Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर थंडीने कुडकुडत होते, राजमाता कल्पनाराजेंच्या वात्सल्याने वाचले पिल्लाचे प्राण
मध्यरात्र उलटून गेलेली असते… एका निर्जन रस्त्यावर थंडीने कुककुडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेतले जाते.. त्याला मांडीवर घेऊन मुक्कामी नेले जाते आणि मोठ्या काळजीने निगराणी केली जाते. थंडीने कुडकुडणाऱ्या निर्जन रस्त्यावरील या कुत्र्याच्या पिल्लाकडे वात्सल्याची दृष्टी टाकणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या राजमाता कल्पनाराजे असतात. राजमातांच्या वात्सल्यवृत्तीचे हे अनोखे दर्शन शिर्डी ते नारायणगाव प्रवासात पहायला मिळाले.
या घटनेबाबतची हकिकत अशी की, ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर राजमाता संगमनेरमार्गे विमानतळ रस्त्याने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होत्या. त्यावेळी रस्त्यावर कुत्र्याचे लहान पिलू थंडीने कुडकुडत असल्याचे त्यांनी पाहिले. लागलीच चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले. स्वत: उतरून त्यांनी पिलाला उचलून घेतलेच, पण स्वत:च्या मांडीवर घेऊन त्याला शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात त्या घेऊन आल्या.
पहाटे दोनच्या सुमारास त्यासाठी दूधाची पिशवी आणायला लावली. दूध गरम करून त्याला पिण्यासाठी द्यायला त्यांनी सोबत असणाऱ्या सेवकांना सांगितले. पण दूधात पाणी टाका थेट त्याला देऊ नका नाहीतर त्या दुधाने पिलाला उलटी होईल हे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत. दरम्यान पिलाला थंडी वाजू नये म्हणून त्यांनी वर सुरु असलेला पंखा बंद करायला लावला. पिलू झोपल्यानंतर त्या झोपी गेल्या.
त्यांची ही सुश्रुषा पाहून एका अंगरक्षकाने तर सकाळीही पिलाची काळजी घेत त्याला आपल्या छातीशी कवटाळून खेळवले. पण आता हे प्रकरण इतक्यावर हे थांबेल असे वाटलेल्या त्यांच्या सोबतच्या सेवकांना, पुन्हा त्यांच्या पिलाप्रती असलेल्या वात्सल्याची अनूभूती आली. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन सकाळी निघताना, त्यांनी कुत्र्याचे पिलू कुठे आहे असे विचारले आणि त्याला सोबत घ्यायला लावले.
तेथून त्याला गाडीत घेऊन जाताना सर्वजण नारायणगावनजिकच्या हरी पांडूरंग या हॉटेलवर जेवणासाठी थांबले. त्यावेळी त्यालाही खाली घेतले. हे पाहून हॉटेलचे मालक कुंदन शिंदे यांनी याला सांभाळायला माझ्याकडे द्या सांगितले. त्यावेळी नीट सांभाळणार का, त्याला भाकरी देऊ नका, रोज आंघोळ घाला, घरात ठेवा अशा सूचना राजमाता कल्पनाराजेंनी शिंदे यांनी केल्या. मी पुन्हा आल्यानंतर मला ते दिसले पाहीजे असेही सुनावले.
दरम्यान, राजमाता कल्पनाराजेंच्या सोबत असलेले (मूळचे धोलवड,ता.जुन्नर) येथील स्वीय्य सहाय्यक सचिन नलावडे यांनी राजमातांच्या या अनोख्या वात्सल्याची अनूभूती महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला सांगितली.
दोन दिवसांनंतरही कुत्र्याची चौकशी राजमातांनी केली. पिल्लू व्यवस्थीत आहे का, त्याला आंघोळ घातली का, डॉक्टरांकडे नेले का ही विचारणा त्या करत होत्या असे त्यांनी सांगितले. तर आज ८ डिसेंबरला देखील त्यांनी मला फोन करून सकाळी कुत्र्याची चौकशी केली असे ते म्हणाले.
कुत्र्याचे ‘वाघ्या’ असे नामकरण
दरम्यान राजमाता साहेबांनी मला सांभाळण्याची जबाबदारी दिलेल्या पिल्लाची मी मुलाप्रमाणे काळजी घेत आहे. त्याचे नामकरण केले असून त्याचे आम्ही वाघ्या नाव ठेवले आहे, अशी माहिती या पिल्लाचा सांभाळ करणारे हॉटेल मालक कुंदन शिंदे यांनी सांगितले.