Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’ – महासंवाद

13

विशेष लेख :

सध्या पोलिसांसमोर नवनवीन गुन्ह्यांचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसागणिक गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांकडून गुन्ह्यासाठी होत असलेल्या नवीन पद्धतींचा उपयोग गुन्ह्याची उकल करताना अडचणीचे ठरत आहे. बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासाकरीता असलेल्या यंत्रणेतही बदल होणे आवश्यक होते. त्यानुसार जलद गतीने तपास पूर्ण होण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’ अर्थात ‘मोबाईल फॉरेन्सीक  व्हॅन’ (न्यायवैद्यक प्रयोगशाळा ) ची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 27 जानेवारी 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रात 21 मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला आहे.   महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्‍य ठरले आहे.

पूर्वी मर्यादित तंत्रज्ञानामुळे बोटांचे ठसे आणि साध्या रक्ताच्या चाचण्या यासारख्या मूलभूत तंत्रांवर भर देण्यात येत होता. तसेच मानवी निरीक्षणावर अवलंबित्व असलेल्या  प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवर आणि प्राथमिक साक्षींवर मोठा भर दिला जात असे. यासोबतच कमी प्रमाणात डीएनए विश्लेषण व मर्यादित स्वरूपामुळे गुन्ह्याचा तपास जलद गतीने होत नव्हता. यामध्ये पुरावे नष्ट किंवा पुराव्यांशी छेडछाड करून आरोपी शिक्षेपासून स्वत:ला वाचविण्यात यशस्वी होतात. तसेच पुरावे तपासणे ही वेळखाऊ प्रक्रिया होऊन बसली होती. मात्र मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगाने डीएनए विश्लेषण, फॉरेन्सीक ऑडिओ, सायबर फॉरेन्सीकचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी जैव-रासायनिक आणि डिजिटल पुराव्यांचा वापर केला जातो. या व्हॅनमुळे गुन्हे स्थळीच असे पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे.

न्याय वैद्यक प्रयोगशाळा संचालनालय कार्य  

न्याय वैद्यक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत विषशास्त्र, जैवशास्त्र, भौतिक शास्त्र, दारू बंदी, सामान्य उपकरणे व विश्लेषण विभाग कार्यरत आहेत. या विभागांच्या मदतीने खून, बलात्कार, बॉम्बस्फोट आणि अंमली पदार्थ अशा गुन्ह्यांमध्ये विश्लेषण करून अहवाल देण्यात येतो. सध्याच्या काळात वाढते सायबर गुन्हे, डेटा चोरी व ऑनलाईन व्यवहारांमध्ये होणारी फसवेगिरी यामध्ये डिजिटल पुराव्यांची स्वीकार्यता माहिती  तंत्रज्ञान कायद्यातंर्गत समाविष्ट आहे. त्यामुळे डिजिटल पुरावा हा अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी संचालनालय अंतर्गत ध्वनी, सायबर व ध्वनीफित विभाग कार्यरत आहे. तसेच मानसशास्त्र विभागात लाय डिटेक्टर,ब्रेन मॅपिंग, नार्को विश्लेषणाचा उपयोग करण्यात येतो.

फॉरेन्सीक व्हॅनमधील सुविधा

फॉरेन्सीक व्हॅन अत्याधुनिक व प्रगत न्यायवैद्यक तंत्रासह सुसज्ज आहेत. व्हॅनमुळे गुन्हे दृष्य संकलित करणारे व व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा असणारे क्राईम सीन अप्लीकेशन, प्रशिक्षीत फॉरेन्सीक तज्ञाद्वारे कोणत्याही प्रकारचे क्राईम सीन प्रभावीपणे संकलित करता येणार आहे. क्राईम सीन अप्लीकेशन ब्लॉकचेन पद्धतीवर कार्य करते. जे पुरावे व ‘चेन ऑफ कस्टडीची’ नोंदणी सुरक्षीत करतात. ब्लॉक चेन तंत्रज्ञान मेटा डेटा आणि पुराव्यांच्या ‘फाईल इनक्रीप्टेड व्हॅल्यू’ संग्रहीत करून फॉरेन्सीक तपासात विश्वासार्हता निर्माण करतात.

व्हॅनमधील उपलब्ध किट

क्राईम सीन कॉर्डीनिंग ऑर प्रोटेक्शन किट, जनरल इन्व्हेस्टींगेटींग किट, एव्हीडन्स पॅकिंग अँड कलेक्शन किट, फूट अँड टायर ब्रीट कास्टीग किट, हाय इन्सेंटीकेंटींग फॉरेन्सीक लाईट सोर्स, ब्लड व सिमेन्स डिटेक्शन किट, डिएनए कलेक्शन अँड सेक्स्युअल असॉल्ट किट, एक्सप्लोझीव्ह डिटेक्शन किट, नार्कोटीक डिटेक्शन किट, गनशॉट रेस्युडींग टेस्ट किट, बुलेट हॉल्ट टेस्टींग किट, आर्सल इन्व्हेस्टींगेटींग विथ गॅस डिटेक्टर आणि सायबर फॉरेन्सीक किट अशा किटसह फॉरेन्सीक व्हॅन सुसज्ज असेल. या व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व  सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील.  व्हॅन सीसीटिव्हीने सज्ज असून कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे  सबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्यकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे.   ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे.  यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे.

