Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

5

पुणे, दि. १२: लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील वाहतूक समस्येवरील उपाययोजनेबाबत बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने तात्काळ कार्यवाही करावी. शहरातील वाहतूक समस्येबाबत व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, रिक्षा संघटना आदींसोबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. कुसगाव टोल नाका आणि वरसोली टोल नाका या दोन्ही नाक्यावर नागरिकांना पथकर भरावा (टोल) लागत असल्यामुळे याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. शहराची सर्व अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे पर्यटकांना मुलभूत सूविधा पुरिवण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

यावेळी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डुबल यांनी लोणावळा परीक्षेत्रातील वाहतुकीची व पार्किंगची समस्या आणि त्यावरील उपाय योजनांची विस्तृत माहिती दिली. पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यवर्ती असे लोणावळा शहर असल्याने पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अपोलो गॅरेज ते भारत पेट्रोलियम पंप वळवण या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यासाठी पर्यायी मार्ग सूचविण्यात आले.

कुमार चौक ते भांगरवाडी रस्ता रुंदीकरण, शहरातील व मुंबई पुणे महामार्गावरील रिक्षा स्थानकाचे नियोजन करणे, संबंधितांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे, वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नगरपरिषदेने उपलब्ध करणे, सिग्नल यंत्रणा सुरु करणे, नवीन सिग्नल बसविणे, भटकी जनावरे, अनधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते यांचा बंदोबस्त करणे, भांगरवाडी व खंडाळा येथील ओव्हर ब्रीज बसविणे, लोणावळा शहरातील बस स्थानकासाठी शहराबाहेर स्थलांतरीत करणे, व्यापारी वर्गाकरिता लोडींग-अनलोडींग वेळ निश्चित करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर श्री. देशमुख यांच्या हस्ते श्रीराम क्रीडा मंडळ लोणावळा येथील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.