानंतर मतदानाच्या पाच दिवस आधी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) संबंधित जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ असलेले स्वतंत्र लिफाफे/बॅग हे त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय किंवा अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान करण्यात आलेल्या मतपत्रिकांचे लिफाफे संबंधित जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडे सुर्पूद करतील. त्यानंतर मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य समन्वय केंद्रात सर्व जिल्ह्यांचे जिल्हा समन्वय अधिकारी टपाली मतदान पत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ यांचे आदानप्रदान करून व पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना होतील.
मतदानाच्या तीन दिवस ते एक दिवस आधीपर्यंतचा कालावधी ( १७ नोव्हेंबर २०२४ते १९ नोव्हेंबर २०२४) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी यांच्या मार्फत मतदान कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या प्रशिक्षणानंतर राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या दुस-या भेटी वेळी त्या त्या दिवशी प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेतली जाते व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकांच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही पूर्ण होईल.
राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या तिसऱ्या भेटीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी व जिल्हा समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभा समन्वय अधिकाऱ्यांकडून टपाली मतपत्रिका जमा करुन घेतील व त्या राज्य समन्वय केंद्रामध्ये घेऊन जाणे व तेथे अन्य जिल्ह्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांशी टपाली मतपत्रिकांचे लिफाफे व बॅग यांचे आदानप्रदान करण्याची कार्यवाही होते.
प्रत्येकाचे मत मोलाचे आहे राज्याची निवडणूक यंत्रणा हे जाणून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही कार्यवाही करत आहे. तरी लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी जरूर मतदान करावे.
०००
- संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी