Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमित ठाकरे माहिमशिवाय अन्यत्र उभे असते, तर चर्चा नक्कीच झाली असती : संजय राऊत

6

Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरे दुसऱ्या कोणत्याही जागेवर उभे राहिले असते तर चर्चा नक्की झाली असती, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : दादर-माहीम परिसरात शिवसेना जन्माला आली, वाढली त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उभे आहेत म्हणून निवडणूक शिवसेनेने लढवायची नाही, हे कसे शक्य आहे? त्यात राज ठाकरे त्या जागेवर भाजपच्या साथीने लढत आहेत. भाजपला आम्ही दयामाया दाखवू शकत नाही, अशी ठाम भूमिका संजय राऊत यांनी ‘मटा कट्ट्या’वर मांडली. अमित ठाकरे दुसऱ्या कोणत्याही जागेवर उभे राहिले असते तर चर्चा नक्की झाली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीकडे शिवसेना-उबाठा पक्ष कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
महाराष्ट्राची आगामी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्राचे भविष्यात काय होणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राला ओरबाडले जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई आपल्या ताब्यात घेण्याचा गुजरातचा प्रयत्न होता. पण तो मराठी माणसाने हाणून पाडला. कदाचित तोच सूड पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा उगवत आहेत की काय, असे वाटते. मुंबई ताब्यात घ्यायची तर त्यासाठी शिवसेनेला तोडणे गरजेचे आहे, महाराष्ट्र म्हटले तर शरद पवार हे नाव पुढे येते. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष तोडण्यात आले. परंतु, महाराष्ट्र असा झुकणार नाही. दिल्लीश्वरांशी निकराचा लढा देण्याची ही वेळ आहे.

स्थापनेपासून शिवसेनेने काँग्रेसला विरोध केला, आता मात्र त्यांच्यासोबत निवडणूक लढवत आहे, हे जनतेला कसे पटवून द्याल?
काँग्रेस अस्पृश्य आहे का? आमचे काँग्रेससोबत अनेक विषयांवर मतभेद आहेत आणि राहतील. पण, एक गोष्ट क]णीही मान्य करेल की, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. बाळासाहेब ठाकरेंचे काँग्रेसशी तीव्र मतभेद होते. पण इंदिरा गांधी आणि त्यांचे संबंध चांगले होते. आणीबाणीच्या काळात शिवसेनेवर बंदी घालण्याचा कट इंदिराजींनीच हाणून पाडला. शरद पवार आणि बाळासाहेबांचे राजकीय वैर उघड होते. पण दोघांनीही संवादामध्ये अंतर पडू दिले नाही. विरोधकांशी संवाद ही महाराष्ट्राची परंपरा आहे, पण भाजपने ती संपवली. राज्याची राजकीय संस्कृती त्यांनी नासवली. ज्या मित्रपक्षांसोबत आम्ही २५ वर्षे काढली, त्यांनीच आम्हाला अतोनात त्रास दिला. राजकीय आघाड्या-बिघाड्या होणे हे काही नवीन नाही.

ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर राज्यात सर्रास सुरू आहे, त्यावर काय म्हणाल?
ईडी-सीबीआयला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले पाहिजे. एखाद्या नेत्याला घाबरवणे, त्याचे राजकारण संपविणे हेच काम ही दहशतवादी संघटना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना संपवत आहेत. मी स्वतः या जाचाच्या वरवंट्याखालून गेलो आहे. देशात, राज्यात अनेकजण यंत्रणांना घाबरले. एकनाथ शिंदे, अजित पवार, हसन मुश्रीफ हे सर्व यंत्रणांना घाबरूनच पळून गेले. ज्यांनी सत्ताधाऱ्यांची साथ दिली, त्यांच्या फायली बंद झाल्या. अनेकांनी गुडघे टेकले. मात्र आम्ही ते टेकले नाहीत.

पण, शिवसेना सोडणाऱ्यांनी, पक्ष साथ देत नाही असा आरोप केला…
जर विरोधकांना तुम्हाला लक्ष्य करायचे आहे तर त्यात पक्ष काय करणार? संजय राऊतांना त्रास द्यायचा असेल तर तो मलाच भोगावा लागणार. आम्ही सर्व सहन केले. पक्षाचा यात काय संबंध?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देत आहेत…
योगींचे महाराष्ट्रात काय काम आहे? त्यांनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य याची चिंता करावी. महाराष्ट्राची काळजी घ्यायला आम्ही सक्षम आहोत. योगी स्वत: त्यांची आई आणि चार भाऊ यांना ४० वर्षांत कधी भेटायला गेले नाहीत. वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही ते गेले नाहीत, ते आम्हाला एकजुटीचे महत्त्व, बंधुभाव शिकवणार का?

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणती शिवसेना प्रभावी वाटते?
दोन्ही नेत्यांचे कार्यकाळ वेगळे आहेत. बाळासाहेब एक टोलेजंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. उद्धव यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करणे, हे उद्धव यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. बाळासाहेबांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत पक्ष उभारला, सांभाळला, त्याची तुलना आजच्या काळाशी होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या काळात शिवसैनिक आमदार, खासदार नव्हते. त्यामुळे जनतेचे प्रश्न आम्ही रस्त्यावरच सोडवायचो, दगड मारायचो. विधिमंडळाच्या राजकारणात आम्ही रुळल्यावर बाळासाहेबांनी जनतेचे प्रश्न त्या व्यासपीठावर सोडवा, असा कानमंत्र दिला. आता पक्ष खूप पुढे गेला आहे, आता दगड मारण्याचे दिवस नाहीत.

शिवसेनेने २०१९मध्ये भाजपचा विश्वासघात केला, अशी टीका आशिष शेलार यांनी नुकतीच केली.
मी शेलारांना फारसे महत्त्व देत नाही. विश्वासघात कुणी केला, हे सर्व जनतेला ठाऊक आहे. आमची मागणी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्या, अशी होती. भाजपने अडीच वर्षे शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवले ना? देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे वरिष्ठ नेते त्यांच्या हाताखाली काम करत होते. आम्ही जी मागणी करत होतो, तीच भाजपने पक्ष फोडून पूर्ण केली. यात विश्वासघात कुणी केला? खरंतर, विश्वासघात हा शब्द भाजप नेत्यांच्या तोंडी शोभून दिसत नाही.
Poonam Mahajan : दिल्लीतले नेते म्हणाले महाराष्ट्रातून लोकसभेचं तिकीट कापलं, म्हणजे… पूनम महाजन थेटच बोलल्या
शिवसेनेला जिंकविण्यात व्होट जिहादचा हात होता, असा आरोप सातत्याने केला जातो
देशात मुस्लिम, ख्रिश्चन असे विविध धर्मीय मतदार आहेत, त्यांनी कुणाला मतदान करावे हा त्यांचा अधिकार आहे. भाजपने तिहेरी तलाक रद्द केला, तो मुस्लिम महिलांच्या उत्थानासाठी की मतांसाठी हे जगजाहीर आहे. खरंतर भाजप हे एक मुर्खांचे नंदनवन आहे, तिथे कुणाच्या डोक्यात काय खूळ येईल आणि कोण काय बोलेल, याचा नेम नाही. आम्हाला मुस्लिमधर्मियांची मते मिळतात म्हणून सत्ताधाऱ्यांना पोटदुखी सुरू आहे. व्होट जिहाद सुरू असल्याचे ते म्हणतात. मग, मोदी अरब देशांत जाऊन मशिदींना भेट देतात, शेखांना मिठ्या मारतात, त्याला आम्ही काय म्हणायचे? आजच भाजपच्या आशीष शेलार यांच्या पत्नी माहीमच्या दर्ग्यात गेल्या, ते कशासाठी? भाजपकडून हे सर्व मुस्लिम समुदायाची मते मिळविण्यासाठीच होते ना?

धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री मिळाली, आता तेच प्रकल्पाला विरोध करतात. ठाकरेंचे राजकारण हे नकारात्मक, स्पीडब्रेकरचे आहे, असा आरोप केला जातो…
भ्रष्टाचाराला विरोध करणे हे जर नकारात्मक किंवा स्पीडब्रेकरचे राजकारण म्हणत असाल तर ते योग्यच आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अटी-शर्थी घालताना उद्धव ठाकरेंनी शहरातील मिठागरे विकायला काढली नव्हती. पुनर्वसनाच्या नावाखाली जर मुंबई विकणार असेल तर त्याला आम्ही कशी मान्यता द्यायची? धारावीत तळागाळातले मराठी आणि अन्य भाषिक राहतात. त्यांचे व्यवसाय तिकडेच आहेत. जर त्यांना तिथेच पुनर्वसित करा असे म्हटले तर त्यात चूक काय? संपूर्ण राज्य अदानी समूहाच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू असताना आम्ही मूग गिळून गप्प बसायचे का? धारावीकरांना त्याच ठिकाणी राहण्यासाठी आणि उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यायलाच हवी, अशी आमची भूमिका आहे. महायुती सरकराने मुंबईच नव्हे अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचे कारस्थान रचले असून राज्यात जागोजागी त्यांचे खुंटे मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रत्येक सरकार उद्योगपतींना साथ देतेच… टाटा, बिर्ला, अझीम प्रेमजी यांना मी उद्योगपती मानतो. अदानी यांना नाही. ते सरकारचे दलाल आहेत.

माहीम मतदारसंघातून ठाकरे घराण्यातील उमेदवार पराभूत झाला तर ते शिवसेनेला चालेल का?
मुळात प्रश्न ठाकरे घराण्यातला उमेदवार पाडणे हा नसून ज्या भागात शिवसेना जन्माला आली, वाढली तिथे निवडणूक लढवावी की नाही, याचा आहे. अमित ठाकरे यांना निवडणूक लढवायची होती तर इतर मतदारसंघ उपलब्ध होते. दुसरी एखादी जागा त्यांनी निवडली असती तर त्याविषयी आम्ही नक्कीच चर्चा केली असती. त्यात माहीमधून ते भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. भाजपने शिवसेनेचे अतोनात नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत आम्ही भाजपला दयामाया दाखवू शकत नाही.
Devendra Fadnavis यावे ही जनतेची इच्छा, अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला, दादा म्हणतात त्यांना अधिकार…
राज्यातील निवडणुकीत मनसेचा किती प्रभाव असेल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली नाही, तोच त्यांचे १३ आमदार निवडून आले. इतके यश तर बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यावरही मिळाले नव्हते. जनतेने राज ठाकरे यांना भरभरून पाठिंबा दिला. पण त्यांना ते यश टिकवता आले नाही. धरसोडवृत्ती, राजकारणाची एक दिशा, भूमिका नसणे यामुळे त्यांचे नुकसान झाले. मागच्या निवडणुकीत ते मोदी-शहा यांच्याविरोधात होते. आता सोबत आहेत. विधानसभेत तर थेट हातमिळवणी करत आहेत. अशा कोलांट्या मारणाऱ्या नेतृत्वाचा जनाधार फार काळ टिकू शकत नाही. भाजपला अनेक विषयांवर उघडपणे भूमिका मांडता येत नाही, त्यामुळेच त्यांनी काही भोंगे बाळगले आहेत. राज ठाकरे हे त्यापैकीच एक आहेत.

ठाकरे २ कधी येणार?
माझ्या घरावर जेव्हा ईडीची धाड पडली, तेव्हा कपाटातील अनेक फायली त्यांनी उचकटल्या. त्यात त्यांना ‘ठाकरे २’ची स्क्रिप्टही सापडली. त्यात अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादात राजकीय आकडेवारीचे संदर्भ होते. कदाचित अधिकाऱ्यांना ती हिशोबाची फाइल वाटली आणि ते घेऊन गेले. तेव्हापासून मी ती स्क्रिप्ट मागतोय, पण ती द्यायला ईडीचे अधिकारी न्यायालयात नकार देत आहेत! पण या सिनेमाचा दिग्दर्शक मीच असेन.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.