Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Sarasbaug Ganpati : अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष, सारसबाग येथील गणपतीला स्वेटर का घालतात जाणून घेऊया

6

श्री गणेशाला समर्पित, सारसबाग गणपती मंदिराला एक सुंदर आणि समृद्ध इतिहास आहे. मंदिराचे प्रमुख आराध्य श्री गणेशाला श्री सिद्धिविनायक म्हणतात, कारण या मूर्तीची सोंड उजवीकडे आहे. तलावाच्या मध्यभागी बेटावर असलेल्या स्थानामुळे हे मंदिर तळ्यातला गणपती म्हणूनही लोकप्रिय आहे. १८व्या शतकात पार्वती टेकडीवरील श्री देवदेवेश्वर मंदिर पूर्ण झाल्यानंतर, श्रीमंत बालाजी बाजीराव यांनी पार्वती डोंगराच्या पायथ्याशी तलाव बांधण्याची कल्पना मांडली. श्री बालाजी बाजीरावांचे स्वप्न आपले ध्येय मानून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी ते पूर्ण केले. या तलावाच्या मध्यभागी सुमारे २५ एकरांचे बेट ठेवण्यात आले होते. काही वर्षांनी बेटावर एक सुंदर बाग बांधली गेली. १७८४ मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सारसबागेत छोटेसे मंदिर बांधून श्री सिद्धिविनायक गजानन मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

गणेश मूर्ती कशी आहे

मंदिराचे प्रमुख आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाची मूर्ती लहान, पण अतिशय सुंदर, दिव्य आणि पांढरी शुभ्र आहे. मूळ मूर्ती कुरुड दगडाची होती. प्रारंभिक मूर्ती दोनदा बदलण्यात आली, एकदा १८८२ मध्ये आणि पुन्हा १९९० मध्ये. पांढऱ्या संगमरवरीने बनवलेली श्री गणेशाची सध्याची छोटी मूर्ती राजस्थानी कारागिरांनी तयार केली आहे. लहान मूर्ती असूनही, मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे की सुमारे ६०० मीटर अंतरावरुन पाहिले तरीही बाहेर रस्त्यावरुन बाप्पाचे दर्शन घेता येते.

गणपती बाप्पाला स्वेटर का घालतात

सारसबागेच्या गणपतीला स्वेटर का घालतात हे श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित यांनी सांगितले, ते म्हणाले परिसर रचना पाहता असे मंदिर भारतात नाही. हिवाळ्यात थंडीचा कडाका जसा वाढतो तसे भाविकांचे फोन येतात आणि प्रिय गणरायाला स्वेटर घातले की नाही अशी विचारपूसही होते. येथील गणेशभक्तांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. देहाला ते देवाला अशी आपल्याकडे म्हण आहे. याप्रमाणेच आपण जसे हिवाळ्यात स्वेटर कानटोपी घातलो तसेच सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचे स्वेटर कानटोपी असा पेहराव केला जातो. सध्या थंडीचा कडाका आता वाढत असून, सारसबागेतील या सिद्धिविनायकाला स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली आहे.

सारसबाग गणपती मंदिर हे श्री देव देवेश्वर संस्थान, पार्वती आणि कोथरूड यांच्या अधिपत्याखाली चालते. पुण्यातील आणि जगभरातील लाखो भाविकांसाठी हे मंदिर पवित्र भूमी आहे. गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या प्रसंगी येथे दर्शनाला रिघ लागते. नविन वर्षातील ही पहिली अंगारकी चतुर्थी असून, आजही पहाटेपासून सर्व मंदिरात भक्ताच्या रांगा पाहायला मिळत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.