Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; आंबेडकरी चळवळ व नवी आव्हाने

8

> डॉ. मिलिंद कसबे

महापुरुषांची प्रतीकपूजा ओलांडणारा विज्ञानवादी समाज उभा राहावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. सध्या सर्वच समाज आपापल्या महापुरुषांना जातिबद्ध करण्याच्या स्पर्धेत अडकले आहेत. खरे तर राजकीय फायद्यासाठी जातिबद्ध झालेला समाज केवळ तणाव पसरवू शकतो; तो सामाजिक फेररचना करू शकत नाही. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आज ६६ वर्षे होत आहेत. या काळात आंबेडकरी चळवळीत अनेक बदल झाले. दलित पँथरचा झंझावात, दलित साहित्याचा विद्रोह, दलितांचे लढे हे सारे आंबेडकरोत्तर प्रस्फोट आहेत. दलितांच्या चळवळीची ऊर्जावान स्थळे आहेत; परंतु गेल्या काही दशकांत दलित चळवळीची विशेषतः दलितांच्या राजकारणाची दिशा का बदलली? हा कळीचा प्रश्न आहे. आज आंबेडकरी समाजाने आत्मटीकेसह मूलभूत विचार केल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत.

सध्याचा काळ बदलला आहे. जागतिकीकरणात उभे असताना आपले प्रश्न केवळ जातीय राहिले नाहीत; तर ते वर्गीय बनले आहेत. आर्थिक प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष करून जातीत आणि ‘जय भीम’च्या नाऱ्यात रमलेल्या दलित नेत्यांना व्यापक सांस्कृतिक उन्नतीची दिशा गवसली नाही, हे कधीतरी मान्य केले पाहिजे. दलितांचे राजकारण इतके करूण आणि काव्यमय का बनले? दलित चळवळ का थंडावली आणि दलित साहित्य का गोठले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आत्मटीकेसह शोधल्याशिवाय नवा मार्ग दिसणार नाही. आधी सांस्कृतिक उन्नती आणि त्यानंतर राजकीय प्रगती असा जगभरातल्या बदलांचा प्रवास आहे. परंतु, दलितांच्या नेत्यांनी सामाजिक-सांस्कृतिक उन्नतीऐवजी राजकारणाला अग्रक्रम देऊन आंबेडकरी विचारधारा कुंठित केली. डॉ. आंबेडकरांनी राजकीय सत्तेला अग्रक्रम दिला हे खरे असले; तरी तिला त्यांनी सर्वस्व मानले नाही. समाजाच्या समग्र सांस्कृतिक उन्नतीसाठी त्यांनी गौतम बुद्धांचा मार्ग दाखविला होता; परंतु डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बुद्धांना समजून घेण्यात कमालीचे अपयश आलेले दिसते. बाबासाहेबांचा बुद्ध हा ‘नवयानी बुद्ध’ होता. तो जगाची नवरचना करणारा होता. समाजशास्त्रज्ञ डर्कहाईमप्रमाणे बाबासाहेबांनीही धर्म हा समाजबांधणीचे काम करतो, असे मानून त्याला पवित्र मानले. बुद्धांचा धम्म दलितांच्या हाती देऊन बाबासाहेबांनी बुद्धिप्रामाण्यवादी धर्माचे आश्वासक उदाहरण समस्त भारतीयांच्या हाती दिले; परंतु संपूर्ण मानवजातीला सम्यक दृष्टी देणारे बुद्धांचे तत्त्वज्ञान जातिबाह्य रुजवण्यात दलितांना अपयश आले. खरे तर डिकास्ट होऊन नैतिकदृष्ट्या आधुनिक होण्याची ही संधी होती. परंतु, बुद्धांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एका विशिष्ट जातीत बंदिस्त ठेवण्यात दलित पुढाऱ्यांनी धन्यता मानली. अर्थात, आपापले महापुरुष आपल्याच जातीत कसे राहतील, यासाठी प्रत्येक समाज आज आक्रमक बनला आहे. याचा अनिष्ट परिणाम म्हणजे अस्पृश्य दलित आणि स्पृश्य दलित यांच्यातली सांस्कृतिक दरी संपलेली नाही. याशिवाय, दलितेतर बहुजन समाजाशी सांस्कृतिक मैत्रभावही जुळला नाही. तसेच, बौद्ध-मातंग आणि चर्मकार या समाजांची सवलतींसाठी एकी असली तरी अद्याप सांस्कृतिक-धार्मिक एकी नाही. त्यामुळे भटक्या आणि ओबीसी समाजाशी आंबेडकरी समाजाची सांस्कृतिक नाळ जुळणे दूरचेच आहे. दलित स्पृश-अस्पृश, शेतकरी जाती, तसेच ओबीसी, भटके, आदिवासी आणि मुस्लिमांची वैचारिक-सामाजिक व सांस्कृतिक एकी काळ सुचवतो आहे. या अनुषंगाने दलितांनी आपले विचारविश्व उभे करायला पाहिजे.

सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने दलितांच्या राजकारणाची दिशा भरकटली आहे. केवळ बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा देऊन दलितांचा विकास होणार नाही, हे मान्य करून महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीत विसावलेल्या बहुजन हिंदू समाजाशी सांस्कृतिक नाळ जोडण्याचे प्रयत्न केले पाहिजेत; असे आजचा काळ सांगतो आहे. डॉ. आंबेडकरांनी अत्यंत तार्किकपणे धर्मसमीक्षा केली. परंतु आंबेडकरी नेत्यांनी तत्त्वशून्य राजकीय तडजोडी करून दलितांचा बुद्धिभेद करावा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून दलित राजकारणाची वैचारिक सांस्कृतिक दिशा स्पष्ट करणे, हे आजच्या आंबेडकरवादापुढचे आव्हान बनले आहे.

दलितांना डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा आहे. क्रांतीचा नारा बुलंद करण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणून त्यांनी येणाऱ्या काळाचे दिग्दर्शन करावे अशी अपेक्षा होती; परंतु अनैसर्गिक आणि अतार्किक मैत्रभाव जोपासण्यात दलित पुढाऱ्यांची शक्ती खर्च झाली. पण आता वेळ गेली असली तरी काळ मोठा कठीण आहे. अशावेळी गडद निळ्या पारंपरिक आंबेडकरवादाच्या छायेतून बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. प्रतीकपूजन आणि नामघोषाच्या पलीकडे जाऊन प्रश्नांच्या व लढ्यांच्या दिशा बदलाव्या लागतील. आजच्या आंबेडकरी चळवळीपुढील महत्त्वाचे आव्हान म्हणजे आता आंबेडकरवाद्यांनी त्यांची जन्माधारित ओळख पुसून व्यापक विचारांचा डिस्कोर्स उभा केला पाहिजे. आपल्या लढ्यांची दिशा बदलून नवे प्रश्न हाती घेतले पाहिजे. आरक्षण, अत्याचार, भेदभाव, संविधानाचे रक्षण आणि धम्मप्रसार या मुद्द्यांवर आजपर्यंत दलितांचे लढे यशस्वीही झाले; परंतु आता जागतिकीकरणाने जातीचा मुद्दा विरळ केला आहे. दलितांवरच्या अत्याचारांचे स्वरूप केवळ भेदभावाचे राहिले नसून ते आर्थिक बनले आहेत. याशिवाय, संविधान रक्षण आणि धम्मप्रसारात साचलेपण येत आहे. अशा वेळी नवे प्रश्न आणि नव्या आयुधांसह दलित चळवळीने उभे राहिले पाहिजे. समविचारी प्रवाहांशी मैत्रभाव वाढविला पाहिजे. तत्त्वशून्य तडजोडींच्या गर्तेत उभ्या असलेल्या तथाकथित नेत्यांना निवृत्त करून नव्या विचारांच्या तरुणाईच्या हाती चळवळीचे नेतृत्व सोपविले पाहिजे. दलित पँथरची चळवळ, नामांतराचा लढा, रिडल्स आंदोलने हा आपला समकालीन भूतकाळ आहे. तो क्रांतिकारी भूतकाळ ऊर्जावान असला तरी तो भूतकाळ होता. काळ बदलला आहे. आणि प्रश्नही बदलले आहेत. आंबेडकरवादी, मार्क्सवादी, कम्युनिस्ट आणि समाजवादी यांचा मैत्रभाव ही काळाची गरज आहे. मार्क्स-गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय ही चळवळीची नवी दिशा बनत आहे. अशा वेळी दलितांमधल्या आंबेडकरी समाजाने अधिक व्यापक होऊन नेतृत्व करणे महत्त्वाचे आहे.

आज आपण विसंगत जगात उभे आहोत. राजकीय हस्तक्षेप वाढला आहे तर दुसरीकडे सामाजिक आणि आर्थिक विषमता तशीच आहे. धर्म आणि राजकारण आता एकच बनले असून त्यांची युती भांडवलशाहीची हस्तक बनत आहे. अशा वेळी सामान्य माणूस हताश आहे. त्याच्या रोजच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न आणि पडद्यावर दिसणारे प्रश्न यात मोठी विसंगती आहे. अशा विसंगत भोवतालाचा अन्वयार्थ कसा लावायचा हे बुद्धिवंतांचे, लेखक, विचारवंत आणि कलावंतांचे काम आहे. सध्याच्या सांस्कृतिक संघर्षाकडे पाहण्याची दृष्टी डॉ. आंबेडकरांनी दिली आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुल्यांच्या परंपरेतली आहे. हा प्रागतिक दृष्टिकोन अधिक विकसित करण्याची, त्याला पुनरुज्जीवित करून प्रवाहित करण्याची जबाबदारी लेखक कलावंत आणि विचारवंतांची आहे. डॉ. आंबेडकरांना स्मरून त्यांनी दिलेला लोकशाही समाजवादाचा धर्मनिरपेक्ष मार्ग हाच उद्याच्या भारताला जोडणारा महामार्ग आहे. यासाठी सर्व विवेकी माणसांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे.

(लेखक आंबेडकरवादी अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.