Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद

6

सातारा, दि.10 :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.  मराठी भाषेचे संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे, यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 20 वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा याचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते.  या संमेलनाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. तर संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील, आमदार विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी समितीचे सदस्य ॲड. भगीरथ शिंदे, अनिल पाटील, विकास देशमुख, बी.एन. पवार डॉ. राजेंद्र मोरे, सिने अभिनेते सयाजी शिंदे, पत्रकार राजीव खांडेकर, उद्योजक हणमंतराव गायकवाड, रामशेठ ठाकूर, विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर आदी उपस्थित होते.

पुढील वर्षीपासून जागतिक मराठी अकादमीतर्फे भरविण्यात येणाऱ्या संमेलनाला शासनामार्फत निधी दिला जाईल, असे सांगून मराठी भाषा मंत्री श्री. सामंत म्हणाले,  जगभरात मराठी जतन करण्यासाठी काम केले जाते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जे-जे करता येईल ते केले जाईल. देशातील उद्योजक जर महाराष्ट्रात येऊन उद्योग करणार असतील त्यांच्यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेसोबत शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून शोध मराठी मनाचा जागतिक मराठी संमेलन पहिल्यांदा सातारा या ऐतिहासिक भूमीत होत असल्याचा आनंद आहे. मराठी भाषेमध्ये शब्दांचे भांडार आहे. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मायबोली बोलल्या जातात. याचे संवर्धन करण्याची आपली  सर्वांची जबाबदारी आहे.

खासदार शरद पवार म्हणाले, जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक मराठी साहित्य संमेलन  साताऱ्याच्या  भूमीत होत आहे. सातारा भूमीत  महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,, कर्मवीर भाऊराव पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण, किसन वीर, श्री. म. माटे, आ.ह. साळुंखे हे सर्व साताऱ्याचे. आज ‘शोध मराठी मनाचा’  या संमेलनाचा उद्देश साध्य होत आहे फक्त साहित्यच  नाही तर मराठी माणसाने उद्योग, कला, विचार, माहिती यांचे आदान-प्रदान करावे व ते साध्य होईल अशी मला खात्री आहे.

        जागतिक संमेलनातील विषय संदर्भात बोलताना पुढे ते म्हणाले ‘ आज कृत्रिम बुद्धिमत्तेला स्थान आहे, संधी आहेत. 15 जानेवारी रोजी बारामती येथे कृषी प्रदर्शन होणार आहे ते सर्वांसाठी खुले आहे. उसाच्या पिकासाठी व वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केलेला आहे हे सर्व शेतकऱ्यांसाठी व सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून ४२  कांड्यावर  ऊस आपणास पहावयास मिळेल हे नवीन तंत्रज्ञान अनेक ठिकाणी आपण उपयोगात आणू शकतो.  त्याचबरोबर क्रिप्टो करन्सी, सायबर सुरक्षा, रुपया, डॉलर याबाबत नवीन पिढीने अधिकची  माहिती घेतली पाहिजे व उपयोग केला पाहिजे. रयतमध्ये या नवीन संकल्पनांचा उपयोग सुरू केला आहे. मी देशाचा कृषिमंत्री असताना ठाणे, पुणे, मुंबई, औरंगाबाद या बाहेर उद्योग सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करून उद्योग उभे राहू शकतात व वाढू शकतात. हे संमेलन शेतकरी, विद्यार्थी, पालक, उद्योजक सर्वांसाठीच पर्वणी ठरेल, असा विश्वासही खासदार श्री पवार यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ.आ.ह .साळुंखे म्हणाले की ‘ वर्तमान स्थिती पाहून माझ्या मनात काही विचार घोळत आहेत. आपला समाज बहुविध, संमिश्र असल्याने आपल्या समाजात आंतरिक ऐक्य आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात भारत खऱ्या अर्थाने महासत्ता व्हायचा असेल स्वातंत्र्य , समता , बंधुता यांची प्रतिष्ठापना केल्याशिवाय तो पुढे जाणार नाही. दुसरे म्हणजे लहानपणापासून आपल्या मुलामुलीमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करण्याची आवश्यकता आहे. सृष्टीतला कार्यकारण संबंध विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे. गरिबांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.उच्च व दर्जेदार शिक्षण मिळणे हा सर्व मुलांचा अधिकार आहे. सर्वच जणांना नोकरी मिळणार नाही पण आपण उद्योग आणि व्यापार करण्याचे मार्गदर्शन करून ,प्रशिक्षण देऊन मुलांना स्वतःच्या पायावर उभा करायला हवे. मला आपल्या मराठीचा अभिमान आहे, पण आपण हिंदी आणि इंग्रजी भाषादेखील शिकविल्या पाहिजेत . जगभरातील देशात मराठी माणसे स्थिरावली असली तरीही हिंदी आणि इंग्रजी या भाषा शिकून आपण सर्वांशी संवाद ठेवला पाहिजे .कोणत्याही क्षेत्रात कष्टाला पर्याय नाही.

    या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.