अशी काम करेल फॉरेन्सीक व्हॅन  

प्रत्येक व्हॅनमध्ये दोन तज्ज्ञ अधिकारी, एक मदतनीस आणि नियंत्रण कक्षात एक सहायक संचालक 24 तास कार्यरत असेल. पोलीस स्टेशनने नियंत्रण कक्षाला गुन्हा अन्वेषण ठिकाणाची माहिती देताच नियंत्रण कक्ष संबंधित फॉरेन्सीक व्हॅन युनीटला याबाबत माहिती देतील. व्हॅन टीम तपास अधिकाऱ्याशी समन्वय साधत गुन्ह्याच्या ठिकाणी पोहचेल. फॉरेन्सीक तज्ज्ञ मोबाईल टॅबलेटच्या माध्यमातून गुन्ह्याचे ठिकाण ‘क्राईम सीन ॲप्लीकेशन’द्वारे निश्चित करतील. या अप्लीकेशनद्वारे गुन्हे स्थळाचे फोटो, व्हीडीओ घेण्यात येतील. फॉरेन्सीक तज्ज्ञ मार्गदर्शक तत्वानुसार गुन्हे स्थळावर फॉरेन्सीक किटच्या साहाय्याने पुरावे गोळा करतील आणि आवश्यकतेनुसार क्राईम सीन अप्लीकेशनमधील व्हिडीओ कॉलद्वारे नियंत्रण कक्षातील सहायक संचालक यांच्याशी संपर्क साधतील. फॉरेन्सीक तज्ज्ञ सर्व गोळा केलेले पुरावे व्हॅनमधील सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सील करून एका बारकोडदद्वारे संरक्षीत करतील.

गुन्हे स्थळावरील सर्व छायाचित्रे, व्हिडीओ, ऑडीओ संदेश आणि पुरावे यासह गुन्ह्याच्या दृष्याचे तपशील सहायक संचालकांना पाठवतील. नियंत्रण कक्षातील सहायक संचालक तपशील तपासून गुन्ह्याच्या दृष्टीने पुरेसा व योग्य असल्याची खात्री करून मान्यता प्रदान करतील. व्हॅनमधील फॉरेन्सीक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणच्या तपशीलांमध्ये कोणताही बदल करू शकणार नाही. तज्ज्ञ क्राईम सीन अहवाल तयार करतील आणि  अहवाल सर्व पुराव्यांसह पोलीसांना सुपूर्द करतील. यामुळे गुन्हे स्थळावरून गोळा केलेल्या सर्व पुराव्यांची सुरक्षितता अधोरेखीत होते. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून  क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहीत करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.  गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये  फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही  व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

व्हॅन प्रकल्पाचा उद्देश

गृह विभाग अंतर्गत राज्य शासनाने मंजूर केलेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्रकल्पाचा उद्देश भारतीय न्याय सुरक्षा संहितेतील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. गुन्ह्यांमध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञांकडून सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञांकडून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे बंधनकारक आहे. गुन्हे स्थळावरुन परिस्थितीजन्य पुरावे गोळा, जतन करण्याकरीता तसेच व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीकरीता न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ञांना किट व केमिकल्ससह मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे.

मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन प्रकल्पाचे स्वरूप

महाराष्ट्र सरकारने प्रकल्पास लागणाऱ्या निधीला मंजूरी दिली आहे. प्रकल्पाअंतर्गत २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  एकुण २५९ व्हॅन्सकरिता फॉरेन्सीक किट्स, कंट्रोल रूम, केमिकल्स आणि आवश्यक सॉफ्टवेअर ब्लॉकचेन अप्लिकेशन्ससह पुढील पाच वर्षांकरिता ऑपरेशन आणि देखभालीसह प्रशिक्षित फोरेन्सिक तज्ज्ञ सुसज्ज असणार आहेत. उपक्रमाची परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने पायलट प्रकल्पासाठीसुद्धा निधी मंजूर केलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पायलट प्रकल्प सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, नागपूर शहर आणि जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे यामध्ये एकूण २१ व्हॅन आहे. त्यानंतर प्रत्येकी ११९ व्हॅनसह दोन टप्प्यात उर्वरित एकूण २३८ व्हॅनसह संपूर्ण राज्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी व उपायुक्त यांचे कार्यालयात एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत राहणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय व प्रत्येक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असे एकूण ८ व्हॅनचा वापर अतिमहत्वाच्या, संवेदनशील तसेच आव्हानात्मक प्रकरणामध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर आणि चालक राहणार आहेत. अशा एकूण २५९ व्हॅनसाठी एकूण २२०० पदेही मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे निश्चितच गुन्हे सिद्धतेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

 

निलेश तायडे,

विभागीय संपर्क अधिकारी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.